Tuesday, July 16, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यबांबूच्या वनात... कोकणची समृद्धी!

बांबूच्या वनात… कोकणची समृद्धी!

माझे कोकण: संतोष वायंगणकर

कोकण निसर्गसौंदर्याने नटलेले तर आहेच. येथील सृष्टीसौंदर्य सर्वांनाच भुरळ घालते. आंबा, काजू, कोकम, जांभुळ, करवंदाच्या बागा कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवत असतात. मासे हे देखील कोकणच्या अर्थकारणातला मोठा वाटा उचलत असतो. समुद्री मासेमारीवर अवलंबून असणारी अनेक कुटुंबे आहेत. कोकणच्या अर्थव्यवस्थेत मासेमारी, मासे विक्री व्यवस्थेचाही मोठा वाटा आहे. कोकणात आंबा, काजू, कोकम, जांभुळ, नारळ, सुपारी याबरोबरच बांबू लागवडीकडे आता कोकणातील शेतकरी लक्ष देऊ लागला आहे. कोकणात आजही मोठ्या प्रमाणावर पडीक जमीन आहे. या पडीक असलेल्या जमिनीवर बांबू लागवड करण्याकडे कोकणवासीयांचा कल वाढला आहे. बांबू लागवडीतून मिळणारे उत्पन्न अधिक असल्याने अर्थकारणावर अलीकडे चर्चा होत आहे. कोकण उद्योग पर्यटन विकास संस्था यासाठी कार्यरत झाली आहे. या वर्षीच्या गणेशोत्सवात तर मालवण तालुक्यातील पेंडूर गावच्या संजय परब यांनी गणपतीची आरास सर्व सजावट बांबूचा वापर करून करण्यात आली होती.

संजय परब हे कोकणात बांबू लागवड व्हावी, शेतकऱ्यांनी जी पडीक जमीन आहे, त्या पडीक असलेल्या माळरानावर बांबूची लागवड करावी, यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहेत. बांबू लागवड कोकणात मोठ्या प्रमाणात व्हावी, त्याचं महत्त्व समजावं म्हणून संजय परब यांनी गणपतीच्या सजावटीत जी आरास केली, ती बांबूचा वापर करूनच करण्यात आली होती. जेणेकरून गणेशोत्सव काळात येणारे भक्तगण गणपतीच्या सजावटीमध्ये बांबूचा कसा वापर केला जातोय, त्यातून कोकणवासीयांचे प्रबोधन होईल, काहींना बांबू लागवडीचे महत्त्व समजेल हाच हेतू संजय परब यांचा होता. आजही बांबू लागवडीतून मोठं उत्पन्न मिळू शकते, हे कोकणातील शेतकऱ्यांना समजून आलेलं नाही. ज्यांनी आर्थिक गणित मांडले, ज्यांना याची बेरीज समजली, त्यांनी मोकळ्या पडीक आणि डोंगरातही बांबू लागवड केली आहे. मात्र बांबू लागवडीचा विचार सर्वांपर्यंत अद्यापही पोहोचलेला नाही. कोकणातील बांबूला अधिकचा दर दिला जातोय. बांबू विक्रीचे मार्केटही काहींनी समजून घेतलंय. त्यामुळे अनेकजण अभ्यास करून बांबू लागवड करताना दिसतात.

मुंबईत असणारे वैभववाडी तालुक्यात मूळ गाव असलेले ज्ञानेश्वर रावराणे बांबू लागवडीवर काम करीत आहेत. रावराणे यांनीही त्यांच्या गावी पडीक असलेल्या जमिनीत मोठी लागवड केली आहे. कोकणात काही भागातील शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. काही शेतकऱ्यांनी काजू बागायतीबरोबरच बांबूची लागवड करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणात जमिनींमध्ये सहिस्सेदार अनेक असतात. यामुळे कोणा-एकाला काही निर्णय करणे अवघड होऊन जाते; परंतु जर सर्वांनीच एकत्र बसून चर्चा करून जी जमीन पडीक आहे, त्या पडीक असलेल्या जागेत बांबू लागवड करायची. त्यातून जे काही उत्पन्न येईल त्याची समानतेने किंवा ज्यांच्या वाटणीला जितकी जमीन आहे ते प्रमाण निश्चित करून आलेल्या उत्पन्नाची वाटणी करता येऊ शकते. कोकणात यातील शक्य किती आणि कसं होईल, हे सांगणं आजच्या घडीला अवघड असलं तरीही मानसिकता आणि समजूतदारपणा जर दाखवला गेला तर अनेक प्रश्न सुटू शकतात. हा काही एका बांबू लागवडीपुरता विषय नाही. कौटुंबिक असलेले कलह हे असेच क्षुल्लक जमिनीच्या तुकड्यासाठी असतात. आयुष्यभर यावरून वितंडवाद ठरलेलेच असतात. फुटभराच्या जमिनीचे वाद वर्षानुवर्षे न्यायालयात सुरू असतात. एखाद्या आंब्याच्या नाहीतर फणसाच्या झाडाचे वादही न्यायालयात पाच-पंचवीस वर्षे सुरू असतात. कोणी समझोता करण्याचा प्रयत्न केला तरीही माघार कोणी घ्यायची, यावरून हे वाद सुरूच असतात. अशाच एखाद्या संध्याकाळी आभाळ भरून येतं. पाऊस कोसळणार याची ती वर्दीच असते आणि मग अचानकपणे आकाशात वीज चमकते. चमकणारी ही वीज अशाच एखाद्या वादात असणाऱ्या आंब्याच्या, फणसाच्या झाडावर कोसळते आणि मग इतकी वर्षे वादात असलेला आंबा, फणस जळून जातो.

भावकीच्या वादात सापडलेलं झाड आनंदात भक्ष्यस्थानी पडते. फळ देण्यासाठी आलेली झाडेही अशाच वादात सापडल्याची अनेक उदाहरणं आहेत. ही वादातली झाडं नित्यनियमाने आंबे, फणस, नारळ जे काही असेल ते देत राहतात. वर्षानुवर्षे वाद मात्र सुरूच राहतात. दुसऱ्याची प्रगती थांबवण्याचा आनंद माननं थांबलं पाहिजे. जे काही शेती क्षेत्रात काम करणारे आहेत, त्यांना त्यांच्या कामात प्रोत्साहन मिळेल असा आपला प्रयत्न असायला पाहिजे. बांबू लागवडीचे मिशन अखंड कोकणात राबवलं गेलं पाहिजे. आंबा, काजू, नारळ, सुपारी बागायतीबरोबरच बांबूच्या माध्यमातूनही मोठं उत्पन्न मिळू शकते, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक गोष्टीत अतिचिकित्सकपणा आपणालाच त्रासदायक ठरतो. हा अतिचिकित्सकपणा आड दडलेला ‘इगो’ कोकणच्या प्रगती आड येत आहे. यासाठी आपण सर्वांनीच बदललं पाहिजे, तरच कोकण बदलेल. प्रत्येक गोष्टीतील नकारात्मकता बदलावी लागेल. सकारात्मक विचारातून प्रगतीचा कारपेट आपोआप अंथरला जाईल. फक्त आपण बदलायचा प्रयत्न करूया…

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -