एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सव्वा वर्षापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या विरोधात उठाव झाल्यानंतर शिंदे गटालाच निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष म्हणून मान्यता दिली. एवढेच नव्हे तर धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्हही शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मिळाले. गेल्या वर्षी चाळीस आमदार आणि तेरा खासदारांनी उद्धव ठाकरे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून उठाव केला. त्यांनी पक्ष बदल केला नाही किंवा पक्ष सोडला नाही. उलट शिंदे गटालाच निवडणूक आयोगाने अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता दिली.
शिवसेनेची स्थापना मुंबईतील दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर झाली आणि शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावाही वर्षानुवर्षे याच मैदानावर होतो आहे. या मेळाव्याला मुंबईतून आणि महाराष्ट्रातून लक्षावधी शिवसैनिक मोठ्या निष्ठेने येतात आणि विजयादशमीला आपल्या नेत्यांची भाषणे ऐकून विचारांचे सोने लुटतात. गेल्या वर्षी जून महिन्यात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच शिवसेनेत मोठा उठाव झाला. त्यांच्या डोळ्यांसमोरून पक्षाचे ४० आमदार मुंबई सोडून सुरत मार्गे गुवाहाटी व नंतर गोव्याला निघून गेले. शिवसेनेच्या नेत्यांनी, आमदार-खासदारांनी आणि मंत्र्यांनीसुद्धा उद्धव यांना वेळोवेळी भेटून काँग्रेसची साथ सोडा व आपण भाजपबरोबर जाऊ या, असे सांगितले होते. पण मुख्यमंत्रीपदाच्या मखरात बसलेल्या उद्धव यांना आपल्या सहकारी नेत्यांचे व मंत्र्यांचे नीट ऐकू येत नव्हते. त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदासाठी पक्षात उठाव होऊ दिला, पण काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडली नाही. पक्ष दुभंगला तरी चालेल पण सोनिया गांधी, राहुल गांधी आणि शरद पवार यांची साथ सोडणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव यांनी घेतली होती. अशाने पक्षाचे मोठे नुकसान होते आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही.
केवळ शिवसेनाप्रमुखांच्या पुण्याईवर उद्धव हे पक्षप्रमुखपदावर आजही बसले आहेत. निवडणूक आयोगाने उद्धव यांचा पक्ष वेगळा व त्यांना मशाल हे निवडणूक चिन्ह दिले आहे. अडीच वर्षे त्यांना मुख्यमंत्रीपदाचे कवच लाभले पण त्याचा पक्षाला काहीच उपयोग झाला नाही. उरली-सुरली सेना उद्धव यांच्याकडे आहे. मग शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा त्यांना हवाय तरी कशाला? उबाठा सेनेने शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्याचा हट्ट धरला आहे. कायद्याने आणि नियमाने जे होईल ते होईल, पण त्यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मागणे योग्य तरी आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातील गोष्ट वेगळी होती. त्यांचे या मैदानाशी भावनिक नाते जोडलेले होते. शिवसेनेची स्थापना झालेले हेच मैदान आहे. शिवाजी पार्क मैदानाला शिवसेनाप्रमुख हे नेहमी शिवतीर्थ असे संबोधित असत. या शिवतीर्थाशी उद्धव यांचा संबंध तरी काय? वडिलोपार्जित मिळालेली शिवसेना नावाची संपत्ती त्यांनी संपवून टाकली. राज्याची सत्ता गमावली, यापुढे मुंबई, ठाणे महापालिकेची सत्ता मिळणे कठीणच आहे.
बाळासाहेब ठाकरेंसाठी जीवाला जीव देणारे त्यांचे विश्वनीय सहकारी व निष्ठावान शिवसैनिक उद्धव यांना सोडून निघून गेले आहेत. शिवसेनाप्रमुखांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे हेच चालवत आहेत. म्हणूनच यावर्षी शिवतीर्थावर त्यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत शिवसेनेलाच दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळणे गरजेचे आहे. गेल्या वर्षी शिवसेनेत उठाव झाल्यापासून दसरा मेळावा शिवाजी पार्कवर कोणाचा, उद्धव ठाकरेंचा की, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा, असा संघर्ष सुरू झाला. मुंबई महापालिकेच्या नियमाप्रमाणे ज्याचा प्रथम अर्ज येतो, त्याला शिवाजी पार्क मैदानात सभा घेण्यास परवानगी दिली जाते. आम्ही अर्ज सर्वप्रथम केला असा दावा ठाकरे गटाने तेव्हा केला होता.
हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत गेले, त्यानंतर महापालिकेने ठाकरे गटाला शिवाजी पार्क मैदानावर दसरा मेळावा घेण्यास परवानगी दिली. त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते, सरकार त्यांचे होते, पण शिंदे गटाने अतिशय संयमाची भूमिका घेतली. ठाकरे गट आक्रस्ताळेपणा करीत असताना शिंदे गटाने आपली नम्रता सोडली नाही. शिवाजी पार्क मैदानासाठी सरकारची शक्ती व प्रतिष्ठा पणाला लावली नाही. गेल्या वर्षी शिंदे गटाने मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात दसरा मेळावा घेतला. ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा कितीतरी पटीने शिंदे गटाने केलेले शक्तिप्रदर्शन मोठे होते. संपूर्ण महाराष्ट्रातून शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने बीकेसीवर आले होते. सर्वात जास्त गर्दी बीकेसीवर होती, हे उभ्या महाराष्ट्राने टीव्हीच्या पडद्यावर पाहिले.शिवसेनेचे दादरचे आमदार सदा सरवणकर हे गेली पंचवीस वर्षे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून मुंबई महापालिकेकडे अर्ज करीत आले आहेत. गेल्या वर्षी त्यांनीच शिंदे गटासाठी अर्ज केला होता. या वर्षीही त्यांनीच दादरचे आमदार म्हणून शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला शिवाजी पार्क मैदान मिळावे म्हणून अर्ज केला आहे.
एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख आहेत. त्यांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्याने दसरा मेळाव्यासाठी मैदान मिळावे म्हणून अर्ज केला आहे. लोकप्रतिनिधीने केलेली विनंती डावलून दुसऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या अर्जाला महापालिका महत्त्व देणार का? हा कळीचा मुद्दा आहे. दसरा मेळावा सभेत एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करतील, असे सदा सरवणकर यांनी अर्जात म्हटले आहे. गेल्या वर्षी शिंदे गटाला अधिकृत पक्ष म्हणून मान्यता मिळाली नव्हती. यावर्षी अधिकृत शिवसेना शिंदे यांच्याकडे आहे. म्हणूनच शिंदे यांच्या शिवसेनेचा शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याचा पहिला अधिकार आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra