Friday, March 28, 2025
Homeसाप्ताहिककोलाजKonkan Temples : ३६० चाळ्यांचा अधिपती - श्री देव घोडेमुख देवस्थान

Konkan Temples : ३६० चाळ्यांचा अधिपती – श्री देव घोडेमुख देवस्थान

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान, भक्तांच्या हाकेला धावणारे श्री देव घोडेमुख. शरीराच्या कोणत्याही अवयवाचे दुखणे असेल, तर या ठिकाणी नवस बोलला जातो. हा नवस फेडताना त्या अवयवाच्या मातीची प्रतिकृती देवाला वाहिली जाते.

वेंगुर्ला तालुक्याअंतर्गत येणारे मातोंड-पेंडूर गाव. प्राचीन परंपरा लाभलेला हा गाव. मातोंड-पेंडूर गावाचे ग्रामदैवत व श्री शंकराचे रूप अशी ख्याती कीर्ती असलेले, दक्षिण कोकणातील जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध पावलेले ३६० चाळ्यांचा अधिपती श्री देव घोडेमुख देवस्थान. सिंधुदुर्गातील सावंतवाडी-मळेवाड मार्गावरून ये-जा करणारे भक्तगण आवर्जून जिथे नतमस्तक होतात, हे देवस्थान मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली या चतु:सीमेवरचं एक जागृत मानलं जातं. तळकोकणतील जवळजवळ सर्व रहिवाशांना या देवस्थानचे महात्म्य आणि प्रथा माहीतच आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० ते ९०० मी. उंचीवर हिरव्यागार झाडात डोंगराच्या कुशीत हे मंदिर असून उंच डोंगराच्या माथ्यावर बसून श्री देव घोडेमुख साऱ्या परिसराचं रक्षण करतो, अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. सावंतवाडी-मळेवाड मार्गावरून ये-जा करणारे भक्तगण श्री देव घोडेमुखाकडे नतमस्तक होऊनच पुढे मार्गक्रमण करतात. मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली या चतु:सीमेवर हे जागृत देवस्थान आहे.

मंदिराच्या आत पाषाणमय देवाची मूर्ती, मंदिराच्या चारही बाजूला तटबंदी आहे. मळेवाड-सावंतवाडी या रस्त्याच्या बाजूला श्री देव घोडेमुखाचा सुंदर मंदिर दिसतं. तिथूनच डोंगरावर मंदिराकडे रस्ता गेला आहे. कधी चढती, कधी वळण, तर कधी झाडाला वळसा देऊन हा रस्ता मंदिराच्या तटबंदीपर्यंत जातो. तटबंदीला पायऱ्यांची व्यवस्था आहे. भाविक व पर्यटकांच्या सोयीसाठी देवस्थान समितीने डोंगराच्या पायथ्याशी विहीर खणून पाइपलाइनद्वारे मंदिरापर्यंत पाणी आणून भाविकांची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे. मंदिरात प्रवेश केल्यावर समोरच विलोभनीय दृश्य पाहून आलेला थकवा नाहीसा होतो. तटबंदीवरून खाली मातोंड, पेंडूर, मळेवाड, न्हावेली गावांचा विस्तीर्ण परिसर दिसतो.

या देवस्थानाबद्दल गावात ज्या आख्यायिका ऐकिवात येतात, त्यावरून असे कळते की, एक सत्पुरुष सरदार, जे सावंतवाडी संस्थानात सेवा बजावत असत. ते जेव्हा आपल्या घरी परतत, तेव्हा न्हावेली गावाची सीमा ओलांडून मातोंड-पेंडूर गावात प्रवेश करीत तेव्हा त्यांचा घोडा थबकून उभा राही. काही केल्या पाऊल उचलत नसे. जेव्हा ते त्यावरून पायउतार होत, तेव्हा तो अश्व चालू लागे. सातत्याने असे घडू लागल्यावर त्यांनी याबाबत, तेव्हाचे आचार्यगुरू यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांना श्री शिवशंकराच्या या रूपाबद्दल दृष्टांत झाला आणि तेव्हा श्री घोडेमुख देवाचे लिंगरूपी पाषाण, डोंगर माथ्यावर घनदाट गर्द वनात शोधून त्यांनी तिथेच प्रस्थापित केले. अश्वामुळे या दैवताची प्राप्ती झाली, त्यामुळे या दैवताला घोडेमुख असे संबोधले गेले. या मातोंड-पेंडूर गावात अश्वावर आरूढ होणे निषिद्ध आहे. इतकेच नाही तर गावातल्या कुणालाही अश्वारूढ होता येत नाही जेणेकरून देवतेचा अपमान होईल. ज्या वनात जंगलात श्री घोडेमुखाचे वास्तव्य आहे त्याला “युवराचे रान” असे नाव होते; परंतु श्री घोडेमुख देव स्थापन झाल्यावर, त्याला त्यांच्याच नावे ओळखले जाऊ लागले. जसजसा काळ उलटत गेला, तसतशी देवंस्थानाची कीर्ती सर्वत्र पसरत गेली. गावाच्या परंपरेनुसार पुढे या देवस्थानाचे धार्मिक विधी सुरू झाले.

३६० चाळ्यांचा अाधिपती म्हणून ख्याती असलेला तसेच भक्तांच्या हाकेला धावणारा व नवसाला पावणारा अशी भाविकांची श्रद्धा आहे. श्री देव घोडेमुखाला शरीराच्या कुठल्याही अवयवाच्या प्रतिकृतीचे दान करण्याची प्रथा आहे. असे केल्यास अवयवाला असणारे दुखणे कायमचे थांबते, अशी भाविकांची समजूत आहे. मातोंड गावच्या देवस्थानाची देवदीपावली दिवशी, सातेरी मंदिरात मांजी बसते. यानंतर सलग चार दिवस या मंदिरात जागर होत असतो. पाचव्या दिवशी म्हणजेच घोडेमुखाच्या जत्रोत्सवादिवशी, सकाळी गावकर मंडळी सातेरी मंदिरात जमून मेळेकरी भूतनाथ व पावणाई या देवांच्या तरंगकाठ्यासह, घोडेमुख देवस्थानाकडे डोंगर चढून येतात. श्री देव घोडेमुख क्षेत्रात केळी, नारळ, गोड पदार्थ नैवेद्य दाखवला जातो. भुतनाथ व पावणाईदेवीला तेथे गोडा उपहार दाखवण्यात येतो. यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक मोठ्या श्रद्धेने, श्री देव घोडेमुखला कोंबड्यांचा मान देण्यासाठी दाखल झालेले असतात. भाविक आपल्या मनोकामना गावकऱ्याद्वारे गाऱ्हाण्याच्या स्वरूपात श्री देव घोडेमुखाकडे मांडतात. त्यानंतर सायंकाळी खऱ्या अर्थाने डोंगर उतारावरूनच श्रीदेव घोडेमुख चरणी कोंबड्यांचा मान देण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होते. जवळपास २० ते २५ हजार कोंबड्यांचा मान या जत्रोत्सवात देण्यात येतो. सायंकाळच्या वेळेस हा मान देण्याचा कार्यक्रम आटोपल्यानंतर, पावणाई व भुतनाथ अवसारासह खाली येऊन पुन्हा सातेरी मंदिराकडे रवाना होतात. असंख्य भाविकांच्या गर्दीने श्री देव घोडेमुखाचे क्षेत्र फुलून जाते. मंदिराच्या पायथ्याशी भाविकांचा जत्रोत्सवासाठी मोठा जनसागरच लोटतो. सकाळपासूनच मोठ्या उत्साहात श्री देव घोडेमुखाच्या क्षेत्रात विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होते. या जत्रोत्सवात सहभागी होण्यासाठी चाकरमानीही मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, देशाच्या कानाकोपऱ्यांतून मोठ्या प्रमाणात दाखल होतात.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -