
- निसर्गवेद : डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
गरुड हा पक्ष्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. अतिशय चालाक, बुद्धिमान, वेगवान, विशाल आकार, रहस्यमयी आणि सर्वश्रेष्ठ असा हा पक्षी. याच्या अनेक प्रजाती आहेत. भारतीय, सुवर्ण, टक्कल, इबेरियन, बोनेलीचे, बुटलेले, हार्पी, ठिपक्यांचा, पाणगरुड, मत्स्य, नेपाळी, पहाडी अशा अनेक गरुडांच्या प्रजाती आहेत. न्यूगिनीमध्ये आढळणारा पिग्मी गरुड ही गरुडाची सर्वात लहान जाती आहे.
हा टक्कल गरुड फक्त उत्तर अमेरिकेतच आढळतो. मला गरुडातील काही गोष्टी प्रकर्षाने आवडतात. कारण गरुड आपल्या मुलांना जगात कठोर प्रशिक्षण देतात आणि त्यांना जीवन जगायला शिकवतात. काळ बदलला तरी पक्ष्यांच्या गुणांमध्ये फरक पडत नाही. मानवाने स्वतःच्या कर्तृत्वाने काळ बदलला आणि स्वतःच्या गुणांची जागा दुर्गुणांना जास्तीत जास्त दिली. गरुड श्रेष्ठत्व आणि शक्तीचे प्रतीक आहे. त्यांचे उड्डाण उच्च आहे आणि त्यांचे डोळे देखील तीक्ष्ण आहेत. त्यांच्याकडे आश्चर्यकारक दृष्टी आहे. ते तीन ते चार किलोमीटर अंतरावरून सुद्धा त्यांची शिकार पाहू शकतात. मला त्यांचा वेग आणि धैर्य खूप आवडते. हा प्रचंड आकाराचा शक्तिशाली शिकारी पक्षी आहे. याला टक्कल गरुड म्हणतात, पण त्याच्या डोक्यावर अनेक पिसे आहेत, ते पायबाल्ड या शब्दावरून आले आहे. त्यांचे डोके पांढरे आणि बाकीचे शरीर तपकिरी रंगाचे आहे.
याच्या पायावर सुद्धा खूप पिसे असतात. त्यांचे वजन तीन ते सात किलोग्रामपर्यंत असते. त्यांच्या पंखांचा विस्तार साडेसहा ते सात फुटांपर्यंत असतो. गरुडाच्या पंज्यांमध्ये मजबूत शक्ती असते. हे गरुड ४ ते ५ वर्षांपर्यंत तरुण होतात. यांची वयोमर्यादा ३० ते ३५ वर्षांची असते. जेव्हा हे पक्षी प्रौढ होतात, तेव्हा यांचे शरीर जड होते, चोच वाकू लागते. यांची पिसे तपकिरी आणि कमकुवत होतात त्यामुळे हे पक्षी योग्यरीत्या शिकार करू शकत नाही. नर टक्कल गरुड मादीपेक्षा लहान असतात. मादी नरापेक्षा २५ टक्क्याने मोठी असते. खरंतर दोघेही दिसायला जवळजवळ सारखेच असतात. ते त्यांच्या आयुष्याच्या जोडीदारासोबत कायमचे राहतात. गरुड पक्ष्याचा हा गुण घेणे आवश्यक आहे. गरुडाची जोडी जेव्हा आनंदात असते, तेव्हा आकाशामध्ये एकमेकांच्या पंज्यांना धरून वेगवेगळी कलाबाजी करत असते. गरुड दोन दिवससुद्धा उपाशी राहू शकतो. अन्न आणि हवामानानुसार ते आपला परिसर निवडतात. अन्न आणि निवारा असेल तिथेच त्यांना राहायला आवडते. त्यामुळे पक्षी एकाच ठिकाणी राहत नाही, स्थलांतर करीत राहतात. गरुड जवळजवळ १० हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतात. मादी आणि नर मिळून घरटे बांधतात. घरटे गवत, पीस आणि काड्यांचे बनलेले असते. काही वेळेला ते खूप मोठे घरटे बनवतात. जगातील सर्वात मोठे घरटे फ्लोरिडाजवळील तलावात वीस फूट खोल आणि ९ फूट उंच आणि २ टनांपेक्षा जास्त वजनाचे आढळले आहे. ज्याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली. प्रत्येक पक्षी मला पाहायला मिळालाच असे नाही; परंतु वाचन आणि प्रत्यक्ष फोटो बघून त्यावर मी माझा अभ्यास करून, मगच या कलाकृती केलेल्या आहेत.
जेव्हा गरुडाचे चित्र काढायचे ठरवले, तेव्हा त्याच्या बालपणापासून वयोवृद्ध होण्यापर्यंतचे बदल टिपले आणि मग तरुण आणि वयोवृद्ध अशा गरुडाच्या कलाकृती केल्यात. माझ्या एका कलाकृतीत या तरुण टक्कल गरुडाचा मी सूक्ष्म कागद कात्रण कलाकृतीमध्ये गरुडाच्या शरीराचा समोरील भाग बनविला आहे, तर दुसऱ्या एका कलाकृतीत वयस्कर गरुड बनविला आहे. प्रत्येक पंख वेगळा कापला आहे. अगदी पापणीच्या लहान पिसांपासून ते त्यांच्या पंखापर्यंत. या लहान आणि सूक्ष्म कागद कात्रण कलाकृतीमधील तरुण टक्कल गरुडाचे चित्र “लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड” २०१६ च्या पृष्ठ क्रमांक १६६ वर आहे. तरुण गरुडाच्या तपकिरी पंखांमध्ये बाह्य रेखा पांढरी दिसते.
तपकिरी आणि सोनेरी रंगाचे पंख असूनही, प्रत्येक पंख स्वतंत्रपणे दिसतो. हा अतिशय सुंदर आणि विशाल पक्षी या कलाकृतीमध्ये थ्रीडी इफेक्टमध्ये फक्त ५६ सेमी × ४६ सेमी आणि दीड इंच खोलीमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पक्ष्यांचे बदलते जीवनमान त्यांच्या शारीरिक रचनेतून समजून येते. त्यांच्या चेहऱ्यावर आपल्यासारख्या सुरकुत्या दिसत नाहीत, तर त्यांचे डोळे, चोच आणि पिसे यांचा रंग आणि रचना बदलल्या जातात. गंमत म्हणजे स्वभाव सुद्धा बदलला जातो. गरुडाच्या भव्य स्वरूपामुळे आणि स्वातंत्र्यामुळे ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. प्राचीन संस्कृतीत गरुड हे एक महत्त्वाचे प्रतीक आहे. जे हिंदू धर्मग्रंथांमध्ये दिसून आले आहे. गरुड दिसला की, आपल्यासाठी शुभेच्छा आणि अाध्यात्मिक मार्गदर्शन मानले जाते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये गरुड विष्णूचे वाहन मानले जाते तसेच प्राचीन ग्रंथ गरुड पुराणामध्ये आत्म्याचे रहस्य, स्वर्ग आणि नरक यांचे वर्णन आहे. गरुड पुराण म्हणजे मोक्षप्राप्ती आणि आत्मज्ञानाचे साधन आहे म्हणजेच आपल्या आत्म्याला बळ देणारा गरुडासारखा शक्तिशाली असा हा ग्रंथ आहे.
आजच्या तारखेत, पर्यावरणीय असमतोलामुळे, ही प्रजाती आता कमी होत आहे. पण तरीही मोठे आणि मजबूत गरुड कुठेतरी आढळतात. १६६२मध्ये अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केलेला हा पक्षी पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर होता, कारण त्यांची शिकार केली जाऊन त्यांच्या पंखांचा वापर सजावटीसाठी केला जात होता. शिवाय पिकांवर केलेल्या डीडीटी फवारणीमुळे होणारी विषबाधा. त्यामुळे आता अमेरिकेने त्यावर कडक कायदे केले आणि पूर्णपणे त्यांना संरक्षण दिले म्हणून त्यांची संख्या परत वाढत आहे. आपण सर्वांनी आपापल्या परीने पक्ष्यांचे संरक्षण करावयास हवे. पूर्वी प्राणी आणि मानव सर्वांचेच शरीर खूप मजबूत आणि शक्तिशाली असायचे, पण जसा मानवाने निसर्गाचा दुरुपयोग करायला सुरुवात केली, तशी त्यांची प्रतिकारशक्ती आणि ऊर्जा कमी होत गेली. त्यामुळे निसर्गही आपली साथ सोडू लागला आहे.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com