
अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री
मुंबई : राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची (Guardian Ministers) सुधारित यादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केली. या सुधारित यादीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले आहे. तर भाजपचे चंद्रकांत पाटील हे सोलापूरचे पालकमंत्री असणार आहेत. मात्र राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची मागणी अद्याप मान्य करण्यात आली नाही. छगन भुजबळ यांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हवे होते. त्यांना अजूनही वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.
नाशिक, रायगड आणि सातारा जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात मतभेद आहेत. त्यामुळे याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाबाबत मंत्रिमंडळ विस्तारानंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नव्या पालकमंत्र्यांच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सात मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. नाशिकचे पालकमंत्री पद विद्यमान शिवसेनेचे दादा भुसे आहेत. या जागेवर भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ यांचा दावा आहे. मात्र, दोघांच्या या दाव्यामध्ये भुजबळ आणि महाजन यांचा दावा प्रलंबित ठेवण्यात आला आहे.
१२ जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी पुढीलप्रमाणे
पुणे - अजित पवार
अकोला - राधाकृष्ण विखे- पाटील
सोलापूर - चंद्रकांत पाटील
अमरावती - चंद्रकांत पाटील
वर्धा - सुधीर मुनगंटीवार
भंडारा - विजयकुमार गावित
बुलढाणा - दिलीप वळसे-पाटील
कोल्हापूर - हसन मुश्रीफ
गोंदिया - धर्मरावबाबा आत्राम
बीड - धनंजय मुंडे
परभणी - संजय बनसोडे
नंदूरबार - अनिल भा. पाटील