Thursday, March 27, 2025
Homeसाप्ताहिकअर्थविश्वAmbani industries : कापड उद्योग हैराण, रेल्वे - अंबानी वेगवान...

Ambani industries : कापड उद्योग हैराण, रेल्वे – अंबानी वेगवान…

  • अर्थनगरीतून… : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक

वाढती महागाई भारतीय कापड उद्योगाच्या मुळावर येत असल्याची तक्रार ऐकायला मिळत आहे. त्या संदर्भातली आकडेमोड आणि अडचण अलीकडेच समोर आली. दरम्यान, ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अंबानींचे राज्य स्थापन होणार असल्याची बातमी आहे. याच सुमारास रेल्वे काही मुत्सद्दी मोहिमा आखत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे धडक मोहीम राबवत असल्याचे समोर आले. गेल्या आठवड्यामध्ये तीन वेगवेगळ्या उद्योगांमध्ये दखलपात्र घडामोडी अनुभवायला मिळाल्या. त्यांचा सविस्तर वेध घेणे आवश्यक आहे. पहिली बातमी होती कापड उद्योगासंदर्भात. वाढती महागाई भारतीय कापड उद्योगाच्या मुळावर येत असल्याची तक्रार ऐकायला मिळाली. दरम्यान, अंबानींनी आणखी एक मोठी कंपनी आपल्या ताफ्यात ओढायची तयारी केली असल्याचे वृत्त समोर आले.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच अंबानींचे राज्य असणार असल्याची बातमी आहे. याच सुमारास रेल्वे काही मुत्सद्दी मोहिमा आखत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी रेल्वे धडक मोहीम राबवत असल्याचे समोर आले. जगात वाढत असलेली महागाई कापड व्यापाऱ्यांसाठी अडचणीची ठरत आहे. नवीन वर्षाच्या खरेदीसाठी जवळपास प्रत्येक ऑर्डर अमेरिका आणि युरोपमधून येत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे; परंतु या वर्षी त्यात २० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. त्याचबरोबर सणासुदीचा काळ पाहता देशांतर्गत बाजारपेठेत देशभरातून येणाऱ्या ऑर्डर्स कमी झाल्या आहेत. व्यापाऱ्यांच्या मते महागाई पाहता सध्या ग्राहकांचे संपूर्ण लक्ष जीवनावश्यक खरेदीकडेच आहे. या वर्षी सप्टेंबरपर्यंत देशांतर्गत आणि परदेशी बाजारातून व्यापाऱ्यांना फारच कमी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारात सुरु होणारी विक्री यंदा अद्याप सुरू झालेली नाही. परदेशी बाजारांच्या बाबतीत, नवीन वर्षासाठी ऑर्डर्स १५-२० टक्कयांनी कमी झाल्या आहेत. देशांतर्गत बाजारातील ऑर्डर्समध्ये २० टक्कयांपर्यंत घसरण झाली आहे. गेल्या वर्षीची बंपर विक्री आणि या वर्षी झपाट्याने वाढणारी महागाई यामुळे ग्राहकांना फारशी खरेदी करता येत नाही. त्याच वेळी, अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये, महागाईच्या प्रभावामुळे लोकांच्या खरेदीचे प्राधान्यक्रम बदलत आहेत. अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हने व्याजदर चढेच राहण्याचे संकेत दिले आहेत.

गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये एकूण ग्राहक किंमत निर्देशांकाची महागाई सात टक्के होती तर कपड्यांची महागाई सुमारे दहा टक्के होती. यंदा ऑगस्टमध्ये कपड्यांच्या महागाईचा दर पाच टक्कयांच्या वर असून महागाई ६.८ टक्कयांवर आहे. गेल्या वर्षभरात कपड्यांची महागाई पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान राहिली आहे. ही व्यावसायिकांची समस्या आहे. कपड्यांच्या विक्रीतील मंदी पाहता व्यापारी सध्या नवीन रिटेल स्टोअर्स उघडण्यास घाबरत आहेत. आत्तापर्यंत कोणीही मोठी टाळेबंदी केलेली नाही; परंतु आणखी तीन-चार महिने अशीच स्थिती राहिल्यास परिस्थिती आणखी बिघडू शकते. कापड उद्योगात बेरोजगारीचे प्रमाण वाढू शकते. दुसरी महत्त्वाची घडामोड आहे अंबानी साम्राज्याविषयी. ओटीटी प्लॅटफॉर्मवर आता ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’च्या रूपात मुकेश अंबानी राज्य करण्याची शक्यता आहे. जिओ सिनेमाचा स्पर्धक असलेल्या ‘डिस्ने हॉटस्टार’ची मालकी अंबानींकडे येण्याची शक्यता असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. ‘डिस्ने हॉटस्टार’ भारतातील आपली मालकी जिओ सिनेमाला विकण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत आहे. भारतात सध्या ओटीटी अॅप्स चांगलीच लोकप्रिय होत आहेत. त्यामध्ये ‘जिओ सिनेमा’चाही समावेश आहे. जिओ सिनेमा अॅपवर बहुतांश व्हीडिओ विनामूल्य उपलब्ध आहेत. प्रीमियम व्हीडिओसाठी तीन महिन्यांसाठी केवळ ९९ रुपये आकारण्यात येत आहेत. या वर्षीच्या आयपीएल सामन्यांचे आणि गेल्या वर्षी फिफा विश्वचषकाचे ‘लाइव्ह स्ट्रीमिंग’ केल्यामुळे ‘जिओ सिनेमा’ची लोकप्रियता वाढली आहे. ‘जिओ सिनेमा’च्या आयपीएल सामन्यांच्या ‘लाईव्ह स्ट्रिमिंग’मुळे ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’चे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीत ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ने ‘जिओ सिनेमा’ला टक्कर देत आशिया कप आणि वर्ल्ड कपचे ‘स्ट्रीमिंग’चे अधिकार विकत घेतले आहेत; पण यूजर्सची संख्या वाढवण्यासाठी ‘हॉटस्टार’ला मोफत ‘लाईव्ह स्ट्रीमिंग’ करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर अंबानी ‘डिस्ने हॉटस्टार’ प्लॅटफॉर्म खरेदी करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे. यासंदर्भात ‘जिओ सिनेमा’ची ‘डिस्ने’शी चर्चा सुरू आहे. ‘डिस्ने’ आपला भारतातील व्यवसाय ‘जिओ’ला विकू शकते अशी चर्चा आहे.
‘डिस्ने’चे मुख्य कार्यकारी अधिकारी बॉब इगर त्यांच्या भारतातील व्यवसायासाठी विविध शक्यतांची चाचपणी करत आहेत. ते ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ सोबत संयुक्त उपक्रम स्थापन करण्याची आणि ‘स्टार इंडिया टीव्ही चॅनल’ आणि ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म विकण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. ऑक्टोबर २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान ‘डिस्ने प्लस हॉटस्टार’च्या सबस्क्रिप्शनमध्ये ८४ लाख यूजर्सची घट झाली आहे. ‘डिस्ने’ची सशुल्क सदस्यता १५७.८ दशलक्षवरून ५२.९ दशलक्षपर्यंत घसरली आहे. क्रिकेट आणि इतर खेळाव्यतिरिक्त ‘हॉटस्टार इंडिया’वर अनेक चित्रपट दाखवण्यात येतात. त्यामध्ये मार्वल आणि स्टार वॉर्सचे चित्रपट आणि सीरिज जास्त लोकप्रिय आहेत. तसेच हिंदी, तामिळ, तेलगु आणि मल्याळम भाषेतील चित्रपट आणि मालिकाही दाखवण्यात येतात.

आता बातमी भारतीय रेल्वेसंदर्भातली. डिसेंबर २०२३ पर्यंत सर्व गाड्यांचे पूर्णपणे इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये रूपांतर करण्यावर रेल्वेने भर दिला आहे. २०३० पर्यंत रेल्वे आणि स्थानकांमध्ये अक्षय स्त्रोतांपासून उत्पादित ऊर्जा पुरवण्यात येणार आहे. हे लक्ष्य साध्य झाल्यास २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जन ३३ टक्क्यांनी कमी करणे भारताला शक्य होईल, कारण वाहतूक क्षेत्रामध्ये उत्सर्जन कमी करण्यास भरपूर संधी आहे. एकीकडे, रेल्वे २०३० पर्यंत मालवाहतुकीतील आपला वाटा ३५ टक्क्यांवरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढवेल, तर दुसरीकडे अक्षय ऊर्जा क्षमता प्रस्थापित करेल. एकंदरीत, रेल्वेने वेगवान विकासयात्रा आरंभली आहे. भारतीय रेल्वे काही नावीन्यपूर्ण उपायांवरही काम करत आहे. बॅटरी प्रकल्पामध्ये २४ तास अक्षय ऊर्जा पुरवठा सुनिश्चित करणे आणि सतत वीज निर्मितीसाठी रेल्वे ट्रॅकच्या समांतर सोलर प्लेट्स बसवणे अशा उपायांवर रेल्वे काम करत आहे. भारतीय रेल्वेने २०१४ पासून डिझेलवर चालणारी इंजिने काढून ब्रॉडगेज रेल्वे ट्रॅकचे विद्युतीकरण करण्याच्या कामाला गती दिली होती. आता डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण रेल्वे नेटवर्कचे विद्युतीकरण करण्याची रेल्वेची योजना आहे. २०१९-२०२० या वर्षात रेल्वेचा वीजवापर २,१०० कोटी युनिट्स इतका होता. २०२९-२०३० पर्यंत हा वापर ७,२०० कोटी युनिटपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. ऑगस्ट २०२२ पर्यंत भारतीय रेल्वेची अक्षय ऊर्जा निर्मिती क्षमता २४५ मेगावॅट होती. सध्या रेल्वेने स्वत:च्या गरजा पूर्ण करण्यासाठी योजना आखल्या असून त्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -