नवी दिल्ली : दिल्ली-एनसीआरमध्ये मंगळवारी दुपारी भूकंपाचे (Earthquake) जोरदार धक्के जाणवले. दुपारी २ वाजून ५३ मिनिटांनी हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.६ इतकी होती.
उत्तर प्रदेशातही भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी होती.
भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता. तेथे दोनदा भूकंप झाले. दुपारी २.२५ वाजता पहिला ४.६ रिश्टर स्केलचा होता आणि दुसरा २.५३ वाजता ६.२ रिश्टर स्केलचा होता.
हरियाणामध्ये मंगळवारी दिवसभरात दुसऱ्यांदा भूकंप झाला. पानिपत, रोहतक, जिंद, रेवाडी आणि चंदीगड आदी भागात दुपारी २.५० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, मंगळवारी सकाळी ११.०६ सेकंदांनी भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू सोनीपत असल्याचे सांगण्यात येत आहे. पृथ्वीच्या ८ किलोमीटर खाली हालचालींची नोंद झाली आहे.