
माझी वही
आईने आणली
मला वही
म्हणाली यात
हवं ते लिही...
मग आईवरच लिहिली
एक कविता
वाचतो ती मी
येता जाता...
नंतर लिहिली
सशाची कहाणी
आणखी दोन
पावसाची गाणी...
कुणाला सुटेना
अवघड गणित
मीच सोडवले
अचूक वहीत...
हवेच्या दाबाचा
प्रयोगही लिहिला
ज्यात आला होता
नंबर पहिला...
भरपूर विषय
एकाच वहीत
सुचेल तसे
बसलो लिहीत...
आई म्हणाली,
“अरे सारेच यात
वहीचे जणू
अनेक हात”...
शेवटी घेतली
आईची सही
अहो, सजून गेली
माझी वही...
काव्यकोडी : एकनाथ आव्हाड
१) कागद केवढा
आहे ढवळा
कधी काळा
कधी सावळा
रात्री चमचम
चमकत राहतो
दिवसा कोण मात्र
लख्ख होतो?
२) असतो चिवट
काहीसा फिकट
खूप खूप गोड
आरोग्याला जोड
रस फुलांमधला
पोळ्यांमध्ये साठला
काम मधमाशांचं
ओळखा नाव त्याचं?
३) तळ्यामध्ये फुलते
वाऱ्यावरी डोलते
चिखलात राहून
प्रसन्न बोलते
राष्ट्रीय फुलाचा
मिळे त्याला मान
पाकळ्या फुलताच
कोण हसे छान?
उत्तर :-
१) आकाश
२) मध
३) कमळ