मुंबई: कोकण रेल्वे(kokan railway) मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांकडून प्रचंड संताप व्यक्त केला आहे. मध्य रेल्वे मार्गावरच्या पनवेल ते कळंबोली या स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे शनिवारी रूळावरून घसरले. त्यामुळे कोकणच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत होत्या. इतकंच नव्हे तर आजही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहे.
मालगाडीचे डबे घसरले
पनवेल येथून वसईच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे पाच डबे शनिवारी दुपारच्या सुमारास रूळावरून घसरले. यामुळे या पनवेल ते कळंबोली या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. दरम्यान, याच मार्गावरून कोकण रेल्वेचाही प्रवास होत असतो.
मालगाडीला झालेल्या अपघातामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. आजही अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या. रेल्वेने अचानक गाड्या रद्द केल्याने प्रवाशांकडून चांगलाच संताप व्यक्त करण्यात आला. संतप्त प्रवाशांनी दिवा स्थानकात रेल रोको केला. यामुळे लोकलची वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलीस तसेच रेल्वे प्रशासनाने यात लक्ष देत वाहतूक पूर्ववत केली. तब्बल ४० मिनिटे प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली होती. त्यानंतर लोकलची वाहतूक सुरळीत करण्यात आली.
प्रवासी त्रस्त
मालगाडीचे डबे घसरल्याने कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती प्रवाशांना दिली न गेल्याने प्रवासी अधिक संतप्त झाले आहेत. रेल्वेने जर ही माहिती आधीच दिली असती तर प्रवासाला निघालोच नसतो अशी प्रतिक्रिया प्रवासी देत आहेत.अनेक रेल्वे स्थानकांवर कोकण रेल्वे तासनतास उभे आहेत. यामुळे प्रवासी अधिक त्रस्त झाले आहेत.