Wednesday, July 17, 2024
Homeताज्या घडामोडीEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच... आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी केला...

Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरुच… आतापर्यंत ३५ नगरसेवकांनी केला पक्षप्रवेश

यंदाही आपलंच सरकार येणार…

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या शिवसेनेची (Shivsena) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातूनच अनेक ठिकाणचे नगरसेवक मुख्यमंत्र्यांच्या कार्यामुळे शिवसेनेत प्रवेश करत आहेत. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेत येणारा हा ओघ काही थांबायचे नाव घेत नाही. येऊ घातलेल्या निवडणुकीसाठी ही महायुतीच्या (Mahayuti) दृष्टीने महत्त्वाची बाब आहे. आज मुंबईतील चांदीवली विभागाचे माजी नगरसेवक लीना शुक्ला आणि हरीश शुक्ला यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष माया खोत आणि उपाध्यक्ष जया नाडर यांच्यासह असंख्य पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.

शिवसेनेची ताकद दिवसेंदिवस मुंबईत वाढत असून २०१७ साली निवडून आलेल्या ३५ नगरसेवकांनी आतापर्यंत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे, असे यावेळी सांगण्यात आले. आज प्रवेश केलेल्या सर्वच नगरसेवकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये स्वागत केले. यावेळी आमदार दिलीप लांडे, शिवसेना प्रवक्ते आणि महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेश म्हस्के (Naresh Mhaske), शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) या देखील उपस्थित होत्या.

लीना शुक्ला यावेळी म्हणाल्या की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकर्तृत्वाने प्रभावित होऊन आपण शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. त्यांच्या कामाच्या वेगामुळेच मुंबईत सध्या अनेक बदल घडत आहेत. त्यामुळे त्यांनी कायम मुख्यमंत्रीपदावर कायम रहावे अशी आमची इच्छा आहे”.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर मुंबईत झालेली विकासकामे, मुंबईमध्ये झालेला बदल आज लोकांच्या डोळ्यांसमोर आहे. आमचे सरकार स्थापन होण्यापूर्वी राज्यात सारी कामे ठप्प झाल्यासारखी परिस्थिती होती. कोरोना होता पण तो गेल्यावर देखील ज्या पद्धतीने विकास प्रकल्पाना चालना मिळायला हवी होती ती मिळाली नाही. वैयक्तिक अहंकारापोटी हे सगळे विकासप्रकल्प थांबवले गेले होते. खरं तर वैयक्तिक स्वार्थ दूर सारत राज्याचा विकास करणे ही प्रत्येक मुख्यमंत्र्याची जबाबदारी असते. मात्र त्यावेळी त्या सरकार मध्ये मी असलो तरी मला नेहमीच याबाबत कमतरता जाणवत असल्याने आम्ही त्यात बदल घडवला. मुंबईतील सगळे रस्ते पुढील दोन वर्षात खड्डेमुक्त करण्याचा आमचा निर्धार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, आपला दवाखान्यामुळे सर्वसामान्य गोरगरीब लोकांना सेवा मिळत आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय शहर असून इथे जगभरातून लोकं येतात. त्यामुळे हे शहर खऱ्या अर्थी सुंदर बनवण्यासाठी सुशोभीकरण कामाला विशेष महत्व देण्यात आले आहे. आजही मुंबईतील कचरा उचलून मुंबईकरांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणारे कामगार कशा अवस्थेत राहतात ते पहायला मी गेलो होतो. त्यांचं राहणीमान सुधारावे, त्यांना देखील पाणी, शौचालय, उत्तम रस्ते अशा सगळ्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी मुंबई मनपा आयुक्तांना निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

आतापर्यंत ३५ नगरसेवक शिवसेनेमध्ये दाखल झाले, कारण त्यांना त्यांच्या वॉर्डमध्ये सोयी सुविधा पाहिजेत. वॉर्डात राहणाऱ्या लोकांना विकास अपेक्षित असून विकास करायचा असेल तर सत्तेची सोबत लागते. कोरोना काळात नागरिक मृत्यूमुखी पडत होते तेव्हा काही लोकं पैसे बनवत होते. बॉडी बॅग, खिचडी सगळ्यात पैसे खाल्ले, घोटाळे केले. मात्र आता स्वार्थ बाजूला ठेवून आपल्या परिसराचा विकास करण्यासाठी सगळे इथे आले आहात. आपण माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही, असा शब्द देतानाच तुम्हाला जो हवा तो विकास नक्की साध्य होईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -