- गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी
ज्येष्ठ होणं कठीण आहे. प्रतिष्ठा सुरक्षित ठेवून कुटुंबात नादायचं असेल, तर ज्येष्ठता आचार-विचारांत दिसली पाहिजे. १९९१ पासून १ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून अधिकृत साजरा केला जातो. एकटेपणातून आलेल्या असुरक्षिततेमुळे आपला उर्वरित वेळ कसा सत्कारणी लावावा, यावर ऊहापोह व्हावा म्हणून हा लेख.
वृद्धत्व म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील साठीनंतरचा शेवटचा टप्पा. हे म्हातारपणातील बालपण! ज्येष्ठ नागरिक अडगळ नव्हे आधार! सकारात्मक ऊर्जेचा स्रोत!
दोन पिढीत होणारा संघर्ष नवा नाही. प्रत्येकजण कधीतरी ज्येष्ठ होणारच आहे. आज घराघरांत ज्येष्ठ नागरिकांबरोबर होणारे गैरवर्तन, अन्याय रोखण्यासाठी, ज्येष्ठाच्या जीवनमानावर परिणाम करणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी, त्या नवीन पिढीला समजाव्यात या हेतूसोबतच वडीलधाऱ्याच्या कर्तृत्वाला संबोधित करून, त्यांच्या योगदानावर प्रकाश टाकून, आदराने त्याचा सन्मान करण्यासाठी १९८८मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांच्या प्रयत्नातून प्रथम २१ ऑगस्ट दिनी, नंतर १९९१ पासून १ ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन’ म्हणून अधिकृत साजरा केला जातो.
२१व्या शतकातील वृद्धत्व : आजचा ज्वलंत प्रश्न! वृद्धांची मुख्य चिंता ‘आरोग्य, पालनपोषण आणि आधार.’ पूर्वी ज्येष्ठांना घरात मान होता. काळ बदलला आजच्या ज्येष्ठ नागरिकांनी, नोकरी करून निगुतीने संसारात मिळते-जुळते घेऊन आधीच्या पिढीला सांभाळले. आजचे ज्येष्ठ आर्थिक स्वतंत्र असूनही, पुढील पिढीचा स्ट्रेस, गतिमानता, स्वतंत्र मनोवृत्तीही सांभाळत आहे. नातवंडांच्या वेळापत्रकानुसार आजच्या ज्येष्ठांची जीवनशैली ठरते.
अतिशय काही सन्मानीय अपवाद वगळता, शहरांत अगदी चांगल्या घरातसुद्धा भिंतीच्या आंत आवाज न होता ते ग्रामीण भागातील तळागाळापर्यंत एकच प्रतिध्वनी ऐकायला, पाहायला अनुभवायला मिळते, ‘मुले आई-वडिलांना विचारत नाहीत.’ प्रॉपर्टी / पैशासाठी मुलाकडून सतत होणाऱ्या वाढत्या दबावाखाली आई-वडिलांना जगणे नकोसे होते. ग्रामीण भागात सर्व शेतीवर किंवा मजुरीवर अवलंबून असल्याने त्याच्या हातात काही नाही. आजच्या पिढीत व्यावहारिकता वाढल्याने, गावी ज्येष्ठ नागरिक खूप दुर्लक्षित असून त्यांचे दिवस कठीण आहेत. आधार हा किरकोळ भाग असतो, त्यांना कुठेतरी व्हेंटिलेट व्हायचे असते. शहरांत आर्थिक सोय असूनही मुल आई-वडिलांना घराबाहेर काढतात असेच प्रतिबिंब पाहतो.
या संदर्भात माझ्या मैत्रिणीच्या आईची आईच्या… चार पिढ्या आधीची घटना. आजोबा अचानक वारले. १३व्या दिवशीच सहा भाऊ वाटणी करायला बसले. भावामधील भांडणाचा चढा आवाज ऐकताच, कधीही बाहेरच्या ओटीवरही न आलेली, कधीही एक शब्द न बोलणारी माझी आजी त्या दुःखात बोलती झाली, “हे घर माझं आहे, तुम्ही सारे चालू लागा. नवऱ्याचा भात आहे मी माझ्या मुलींना सांभाळीन.” त्या आजी ९६ वर्षे स्वाभिमानाने जगल्या. स्वतःचे प्रश्न स्वतःच सोडवायचे असतात.
२१व्या शतकांत वृद्धांपुढे सर्वात मोठे आव्हान एकटेपणातून आलेल्या असुरक्षिततेमुळे ज्येष्ठ नागरिक चिंतेत आहेत. मानसिक आधाराचा आभाव, शारीरिक मर्यादा, मुले परदेशात आणि साथीदार साथ संपल्यावर, आपला उर्वरित वेळ कसा सत्कारणी लावावा यावर ऊहापोह व्हावा म्हणून हा लेख.
२०२३ची थीम आहे, ‘एजिंग अनबाऊंड’ वयानुसार येणारे वृद्धत्व जे आपल्या हाती नाही. भा. ल. महाबळ यांच्या ज्येष्ठांसाठीच्या पुस्तकातला काही भाग –
आजकाल एकाच घरांत राहणारे परस्परांशी अनोळख्यासारखे वागतात. कोणी कुणाचं ऐकत नाही, जो तो आपल्या मनाप्रमाणे वागतो. ‘आमच्या घरी प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे’. आपसांत संवाद नाही. ‘माझं मी पाहीन, तुमचं तुम्ही पाहा ’हा अलिप्तपणा. असे कौटुंबिक जीवन हीच शोकांतिका वाटू लागते. एकत्र बसणं, बाहेर जाऊन आल्यावर शेअर करणं हे आज दुर्मीळ झालं आहे. घरातले काहीच माहीत नसते तेव्हा वाईट वाटते. आजी-आजोबांच्या गप्पातून कुटुंबाचे सुख पुढे सरकतं.’ आज मूल जे पाहतं व शिकतं तेच मोठेपणी आचरणात आणतं. ज्या घरात नातवंड आजी-आजोबा यांच्यात सलोखा असतो, ते घर गोकुळ असते.
निवृत्तीनंतर संसारातील खो-खोच्या खेळात, आजी-आजोबांनी एक-एक असे दोन खांब व्हावे. खांब खेळांत भाग घेत नाही. खांब परिवाराला खेळताना पाहतो. या खेळाडूंना खेळताना मध्येच खांबाचा आधार लागतो तो आधार वृद्धांनी मन न दुखवता द्यावा.
ज्येष्ठ होणं कठीण आहे. प्रतिष्ठा सुरक्षित ठेवून कुटुंबात नादायचं असेल, तर ज्येष्ठता आचार-विचारांत दिसली पाहिजे. निवृतांनी तीन माकडाची मूर्ती सतत स्मरणांत ठेवावी. कमी बोला, कमी पाहा व कमी ऐका. त्याचबरोबर मनावर ताबा, जिभेवर नियंत्रण ठेवत सर्वांना हुरूप देणे, प्रोत्साहित केल्यास कुटुंबात दिवस चांगले जातील.
ज्येष्ठांनी सरकारी योजनांचा फायदा घ्यावा. कवियत्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठातर्फे १००० विद्यार्थ्यांना ‘ज्येष्ठ नागरिक सहायता दूत’ म्हणून प्रशिक्षण दिले गेले. ते विद्यार्थी विद्यापीठ परिक्षेत्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करतात. मेधा आणि माधवी कुलकर्णी यांचा १००० सदस्यत्वाचा फेसबुकवर वृद्धांचा पालकत्व हा ग्रुप असून त्याच्या समस्या, त्यावर उपाय, त्याचे अनुभव, विचार, शेअर केले जातात. विरंगुळा केंद्र ज्येष्ठांच्या कलागुणांना वाव देते.
जीवन सुंदर आहे, जगायला शिकूया! निवृत्ती मनाने स्वीकारा. निवृत्तीनंतर गुणवत्ता पूर्ण जीवन जगायचे असेल, तर स्वतःला फिट ठेवा. खूप फिरा. व्यस्त राहा, मस्त राहा. तरीही महिला पटकन बाहेर पडू शकत नाही.
नोकरीपेक्षा निवृत्तीनंतर जास्त व्यस्त अशा मी माझ्या अनेक सहकाऱ्यांना पाहत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञानामधील संकल्पना प्रयोगातून स्पष्ट करणारे माझे सहकारी श्री. व सौ. थोरात आणि कदम सर स्वतःच्या गावी आपल्या शाळेतील तसेच इतरही मुलांसाठीही शिक्षणक्षेत्रांत पूर्णवेळ कार्यरत आहेत. बँकेच्या नोकरीतून अचानक कीर्तनाकडे वळलेल्या सविता कुलकर्णी पद्धतशीर कीर्तनाच्या परीक्षा देत कीर्तन करण्यासाठी बाहेर असतात. एक मैत्रीण घराजवळच्या हॉस्पिटलमध्ये रोज संध्यकाळी दोन तास पेशंट, नर्स यांना मदत करण्यासाठी विनामूल्य वेळ देते. नोकरीचा त्रास मी अनुभवलाय. सुनेला नोकरी करायला सांगून आनंदाने नातवाला सांभाळणाऱ्या आज्या मी पाहते. वयाच्या ६२ वर्षी ट्रेकिंगला सुरुवात करणारे शशिकांत व संगीता दर शनिवारी पुण्यातील अनेक ट्रेकिंग ग्रुपबरोबर डोंगर चढतात.
आयुष्यात आधी जे करायचे राहिले आहे तो छंद आता अभ्यासपूर्ण वाढावा. संगणक मित्र व्हा. सर्वत्र उत्सुकता ठेवा, झालेले बदल शिकण्याची पाहण्याची. स्वतःचा ग्रुप वाढवा.
वार्धक्यात ‘मनाची उभारी’ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट. मानसिक स्वास्थ्यासाठी योग आणि अध्यात्म हवे. वार्धक्यात मार्ग बदलणे सोपे नाही पण अवघडही नाही. ‘आपली स्वायत्तता टिकवून ठेवणे आपल्याच हाती’. ज्येष्ठत्व राखा.