चित्रपट तसेच मालिकेतील नायक, नायिका, खलनायक, कलाकार आणि प्रसंग आपल्याला दीर्घ काळ स्मरणात राहतात. त्यातले प्रसंग अगदी जिवंत वाटतात, त्यात कलाकाराने जीव ओतलेला असतो म्हणून; परंतु केवळ नुसत्या अभिनयातून पडद्यावरची कलाकृती बहरत नाही, तर पडद्यामागच्या कलाकारांचे देखील त्यात मोठे योगदान असते. त्यासाठी दिग्दर्शक, सहा. दिग्दर्शक आणि इतर अनेकांचे कौशल्य पणाला लागते. कॅमेरा पोझीशनपासून अनेक लहान-मोठ्या गोष्टींचा समताेल सांभाळावा लागताे. शूटिंगच्या वेळी सगळ्या गोष्टींचे योग्य नियोजन करून बारकावे टिपावे लागतात. कोणतीही चूक होता कामा नये, ही सर्वात महत्त्वाची पडद्यामागची भूमिका निभावणारे दिग्दर्शक केदार वैद्य यांनी दै. प्रहारच्या ‘गजाली’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी दै. प्रहारचे महाव्यवस्थापक मनिष राणे तसेच संपादक डाॅ. सुकृत खांडेकर यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर गप्पांचा फड रंगला. “अग्गं बाई अरेच्चा”, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘भागो मोहन प्यारे’ आशा विविध मालिका आणि “झिपऱ्या” चित्रपटच्या शूटिंगच्या वेळी आलेले अनुभव केदार वैद्य यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कथन केले.
व्हीवरील मालिका या केवळ चॅनल्सना प्रमोट करण्यासाठीच निर्माण केल्या जातात, त्यातून एखाद्या कलाकाराचे किंवा दिग्दर्शकाचे करिअर घडेलच याची हमी देता येत नाही. अगदी आजच्या स्थितीला पाच मालिका दिग्दर्शकांची नावे सांगा, असे रोजच्या मालिका बघणाऱ्या प्रेक्षकाला विचारले तरी कठीण जाईल, ही परिस्थिती असताना केदार वैद्य या इंडस्ट्रीत आपले पाय रोवून उभा आहे. विविध मालिकांचे दिग्दर्शन करताना आपले बरे-वाईट अनुभव त्यांनी ‘प्रहार’च्या संपादकीय मंडळींशी शेअर केले. केदारचे मूळ शिक्षण ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगमधले. केवळ अर्थार्जनाचा स्त्रोत म्हणून एका मित्राच्या सांगण्यावरून त्याने या क्षेत्रात पाऊल टाकले, तेही हिंदी मालिकांच्या आखाड्यात. सुरुवातीला अगदी अनभिज्ञ असलेला केदार हळूहळू हिंदीत स्थिरावला. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्याने अनेक नामवंत दिग्दर्शकांकडून मालिकांना अपेक्षित असलेली छोट्या पडद्याची भाषा शिकून घेतली. १९९८ साली या क्षेत्रात ऋषी त्यागी या मित्राची त्याला खूप मदत झाली.
दरम्यान महेश भटांच्या प्राॅडक्शन हाऊसबरोबर काम करताना अचानक “अग्गं बाई अरेच्चा” या केदार शिंदेंच्या चित्रपटाला सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आपल्या अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर त्याने मराठी इंडस्ट्रीत प्रवेश केला. हिंदी आणि मराठी इंडस्ट्री याबाबत आपले मत किंबहुना फरक स्पष्ट करताना तो म्हणाला की, “मराठीत जरी कमी पैसे मिळाले तरी कामाचे समाधान मिळते. मराठीचा परिघ हिंदीच्या मानाने जरी छोटा असला तरी काम करताना मिळणारे स्वातंत्र्य, सृजनशीलता तथा विषयाचे नावीन्य तुम्हाला तुमच्या कामाची पोहोचपावती मिळवून देते.” मराठीतला केदारचा प्रवेश अशारितीने त्याच्या पथ्यावर पडला.
‘तुझेच मी गीत गात आहे’,‘अजूनही बरसात आहे’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘भागो मोहन प्यारे’ या त्याच्या गाजलेल्या मालिका. अरुण साधूंच्या “झिपऱ्या” या कादंबरीवरील सिनेमाची देखील तेवढीच प्रशंसा झाली. वाचनाची आवड असलेल्या केदारची दादर सार्वजनिक वाचनालयात “झिपऱ्या”शी गाठ पडली. मती गुंगवून टाकणाऱ्या या कादंबरीला मोठ्या पडद्यावर आणायचेच या निर्धाराने त्याने अरुण साधूंची भेट घेतली. साधूंनी चित्रपटास परवानगी देण्याअगोदर “झिपऱ्या”ची पटकथा लिहून आणण्यास सांगितले. केदारच्या डोक्यात पूर्ण चित्रपट तयार होता. तो कागदावर उतरण्यास वेळ लागला नाही. बरेच दिवस झाले, तरी साधूंकडून काहीच अभिप्राय येईना, तेव्हा आपली पटकथा त्यांना आवडली नसावी कदाचित या संभ्रमात असतानाच साधारण दोन महिन्यांनंतर “झिपऱ्या”ला परवानगी मिळाली. नवी ऊर्जा किंवा कात टाकलेल्या एखाद्या जीवाप्रमाणे केदार उत्साहाने कामाला लागला. झिपऱ्याची पार्श्वभूमी फार वेगळी आहे. रेल्वे फलाटावरच्या भणंग आयुष्य जगणाऱ्या समाजाची ती कथा आहे. मराठीसाठी हा आकृतीबंध फारच नवा होता. मुळात रेल्वेशी संबंध असल्याने तो खर्चिक होता. मराठी निर्मात्यांचे बजेट आणि झिपऱ्याचा विषय यांची सांगड घालताना केदारची दमछाक झाली. वडाळा रेल्वेलाइनच्या बाजूला आॅफिस थाटून, तिथल्या स्थानिक चरसी, गर्दुल्ल्यांना विश्वासात घेऊन अखेर सहा महिन्यांचा कालावधी घेऊन ‘झिपऱ्या’ प्रदर्शनासाठी तयार झाला. २०२२ साली सुरू असलेली सोनी चॅनलवरची “अजूनही बरसात आहे” या मालिकेने केदारला त्या वर्षीचा अत्युच्च टीआरपी मिळवून दिला. “अग्गंबाई अरेच्चा” या चित्रपटामुळे पल्लवी ही सहचारिणी लाभली, एवढेच नाही तर तब्बल १४ वर्षांनंतर “अजूनही बरसात आहे” या मालिकेत एकत्र काम करण्याचा योग आला. झिपऱ्याला अनेक सन्मानांनी आणि पारितोषिकांनी गौरवले गेले. महेश भट कॅम्पमध्ये अभिनयही करता आला, अशा पायऱ्या चढत चढत केदारने आपले दिग्दर्शकिय करिअर, मराठी चित्रपट आणि मालिका सृष्टीत सिद्ध केले आहे.
नव्या दमाचा, नव्या पिढीचा, नव्या संकल्पनांचा दिग्दर्शक म्हणून आज त्याच्याकडे पाहिले जाते. मराठीत मालिकांचे नावीन्य टिकवायचे असेल, तर नवे विषय आणि नवे अवकाश घेऊन काम करण्याचा मनोदय त्याने या मुलाखतीदरम्यान व्यक्त केला. नवीन येणाऱ्या चित्रपटाबाबत त्याचे काम सुरू असून लवकरच त्याच्या चित्रीकरणास आरंभ होईल, अशी आशा बाळगण्यास हरकत नाही, असा आत्मविश्वास मुलाखतीअंती बरेच काही सांगून गेला.
प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतोच, त्यातून पळवाट न काढता धीराने सामोरे जावे, यश हे आपलेच असते. ‘प्रहार गजाली’च्या कार्यक्रमात सहभागी झालेले मराठी चित्रपट, मालिकांचे दिग्दर्शक केदार वैद्य यांनी त्यांच्या २५ वर्षांतील कारकिर्दीबाबत कथन केलेले हे वक्तव्य सर्वांसाठी प्रेरणादायकच होते. ते म्हणाले की, प्रत्येक विद्यार्थ्याचे कॉलेज पूर्ण झाल्यावर त्याचे एक स्वप्न असते ते म्हणजे आपल्याला चांगल्या पगाराची नोकरी मिळावी. माझीही तीच इच्छा होती; परंतु शिक्षण कमी असल्याने कुठेही नोकरी केली तरी किती पगार मिळेल याची शाश्वती नव्हती. मराठी दिग्दर्शक संजय वानखेडे यांच्याकडून अनायासे मला विचारण्यात आले की, तू सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करशील का? केदारने ‘नाही’ म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. तिथून हा प्रवास सुरू झाला. त्यातून मालिका, चित्रपट निर्मितीच्या काही बारीक गोष्टी ते शिकले. त्यांनी हिंदी मालिका ‘शगुन’, ‘शोहरत’ तर मराठीत ‘माझ्या नवऱ्याची बायको’, ‘अजूनही बरसात आहे’ या मालिका केल्या. संजय खान दिग्दर्शित महाभारताचे ५२ एपिसोड्सना ते सहाय्यक दिग्दर्शक होते. तसेच ‘झिपऱ्या’ या कादंबरीवर चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला.
मराठीमध्ये ‘कळत नकळत’ या त्यांच्या पहिल्या मालिकेनंतर ‘अग्गं बाई अरेच्चा’ या चित्रपटासाठी मुख्य सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले. मालिकांविषयी बोलताना ते म्हणाले की, “हिंदी मालिकांमध्ये मजकूर न बघता फेमस हिरो घेतला जातो. मराठी मालिकांमध्ये मजकूर बघून भूमिका साकारली जाते. वेगवेगळ्या भूमिका पार पाडताना कलाकाराबरोबरच कॅमेराही बोलका असला पाहिजे”, असे केदार वैद्य म्हणतात. ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांची ‘झिपऱ्या’ ही कादंबरी वाचताना त्यांच्यातला आत्मविश्वास वाढला आणि त्यांनी यावर चित्रपट करण्याचे ठरवले. या चित्रपटाचे शूटिंग पाहण्यासाठी अरुण साधू आले, तेव्हा त्यांनी “ही कादंबरी मी योग्य माणसाच्या हातात दिली आहे”, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आणि तो माझ्यासाठी मोलाचा क्षण होता असं वैद्य म्हणाले; परंतु साधू यांच्या निधनामुळे हा चित्रपट त्यांनी पाहिला नाही याची खंत त्यांना लागून राहिली. ‘एशियन फिल्म फेस्टिव्हल’मध्ये या चित्रपटाची निवड झाली, हे बघायला ते आता हवे होते, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. वाचनाची आवड असणारा हा दिग्दर्शक एक संवेदनशील माणूससुद्धा आहे याची प्रचिती यावेळी आली.
पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…
व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…
महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…
मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…
बंगळुरू : कर्नाटकचे माजी पोलीस महासंचालक अर्थात माजी डीजीपी ओम प्रकाश यांची राहत्या घरातच हत्या…
मुंबई : कोणे एके काळी राष्ट्रपती पुरस्कार विजेता ठरलेला पोलीस अधिकारी आता जन्मठेपेची शिक्षा भोगणार…