काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पीएमई बस सेवा योजनेवर शिक्कामोर्तब करण्यात आले. सार्वजनिक वाहतूक सेवेच्या विस्तारांतर्गत हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे. याचा फायदा देशातील सर्वसाधारण जनतेला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या योजने अंतर्गत १०० शहरांची निवड करण्यात आली असून सार्वजनिक-खासगी तत्त्वावर तब्बल दहा हजार नव्या बस गाड्या रस्त्यांवर धावणार आहेत. या योजनेसाठी एकूण ५७ हजार ६१२ कोटी रुपये लागणार असून केंद्र सरकार २० हजार कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहे, तर उर्वरित निधी राज्य सरकारला उभा करावा लागणार आहे. पुढील दहा वर्षे ही योजना कार्यरत राहणार आहे, असे नियोजन आहे.
सर्व मोठ्या शहरात डिझेल व पेट्रोल वाहनांद्वारे होणारे प्रदूषण टाळावे व डिझेल व पेट्रोलवरील आपल्या देशाचे परावलंबत्व कमी करावे, यासाठी केंद्र सरकारने गेल्या काही वर्षांत विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात चालना दिली. मोठ्या प्रमाणात सवलती दिल्या आहेत. आजच्या परिस्थितीत देशात मोठ्या प्रमाणात विद्युत वाहने रस्त्यावर धावतांना दिसत आहेत. खासगी तसेच सार्वजनिक वाहतुकीत बरीच वाहने आता विद्युतवर चालणारी आहेत. मुंबईतील बेस्टकडेही हजारोंच्या आसपास बस गाड्या आता विद्युतवर चालणाऱ्या बस आहेत. बाजूच्या नवी मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर, पुण्यासारख्या शहरातही रस्त्यांवरसुद्धा विद्युत बस धावताना दिसत आहेत, ही एक मोठी सुखावह बाब असली तरी त्या आनुषंगाने विद्युत वाहनांचे फायदे व तोटे या सर्वच अंगाने विचार करणे आपल्याला क्रमप्राप्त आहे.
जगभरातील अनेक देशांनी पेट्रोल किंवा डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांची जागा विद्युत वाहनांनी भरून काढली आहे. इंधन जाळल्यामुळे होणारा उत्सर्ग व वाहनांच्या इंजिनचे ध्वनिप्रदूषण यास पर्याय म्हणून विद्युत वाहने सध्या खूप आकर्षक व स्वस्त वाटत आहेत. भारताची परिस्थिती बघता असे दिसते की, येत्या २०३० पर्यंत देशातील ३० टक्के खासगी वाहने विद्युत वाहने असणार आहेत. तसेच प्रत्येक घराच्या समोर असलेली दुचाकी व तीन चाकी वाहनेही विद्युत वाहने असतील. याच दरम्यान ७० टक्के अवजड वाहने विद्युत वाहने झालेली आढळतील. म्हणजे संपूर्ण देशात पाच कोटींच्या आसपास विजेवर धावणारी वाहने असतील, असा अंदाज आहे. सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहन निर्मिती करणाऱ्या डझनभर कंपन्या अस्तित्वात आहेत. मात्र या कंपन्यांनीसुद्धा आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त वाहने निर्माण केली आहेत. तर आज रस्त्यांवर २८ लाख वाहने विद्युत प्रणालीवर धावत आहेत. गेल्या काही वर्षांत केंद्र सरकारने विद्युत वाहनांना व उत्पादकांना सवलती दिल्यामुळे विद्युत वाहनांची विक्री वाढली आहे. केंद्र सरकारने आपल्या योजनेखाली आतापर्यंत ६ हजार ५०० कोटी रुपये या वाहनांसाठी सबसिडी म्हणून दिली आहे व सार्वजनिक परिवहन सेवांकरिता बस गाड्यांसाठी ‘फेम’ योजनेखाली मोठी सबसिडी दिली आहे. मात्र या सबसिडीचा जबरदस्त फायदा वाहन उत्पादकांनी घेतला, तर त्याचा फारच कमी फायदा हा सर्वसामान्य ग्राहकांना झाला आहे.
फेम योजनेंतर्गत सार्वजनिक वाहतुकीसाठी, बस खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात हा निधी देण्यात येतो, मात्र हा निधी परिवहन संस्था ही सवलत स्वतः न वापरता भाडोत्री कंत्राटदारांकडून बस घेतात व ही सवलत कंत्राटदाराच्या खिशात हा निधी घालतात, यावर एक मोठे संशोधन होईल. त्यामुळे या सर्व गोष्टींकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची वेळ आता आली आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये विद्युत वाहनांच्या ग्राहकांची मागणी जरी वाढताना दिसत असली तरी आजही ग्राहकांचा लोंढा हा पेट्रोल व डिझेल याकडेच जास्त वळलेला दिसेल. आजही विद्युत वाहनांसमोर केवळ इतर आव्हाने नाही तर तंत्रज्ञान सुरक्षितता हेही मोठे आव्हान आहे. या तंत्रज्ञानात अजूनही खूप मोठ्या अडचणी आहेत. आज विद्युत वाहनांची किंमत ही सर्वसाधारण वाहनांपेक्षा जरा जास्तच आहे. आजही आपल्या इथला मोठा ग्राहक वर्ग हा विद्युत वाहनांकडे वळलेला दिसत नाही.
विद्युत वाहनेही शहरात जास्त प्रमाणात पसंत केली जातात. कारण ग्रामीण भागात अजूनही विद्युत चार्जिंग सेंटरची कमतरता आहे. गाडी बंद पडल्यावर मेकॅनिकही त्वरित मिळत नाही. त्यामुळे गाडी टोईंग करून घेऊन जाणे हाच पर्याय विद्युत वाहनचालकांसमोर असतो. या वाहनांच्या पायाभूत सुविधाही आपल्याकडे पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. प्रत्येक गाडीची बॅटरी पूर्ण चार्ज करण्यासाठी किमान काही तासांचा अवधी लागतो. आज मुंबईतील बेस्ट उपक्रमास शहरात बससेवा चालवण्यासाठी विद्युत बसगाड्यांच्या बाबतीत बऱ्याच अडचणी येत आहेत. सध्या एसटी महामंडळाकडेही ई-शिवनेरी बसेस आहेत. मात्र त्याही प्रमुख बस मार्गांवर धावतात. गावोगावी जात नाहीत, याही मर्यादा लक्षात घेतल्या पाहिजेत. आता प्रमुख समस्या विजेच्या उपलब्धतेबाबतची आहे. आजही आपल्या देशामध्ये विजेचे उत्पादन खूपच कमी प्रमाणात घेतले जाते. उत्पादन कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती आज देशात आहे. बऱ्याच ठिकाणी आजही मोठ्या प्रमाणात भारनियमन करावे लागते. आपल्या देशातील कोळसा हा चांगल्या दर्जाचा नसल्याने व कोळशाचे प्रमाणही कमी असल्याने चांगला कोळसा हा आपल्याला मोठ्या प्रमाणावर आयात करावा लागतो.
या पुढील काळात सर्वत्र विद्युत वाहने आली तर मोठ्या प्रमाणावर विजेची मागणी वाढेल व त्या प्रमाणात कोळसा आयात करावा लागणार आहे. आज आपल्या इथे ५०% पेक्षा जास्त वीज ही कोळशावर आधारित आहे. मग कोळसा जाळून निर्माण होणारी वीज ही पर्यावरणपूर्वक म्हणता येईल का? हा मुख्य प्रश्न आहे. तसेच या गाड्यांच्या बॅटऱ्यांवर अजूनही प्रश्नचिन्ह उभे केले जाते. या बॅटऱ्यांचे आयुष्य खूप कमी आहे तसेच नादुरुस्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. तसेच आजही विद्युत वाहनांचा वेग हा सर्वसाधारण वेगापेक्षा कमी आहे. आजही विद्युत वाहने चार्जिंगशिवाय इतर कशावरही धावण्याची पर्यायी सोय उपलब्ध नाही. त्यामुळे चार्जिंग स्टेशन हाच एक पर्याय या वाहनांसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे सर्वत्र चार्जिंग स्टेशन उभारणे हा एकच मार्ग धोरणकर्त्यांना अवलंबवावा लागणार आहे.
पुरेशा पावसाअभावी यंदाच्या वर्षी आपल्या देशात विजेच्या मागणीत फार मोठी मागणी वाढली आहे. तसेच जागतिक पातळीवर देशाने कार्बन उत्सर्जनाचे उद्दिष्ट गाठण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे वीजटंचाईचा प्रश्न विद्युत वाहनांसाठी भविष्यात अडचण तर ठरणार नाही ना? अशी भीती व्यक्त होत आहे. भविष्यात सर्वच प्रकारचा ग्राहक विजेच्या वाहनांकडे वळला तर येत्या काही वर्षांत वीजटंचाई उग्र स्वरूप धारण करेल. पेट्रोल-डिझेलला पर्याय म्हणून जरी विद्युत वाहनांचा विचार पुढे येत राहिला तरी वीजनिर्मिती व त्याची उपलब्धता ही गंभीर समस्या आपण सोडवू शकलो नाही, तर भविष्यातही विद्युत वाहने व पर्यावरण बचतीचा फुगा फुटल्याशिवाय राहणार नाही.
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…
डॉ. महालक्ष्मी वानखेडकर इवलासा चिमणीसारखा अस्थिर जीव जेमतेम दहा-बारा सेंटीमीटरचा. नाकापासून ते पाठीपर्यंत काळ्या रंगाचे…
श्रीनिवास बेलसरे चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले…
गुरुनाथ तेंडुलकर या प्रश्नाचं बाळबोध उत्तर-काहीतरी साध्य करण्यासाठी लागणारं सामान म्हणजे साहित्य. बागेत फुलझाडं लावायची…