इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
यावर्षी मुंबईत दहीहंडी उत्सव जोरदार साजरा झाला. ढाक्कुमाकुमच्या गजरात हजारो गोविंदा आणि गोपिका या उत्सवात सहभागी झाल्या होत्या. कुलाब्यापासून ठाणे-दहिसरपर्यंत मराठी तरुणाईचा आनंद आणि जोश याला उधाण आले होते. नंतर झालेला गणेशोत्सवही तेवढ्याच धुमधडाक्यात साजरा झाला. गणपती बाप्पांच्या आगमनाच्या व विसर्जनाच्या मिरवणुका म्हणजे मराठी युवाशक्तीचे मोठे प्रदर्शन बघायला मिळाले. गणपती व गोपालकाला ही महाराष्ट्राची धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा यंदाच्या वर्षी ढोल, लेझिम, नगारे, बेंजोच्या आवाजात दणक्यात साजरी झाली. गणेशोत्सवाच्या काळातच मुंबईत मराठी दाम्पत्याला मुलुंड या उपनगरात एका हौसिंग सोसायटीत जागा नाकारल्याची घटना घडली. मुंबईत मराठी टक्का घसरतो आहे, पण मुंबईतील मराठी अस्मिता अजून लोप पावलेली नाही हे गणेशोत्सव-दहीहंडीतून बघायला मिळाले. मग आम्ही महाराष्ट्रीय लोकांना सोसायटीमधील जागा भाड्याने देत नाही, असे सांगण्याची त्या सोसायटीच्या सचिवाची हिम्मतच कशी झाली?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९६६ मध्ये मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनेची स्थापना केली. शिवसैनिक कसा असावा हे सांगताना शिवसेनाप्रमुख म्हणायचे, मराठी माणसाचं हित त्याच्यासमोर ध्रुव ताऱ्यासारखं चमकत असावं. मराठी बांधवांची सेवा करताना त्यानं चंद्रासारखं शीतल असावं. विरोधी शूद्र जंतूंचा नाश करताना, त्यानं सूर्यासारखं प्रखर असावं…
शिवसेनाप्रमुख म्हणत, मुंबईमध्ये पहिलं राज्य होतं ते कोळी व भंडारी समाजाचं. नाना शंकरशेठ वगैरे अशी जबरदस्त माणसं होऊन गेली महाराष्ट्रात. मुंबई आमची होती. मुंबईवर ठसा मराठी माणसाचाच होता. घाटी असतील, कोकणी असतील. भंडारी-कोळी होतेच. या माणसांचा मुंबईवर हक्क होता. बघा ना हा भाऊचा धक्का. हा भाऊ कोण? गुजराती की पंजाबी? दिल्लीचा की बंगाली? भाऊ म्हणजे आमचे भाऊ दाजी. म्हणून तो भाऊचा धक्का. नाना शंकरशेठ यांनी जिजामाता उद्यान उभारणीत मोठा वाटा उचलला. तुम्ही त्याला राणीचा बाग म्हणायचे. कोण ही राणी? मला त्याची चीड आहे. मी त्या उद्यानाला जिजामाता उद्यान असे नाव दिलंय… गिरगावात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे आहे. मला कळलं की तिथे फलकावर लो. टि. मार्ग पोलीस ठाणे असे लिहिले आहे. मी स्वत: गेलो पोलीस ठाण्यावर. म्हटले, हे काय चाललंय. चांगलं लोकमान्यांचं नाव असताना लो. टि. मार्ग हे काय लिहिलंय? कुणाला डायरिया झालाय? कुणाला हवी आहे लोटी? नाहीतर मी डांबर आणले आहे, ते लावून टाकेन… मग पळापळ झाली… हे असं का घडतं, याला कारण तुम्ही शेंदाड आहात, मराठी माणसं, थंड रक्ताचे आहात…
आज मस्त्या करतात हे, तुम्हाला कुणालाच संताप कसा येत नाही? असा प्रश्न शिवसेनाप्रमुख विचारत असत. शिवसेना स्थापनेपूर्वी शिवसेनाप्रमुखांनी १९६५ मध्ये मार्मिक साप्ताहिकात म्हटले होते, कोणी वंदा, कोणी निंदा, महाराष्ट्र हिताचा आमुचा धंदा… शिवसेनाप्रमुख म्हणत, भाषावार प्रांतरचनेनुसार मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून मराठी माणूस इथला भूमिपुत्र आहे. त्यामुळे मुंबईत जे तुमच्या हक्काचे, ते तुम्हाला मिळायलाच हवे, ते कोणी देण्यास नकार देत असतील, तर मात्र त्यांच्याकडून हिसकावून घ्यायला मागे-पुढे पाहू नये… मुंबईतील दुकानांवरील पाट्या मराठीत असाव्यात यासाठी शिवसेनाप्रमुखांच्या काळात शिवसेनेला आंदोलने करावी लागली. मुंबई महापालिकेच्या नियमांना आव्हान देण्यासाठी काही अमराठी थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊन भिडले. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची कानउघाडणी करून त्यांना परत पाठवले. मुंबईत दुकानांवर मराठी पाट्या लावा असे निक्षून सांगितले… कोणत्याही गृहनिर्माण सोसायटीला जात, पात, धर्म, भाषा, मांसाहारी म्हणून कोणालाही सदस्यत्व नाकारता येणार नाही, असा सहकारी संस्थांचा नियम १९६० पासून आहे. मग सन २०२३ मध्ये मुलुंड या मुंबईच्या पूर्व उपनगरातील हौसिंग सोसायटीचे पदाधिकारी, आम्ही मराठी लोकांना जागा देत नाही, असे कसे काय सांगू शकतात?
दि. २७ सप्टेंबरला (अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी) मुलुंडच्याच रहिवासी तृप्ती देवरूखकर या त्यांच्या पतीसह मुलुंड पश्चिमेला एका हौसिंग सोसायटीत जागा बघायला गेल्या असताना ही घटना घडली. त्यांनी ती घटना फेसबुकवर पोस्ट केली. व्हीडिओ पाहून आमदार अनिकेत तटकरे यांचा त्यांना फोन आला. नंतर मुलुंडमधील मनसेचे पदधिकारी ॲड. सागर देवरे यांनी त्यांना फोन केला. त्यानंतर मनसेचे सत्यवान दळवी, राजेश पांचाळ हे मनसैनिकांसह तेथे आले व त्यांनी तृप्ती यांना जागा नाकारणाऱ्या पिता-पुत्राला जाब विचारला व मराठीत माफी मागायला लावली. मनसेचे बाळा नांदगावकर यांच्या पत्नीचाही तृप्ती यांना फोन आला. नंतर भांडुपवरून राजोल संजय पाटील यांनी संपर्क साधला. दरम्यान मराठी वृत्तवाहिन्यांवर मराठी म्हणून तृप्ती यांना मुलुंडमध्ये सोसायटीने जागा नाकारली अशा बातम्या झळकू लागल्या. नंतर पोलीस ठाण्यावर तृप्ती यांचा जबाब घेण्यात आला व पाठोपाठ मीडियाची गर्दी जमू लागली. मनसेचे राजेश चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता वाजे, तेथे पोहोचले. रायगडवरून शेकापक्षाच्या चित्रलेखा पाटील, राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण, आदिती नलावडे आदी नेत्यांच्या फोनची रांगच लागली. रूपाली चाकणकर यांनी ट्वीट करून सहकार व पोलीस खात्याला कारवाईचे आदेश दिले. नंतर ट्वीटच्या माध्यमातून अनेकांनी या घटनेचा निषेध नोंदवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनीही या घटनेची दखल घेतली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार उद्योगमंत्री उदय सामंत तसेच शिवसेनेचे सचिव संजय मशिलकर हे तृप्ती यांच्या घरी गेले. भाजपचे खासदार मनोज कोटक, आमदार मिहीर कोटेचा, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार प्रसाद लाड, प्रकाश गंगाधरे, मुलुंड भाजप महिला मोर्चाच्या दीपिका घाग, अस्मिता गोखले, राहुल बाणवली, अमोल दहिफुले असे अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी तृप्ती यांच्या घरी जाऊन त्यांना धीर दिला व आम्ही तुमच्याबरोबर आहोत, असे सांगितले. कृषिमंत्री धनंजय मुंडे, आमदार जितेंद्र आव्हाड, भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आदींनी तृप्ती यांच्याशी संपर्क साधला. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व शर्मिला ठाकरे यांचीही तृप्ती यांची भेट झाली. मुंबईत सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी तृप्ती यांच्या घरी धावले व मराठी आहे म्हणून सोसायटीत घर नाकारले, या घटनेची गंभीर दखल घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशा सत्तेवर असलेल्या महायुतीने तृप्तीला म्हणजेच मुंबईतल्या मराठी माणसाला आधार दिला, हेच चित्र दिसले.
मुलुंडमधील या घटनेवर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. निवडणुका जवळ आल्यामुळे कोणताही राजकीय पक्ष कोणत्याही समाजाच्या विरोधात उघडपणे बोलणार नाही. पण सोशल मीडियावर तरुणाईचा संताप हा मराठी मनाच्या तीव्र भावना उलगडून दाखवणाऱ्या आहेत. तृप्ती देवरूखकर यांनी फेसबुकवर पोस्ट केली म्हणून सर्व जगाला मुलुंडमध्ये काय घडले हे कळले. पंकजा मुंडेंनाही सरकारी निवासस्थान सोडल्यावर मराठी म्हणून मुंबईत घर मिळत नव्हते, हे त्यांनी स्वत:च म्हटले आहे. दक्षिण मुंबईतच नव्हे तर मुलुंड, मालाड, कांदिवली, बोरिवलीमध्ये मराठी लोकांना (एजंटांकरवी) आजही घरे नाकारली जातात. पण त्याची वाच्यता होत नाही. महाराष्ट्रात व मुंबईत मराठी माणसांचा कोणी अवमान करीत असेल, तर त्या इमारतीची वीज-पाणी तत्काळ तोडावी, ज्यांना मराठी लोकांविषयी तिटकारा असेल व ज्यांचा मांसाहाराला विरोध असेल त्यांनी त्यांच्या राज्यात जाऊन त्या राज्याचा विकास करावा, जे मांसाहाराला विरोध करतात, ते बाहेर काय खातात-पितात व बारमध्ये पैसे कसे उधळतात हे एकदा प्रत्यक्ष पाहावे. प्रत्येक सोसायटीत ५० टक्के मराठी सदस्य बंधनकारक करावेत. गेली तीस वर्षे मुंबई महापालिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या ताब्यात होती, हेच का त्याचे फळ? अशा असंख्य प्रतिक्रियांचा वर्षाव सोशल मीडियावर झाला आहे.
[email protected]
[email protected]