Friday, July 5, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलSandal : चंदनाची बाग

Sandal : चंदनाची बाग

  • कथा : रमेश तांबे

उन्हात मेहनत करणाऱ्या लोहाराला बघून राजाच्या मनात विचार आला, आपल्या राज्यातील सगळे लोक एवढे सुखी असताना या लोहाराला एवढे कष्ट का पडावेत? म्हणून लोहाराचे आयुष्य बदलून टाकण्यासाठी राजाने त्याला चंदनाची बाग भेट दिली. पण…

फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. एक होता राजा. तो खूप पराक्रमी, न्यायी आणि दानी होता. त्याच्या राज्यातील प्रजा सुखी आणि समाधानी होती. आपल्या राज्यातील सर्व लोक सुखी आहेत, याचा राजाला खूूप अभिमान वाटत असे.

एक दिवस राजा आपल्या राज्यात फेरफटका मारत होता. तो बाजारपेठांमध्ये गेला, मंदिरांमध्ये गेला, लोकांच्या वस्त्यावस्त्यांतूून फिरला. सगळीकडे लोक त्याला खूप आनंदी आणि समाधानी दिसले. मग असाच फिरत फिरत तो गावाच्या वेशी बाहेर आला. राजाने समोरचे दृश्य पाहिल्यावर त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण तिथे लोहाराची एक कळकट मळकट झोपडी होती. छतावर गवत आणि तटक्यांच्या भिंती होत्या. बाहेर त्या लोहाराचा भाता होता. तो एका हाताने भाता ओढत होता. दुसऱ्या हाताने लोखंड गरम करत होता आणि नंतर गरम लोखंडावर घणाचे घाव घालत होता. तो घामाने पूर्ण भिजून गेला होता. एवढ्या उन्हात मेहनत करणाऱ्या लोहाराला बघून राजाला त्याची दया आली आणि राजाच्या मनात विचार आला, आपल्या राज्यातील सगळे लोक एवढे आनंदी, सुखी, समाधानी असताना या लोहाराला एवढे कष्ट का पडावेत? एवढ्या गरिबीत तो का राहावा? म्हणून राजा घोड्यावरून खाली उतरला आणि लोहाराच्या जवळ गेला. लोहाराने आपले काम थांबवले. तो लगबगीने उठला आणि महाराजांना त्याने हात जोडून नमस्कार केला. महाराज म्हणाले, “लोहारा किती रे कष्ट करतोस, किती रे मेहनत घेतोस. घामाने पूर्ण भिजून गेला आहेस. मला तुझी दया येते आहे. आपल्या राज्यातील सर्व लोक एवढे सुखी, समाधानी आणि मजेत राहात असताना तुला मात्र दारिद्र्यात राहावं लागतंय हे मला पटत नाही. म्हणून तुझे आयुष्य बदलून टाकण्यासाठी मी तुला चंदनाची बाग भेटत आहे.” राजाची मोहर असलेला कागद त्यांनी लोहाराच्या हातात दिला आणि म्हणाले,” जा आजपासून ती चंदनाची सगळी बाग तुझीच. मग राजा मोठ्या समाधानाने परतला.

राज्यकारभार पाहता पाहता वर्ष कसे निघून गेले हे राजाला कळलेच नाही आणि एक दिवस राजाला सहज आठवले. अरे गेल्या वर्षी आपण एका लोहाराला चंदनाची बाग भेट दिली होती. पाहूया तर खरं त्याचे आयुष्य किती बदलले आहे ते. म्हणून राजा पुन्हा फेरफटका मारत मारत वेशीच्या बाहेर पोहोचला आणि समोरचे दृश्य आश्चर्याने बघतच राहिला. कारण समोरची लोहाराची झोपडी पूर्वीपेक्षाही अत्यंत खराब दिसत होती. तोच लोहार, तोच भाता आणि त्याचं तेच काम समोर सुरू होतं. राजाला आश्चर्य वाटलं. आपण एवढी चंदनाची बाग दिली. त्या बागेचं त्याने काय केलं हे विचारावं म्हणून म्हणून राजा झटपट घोड्यावरून खाली उतरला आणि लोहाराकडे गेला. राजाने लोहाराला विचारलं,
“अरे लोहारा तुला मी एक चंदनाची बाग भेट दिली होती. तिचं तू काय केलंस!”

“महाराज, काय करणार माझ्यासारखा लोहार माणूस! माझ्या कुऱ्हाडीला दांडा नव्हता, म्हणून मी मस्तपैकी एक दांडा बनवून घेतला आणि नंतर वर्षभर त्या चंदनाच्या बागेतली लाकडं मी माझ्या भट्टीमध्ये सरपण म्हणून वापरतोय. राजाने कपाळाला हात लावला आणि म्हणाला, “अरे वेड्या ती चंदनाची बाग होती चंदनाची! मग राजा लोहाराला म्हणाला, “जरा बाजारात जा आणि या कुऱ्हाडीच्या दांंड्याचे किती पैसे येतात तेवढे घेऊन ये.”

लोहार बाजारातून परत येईपर्यंत राजा तिथेच बसूून होता. थोड्याच वेळात लोहार धावत धावत आला आणि महाराजांना मला म्हणाला, “महाराज मला माफ करा. मी नाही ओळखू शकलो चंदनाला. चंदनाच्या एका दांड्याची किंमत दहा हजार रुपये! महाराज एवढे पैसे मी माझ्या आयुष्यातही कधी पाहिले नव्हते. एका दांड्याचे दहा हजार तर संपूर्ण बागेचे मला किती पैसे मिळाले असते. माझ्या मूर्खपणामुळे, माझ्या अज्ञानामुळे सगळी बाग जळणासाठी सरपण म्हणून वापरली. दया करा आणि मला पुन्हा एकदा चंदनाची अशीच एक बाग भेट द्या. महाराज म्हणाले, “अशा गोष्टी पुनः पुन्हा मिळत नसतात. तेव्हाच तू विचारपूर्वक वागायला हवं होतं. आता ती वेळ निघून गेली आहे.” राजाने घोड्याला टाच मारली आणि तो निघून गेला. इकडे लोहार आपल्या कपाळाला हात लावून आपल्या कर्माला दोष देत बसला.

बालमित्रांनो, आपले जीवनदेखील अशीच एक चंदनाची बाग आहे. तिचा वापर कसा करायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे. पण लोहारासारखी आपली परिस्थिती होऊ नये यासाठी आपण सावध राहायलाच हवं. होय ना!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -