- विशेष : नयना भगत , प्रवक्ता, सनातन संस्था
पूर्वापार चालत असलेल्या परंपरा पाळण्याचा अनेकजण प्रयत्न करतात. असे असले, तरी तथाकथित पुरोगामी मंडळींकडून हिंदूंच्या अन्य सणांप्रमाणे श्राद्धपक्षाच्या संदर्भात हिंदूंचा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करून हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक वेळा अज्ञानापोटीही काही प्रथा पडल्याचे दिसून येते. ‘पितृपक्ष आणि श्राद्ध यांच्या संदर्भात धर्मशास्त्र काय म्हणते आणि पुरोगाम्यांकडून नोंदवले जाणारे आक्षेप कसे चुकीचे आहेत’, हे लोकांना समजावे, यासाठी प्रस्तुत लेखाचे प्रयोजन!
टीका १ : या महिन्यात (प्रामुख्याने पितृपंधरवड्यात) अनेकजण महत्त्वाची कामे करत नाहीत. ज्यांना पैसे द्यायचे नसतात किंवा कोणते तरी काम टाळायचे असते, असे लोकही याचे कारण सांगून कामे टाळतात.
खंडन : पितृपंधरवडा (महालय) निषिद्ध किंवा अशुभ मानण्याची मजल लांबपर्यंत गेलेली आहे की, या पंधरवड्यात ‘विवाह’ हा शब्दही उच्चारला जात नाही. मग विवाहविषयक बोलणी करणे, स्थळांना भेटी देणे, विवाह निश्चिती इत्यादी गोष्टी पुष्कळ दूर राहतात. प्रत्यक्षात प्राथमिक सिद्धता इत्यादी कोणत्याही गोष्टींसाठी पितृपंधरवडा आड येत नाही. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’)
दुसरे सूत्र असे की, ‘शास्त्रात रूढिर्बलीयसी’ (शास्त्रापेक्षा रूढी अधिक बलवान ठरते) असे म्हणतात. त्यामुळे पितृपक्षात शक्यतो कोणत्याही शुभकार्याची सिद्धता केली जात नाही; पण याला शास्त्राधार नाही.
टीका २ : ज्या वेळी कावळ्याला ‘बाप’ म्हणून घास टाकतो, त्या वेळी एका कावळ्याने स्पर्श केला, तर एक वेळ समजू शकतो; पण एकाच वेळी १०-१२ कावळ्यांनी चोच मारली, तर त्याचा काय अर्थ काढायचा? अन् तोच कावळा दुसऱ्याच्या गच्चीवर बसला, तर त्याचाही काय अर्थ काढायचा? ही सर्व ढोंगबाजी आहे. फसवाफसवी आहे. चाळवाचाळवी आहे. आपल्यासाठीच आपण हे सर्व करत असतो.
खंडन : श्राद्धात पिंडदानाच्या माध्यमातून पितरांचे आवाहन करून त्यांच्या अतृप्त इच्छा पिंडाच्या माध्यमातून पुरवल्या जातात. सर्वसामान्य माणसात वासनांचे प्रमाण अधिक असते, म्हणून त्याच्या लिंगदेहातून विषम म्हणजे रज आणि तम प्रधान विस्फुटित लहरी बाहेर पडतात. कावळा हा अधिकाधिक विषम लहरी आकर्षित करून घेणारा प्राणी आहे; म्हणून त्याला या लहरी जाणवतात. पितरांचा लिंगदेह पिंडाकडे आकृष्ट होतो, तेव्हा पिंड विषम लहरींनी भारित होतो. या लहरींकडे कावळा आकृष्ट होतो. पितर श्राद्धस्थळी येऊन त्यांची तृप्ती झाल्याचे सूचक म्हणजे पिंडाला कावळा शिवणे. यालाच ‘कावळ्याने घास घेणे’, असे म्हणतात. अशा प्रकारे वासना असलेले लिंगदेह आणि माणसे यांच्यामधील कावळा हा एक दुवा (माध्यम) आहे. (संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध : महत्त्व व शास्त्रीय विवेचन’)
हे शास्त्र लक्षात घेतल्यास पिंडाला एकाच वेळी अनेक कावळ्यांनी स्पर्श करणे, ही श्राद्धाच्या वेळी आवाहन केलेल्या अनेक पितरांची तेथील उपस्थिती दर्शवते. श्राद्धविधीत कावळा हा केवळ एक माध्यम असतो, हे समजून घेणे आवश्यक आहे. हिंदू धर्माने सांगितलेल्या चार ऋणांमध्ये पितृऋणाचाही समावेश आहे. कावळ्याला विशेष दृष्टी लाभली आहे. मुळात श्राद्धपक्ष हे केवळ दिवंगत वडिलांसाठी नाही, तर दिवंगत पूर्वजांसाठी करतात. त्यामुळे ‘एकाच्या ऐवजी अनेक कावळे पिंडाला शिवतात किंवा एकच कावळा अनेक पिंडांना शिवतो’, असे म्हणणे हास्यास्पद आहे. हे म्हणजे ‘एकच शिक्षक वेगवेगळ्या वर्गातील विद्यार्थ्यांना विषय कसा शिकवतो’, अशी शंका उपस्थित करण्यासारखे आहे.
टीका ३ : मेल्यावर दहावा, तेरावा, पितर घालण्यापेक्षा जिवंतपणी चांगले सांभाळा. सन्मान द्या. ती खरी सेवा ठरेल.
खंडन : ‘नातेवाईक जिवंत असताना त्यांचा योग्य सांभाळ करणे’, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे, असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. ‘मृत्यूनंतरचा प्रवास सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी’, यांसाठी हिंदू धर्माने श्राद्धविधी करण्यास सांगितले आहेत. ‘श्राद्ध करा आणि जिवंतपणी वडीलधाऱ्यांना त्रास द्या’, असे कुठेही सांगितलेले नाही. कर्माचा सिद्धांत अन् पुनर्जन्म न मानणारेच असा प्रचार करू शकतात.
टीका ४ : पूर्वजांची सेवा करायचीच असेल, तर आपली पूर्ण वंशावळ जमवा. पूर्वजांचे स्मरण राहावे, म्हणून छोटी छोटी पुस्तके छापा. त्यांच्या स्मरणार्थ विधायक कार्य करा. शाळा, वाचनालय, वैद्यकीय सेवा, सामाजिक काम करणाऱ्या संघटनांना साहाय्य करा. जुनी वहिवाट पूर्ण बंद करून नवीन चालू करा,
म्हणजे समाजात नवीन चांगल्या प्रथा निर्माण होतील.
खंडन : छोटी छोटी पुस्तके छापण्यासाठी किंवा सामाजिक कार्य करण्यासाठी कोणाची आडकाठी नाही; पण त्यासाठी ‘श्राद्धपक्षाला फाटा द्या’ हा कुठला तर्क? ‘श्राद्धाऐवजी सामाजिक कार्य करा’, असे म्हणणे ‘एखाद्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याऐवजी त्या पैशांतून सामाजिक कार्य करा’, असे म्हणण्याएवढे हास्यास्पद आहे. अध्यात्म हे अनुभूतींचे शास्त्र आहे. अनुभूती येण्यासाठी तो तो विधी अथवा आज्ञा श्रद्धेने करावी लागते. ती न करताच फाटे फोडत बसणे; म्हणजे ‘साखरेची चव घेण्याची वृत्ती न ठेवताच ‘साखरेची गोडी पटवून द्या’, असे आवाहन करण्यासारखे आहे.
तथाकथित पुरोगामी मंडळी हिंदू धर्मातील प्रथा-परंपरा यांवर सातत्याने द्वेषमूलक टीका करून श्राद्धाविषयी सामान्य हिंदूंमध्ये विकल्प निर्माण करत आहेत. अमेरिकेतील हॉलिवूड अभिनेते सिल्व्हेस्टर स्टॅलोन यांनी भारतात येऊन त्यांच्या मुलाचे श्राद्ध केले होते. प्रत्येक वर्षी असंख्य विदेशी श्राद्ध करण्यासाठी भारतात येतात. यंदाही नायजेरिया, रशिया, युनायटेड किंगडम आदी अनेक देशांतून येथून विदेशी लोक श्राद्धविधी करण्यासाठी गया आदी ठिकाणी आले होते. जुनी वहिवाट बंद करून नव्या प्रथा चालू करण्याचे आवाहन करण्याचे पाश्चात्त्य खूळ अंगी असणाऱ्यांनी अनेक पाश्चात्त्य व्यक्ती भारतातील तीर्थक्षेत्री येऊन श्राद्धादी विधी करतात, तर अनेक विदेशी हे श्राद्धावर संशोधनही करत आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. कथित पुरोगाम्यांच्या धर्मविरोधी कारस्थानांना बळी न पडता हिंदूंनी ‘श्राद्ध’ या हिंदू धर्मातील विधीकडे सकारात्मक आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीने पाहणे आवश्यक आहे.
पितृपक्ष आणि श्राद्धविधी करण्याचे महत्त्व
हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक असते. माता-पिता तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा, त्यांना सद्गती मिळावी, यांसाठीचा संस्कार म्हणजेच ‘श्राद्ध.’ या वर्षी २९ सप्टेंबर ते १४ ऑक्टोबर या कालावधीत पितृपक्ष आहे. प्रतिवर्षी पितृपक्षातील कृष्णपक्षात महालय श्राद्ध केले जाते. श्राद्धविधी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आचार असून त्याला वेदकाळाचाही आधार आहे. अवतारांनीही श्राद्धविधी केल्याचा उल्लेख आढळतो. श्राद्धातील मंत्रोच्चारांमध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म-शक्ती सामावलेली असते.
१. श्राद्ध शब्दाची व्युत्पत्ती आणि अर्थ : ‘श्रद्धा’ या शब्दापासून ‘श्राद्ध’ हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले, त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते, ते ‘श्राद्ध’ होय.
२. श्राद्ध शब्दाची व्याख्या : ब्रह्मपुराणाच्या ‘श्राद्ध’ या प्रकरणात श्राद्धाची पुढील व्याख्या दिली आहे.
देश काले च पात्रे च श्रद्धया विधिना च यत्।
पितृनुदि्दश्य विप्रेभ्यो दत्तं श्राद्धमुदाहृतम्।।
अर्थ : देश, काल आणि पात्र (योग्य स्थळ) यांना अनुलक्षून श्रद्धा आणि विधी यांनी युक्त असे पितरांना उद्देशून ब्राह्मणांना जे (अन्नादी) दिले जाते, त्याला श्राद्ध म्हणावे.
३. श्राद्धविधीचा इतिहास : ‘श्राद्धविधीची मूळ कल्पना ब्रह्मदेवाचा पुत्र अत्रिऋषी यांची आहे. अत्रिऋषींनी त्यांच्या वंशातील निमीला ब्रह्मदेवाने घालून दिलेला श्राद्धविधी सांगितला. तो रूढ आचार आजही चालू आहे. मनूने प्रथम श्राद्धक्रिया केली; म्हणून मनूला श्राद्धदेव म्हणतात. लक्ष्मण आणि जानकी यांसह राम वनवासासाठी गेल्यानंतर भरत त्यांची वनवासात भेट घेतो अन् त्यांना पित्याच्या निधनाची वार्ता सांगतो. त्यानंतर ‘राम यथाकाली वडिलांचे श्राद्ध करतो’, असा उल्लेख रामायणात आहे. ऋग्वेदकाली समिधा आणि पिंड यांची अग्नीत आहुती देऊन केलेली पितृपूजा म्हणजे अग्नौकरण, पिंडांची तिळांनी शास्त्रोक्त केलेली पूजा म्हणजे पिंडदान (पिंडपूजा) आणि ब्राह्मणभोजन या इतिहासक्रमाने रूढ झालेल्या श्राद्धाच्या तीन अवस्था आहेत. सांप्रत काळातील ‘पार्वण’ श्राद्धात या तीनही अवस्था एकत्रित झाल्या आहेत. धर्मशास्त्रात हे श्राद्ध गृहस्थाश्रमी लोकांना कर्तव्य म्हणून सांगितले आहे.
४. श्राद्ध करण्याचे उद्देश : पितृलोक प्राप्त झालेल्या पितरांना पुढच्या लोकांत जाण्यासाठी गती मिळावी, यासाठी श्राद्धविधींद्वारे त्यांना साहाय्य करणे. आपल्या कुळातील ज्या मृत व्यक्तींना त्यांच्या अतृप्त वासनांमुळे सद्गती प्राप्त झाली नसेल, म्हणजेच ते उच्च लोकात न जाता नीच लोकात अडकून पडले असतील, त्यांच्या इच्छा-आकांक्षा श्राद्धविधींद्वारे पूर्ण करून त्यांना पुढची गती प्राप्त करून देणे.
५. पितृपक्षात श्राद्ध करण्याचे महत्त्व आणि पद्धत : पितृपक्ष हे हिंदू धर्मात सांगितलेले व्रत असून भाद्रपद प्रतिपदेपासून अमावास्येपर्यंत प्रतिदिन महालय श्राद्ध करावे, असे शास्त्रवचन आहे. पितरांसाठी श्राद्ध न केल्यास त्यांच्या इच्छा अतृप्त राहिल्यामुळे कुटुंबीयांना त्रास होण्याची शक्यता असते. श्राद्धामुळे पितरांचे रक्षण होते, त्यांना गती मिळते आणि आपले जीवनही सुसह्य होते. पितृपक्षात एक दिवस पितरांचे श्राद्ध केले असता, ते वर्षभर तृप्त राहतात. पितृपक्षातही श्राद्ध करणे शक्य नसल्यास ज्या तिथीला आपला पिता मृत झाला असेल, त्या दिवशी या पक्षात सर्व पितरांच्या उद्देशाने महालय श्राद्ध करण्याचा परिपाठ आहे. योग्य तिथीवरही महालय श्राद्ध करणे अशक्य झाल्यास पुढे ‘यावद्वृश्चिकदर्शनम्’ म्हणजे सूर्य वृश्चिक राशीला जाईपर्यंत ते कोणत्याही योग्य तिथीला केले, तरी चालते.
६. पितृपक्षात दत्ताचा नामजप करण्याचे महत्त्व : दत्ताच्या नामजपाने पूर्वजांना गती मिळण्यास आणि त्यांच्या त्रासांपासून रक्षण होण्यास साहाय्य होत असल्याने पितृपक्षात प्रतिदिन दत्ताचा जास्तीत जास्त नामजप करावा. या काळात प्रतिदिन न्यूनतम ७२ माळा नामजप करण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या महान ऋषीमुनींनी दिलेला ‘श्राद्ध’रूपी अनमोल संस्कृतीधनाचा वारसा जपण्याची सद्बुद्धी सर्वांना लाभो, तसेच श्राद्धविधी श्रद्धेने करता येऊन आपल्या पूर्वजांची तसेच स्वतःचीही उन्नती साधता येवो, ही श्री ईश्वरचरणी प्रार्थना.
(संदर्भ : सनातन संस्थेचे ग्रंथ ‘श्राद्ध : महत्त्व व शास्त्रीय विवेचन’, ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’ आणि ‘श्राद्धातील कृतींमागील शास्त्र’)
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra