Monday, July 15, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBirthday : ‘वाढ’दिवस

Birthday : ‘वाढ’दिवस

  • प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ

सोशल मीडियापूर्वी ‘वाढदिवस’ हा केवळ जवळच्यांनाच माहीत असण्याची गोष्ट होती. ‘वाढदिवस’ ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. जवळच्यांनी एकत्र येऊन साजरी करायची गोष्ट आहे. पण हल्ली वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धती बदलल्या आहेत.

साधारण वीस-पंचवीस वर्षांपूर्वी सुखसोयींच्या कमतरतेमुळे आयुष्यात खूप धावपळ असायची. कधीकधी तर लोकांना साधा स्वतःचा वाढदिवस आठवायचा नाही आणि मग आपल्या नवऱ्याचा किंवा बायकोचा वाढदिवस एकमेकांना आठवणे, त्यापलीकडची गोष्ट. या गोष्टीवरून अनेक जोडप्यांमध्ये भांडणंही व्हायची. आता अलीकडे आपल्याला लक्षात नसेल तरी फेसबुक आपला वाढदिवस लक्षात आणून देतो, आपल्याला आणि आपल्या हजारो फ्रेंडलिस्टमधल्या लोकांनाही, ज्यांना आपण कधी फेस टू फेस भेटलेलो नसतो किंवा भेटणारही नसतो! हे सर्व लोक आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, किती छान ना! लक्षात न ठेवताही आपल्याला आपला वाढदिवस आठवतोच! अहो इथपर्यंत ठीक आहे; परंतु फेसबुक वापरणारे स्वतःच्या बायकोच्या/नवऱ्याच्या, मुलांच्या, नातवंडांच्या, मेहुणीच्या, वहिनीच्या, भाच्यांच्या, मित्र-मैत्रिणींच्या, बहीण-भावांच्या, आई-वडिलांच्या, सासू-सासऱ्यांच्या इत्यादी सगळ्यांच्या वाढदिवसावरच्या पोस्ट टाकतात… लग्नवाढदिवसाच्याही! त्या पोस्ट स्वाभाविकपणे खूपच स्तुतिसुमने उधळणारी असतात. कदाचित त्या त्यांच्या प्रामाणिक भावनाही असू शकतील! त्यांच्या भावनांचा मी आदर करते. पण फेसबुक उघडल्यावर दिवसागणिक शंभरच्या वर वाढदिवसाच्या पोस्ट असतात. या त्यांच्या आनंदाच्या प्रसंगी आपण काय करू शकतो, तर कमीत कमी एक लाइक, जवळचे असतील, तर लव्ह टाकतोच आणि अतिजवळचे असतील, तर कमेंटसुद्धा! याने ज्याचा वाढदिवस आहे त्याला आणि आपल्याला कितपत समाधान मिळते, याचा मी विचार करत होते.

‘फेसबुक’च्या जन्मापूर्वी ‘वाढदिवस’ हा केवळ जवळच्या लोकांनाच माहीत असण्याची गोष्ट होती. पण ही मर्यादित माणसं म्हणजे कुटुंबीय व जवळचे मित्र-मैत्रिणी फार तर शेजारपाजारचे छोटेखानी पद्धतीने घरगुती वाढदिवस साजरा करायचे. त्यात प्रेम जिव्हाळा असायचा. छोट्या-मोठ्या भेटीही एकमेकांना दिल्या जायच्या त्याची किंमतही खूप जास्त वाटायची! एक छोटीशी भेटवस्तूसुद्धा हजार लाइकपेक्षा मोलाची वाटायची. आताशा सहसा घरात वाढदिवस साजरे होतच नाहीत. वेगवेगळ्या ग्रुपला दोन-तीन दिवस वेगवेगळ्या हॉटेलमध्ये बोलावून वाढदिवस साजरे करण्याची पद्धत रूढ होत चाललेली आहे.

अलीकडे माझ्या एका शेजाऱ्याच्या चार वर्षांच्या मुलीचा वाढदिवस साजरा करायचा होता. त्या हॉटेलची अट अशी की, साधारण तिच्या वयाच्या एक-दोन वर्ष मोठे किंवा लहान वयाचीच मुले तिथे यायला हवीत. पालक जसे शाळेत मुलं सोडतात तसे पालकांनी त्या हॉटेलच्या दारात मुलांना सोडायचे…

आत जायचे नाही आणि एका ठरावीक वेळेस म्हणजे दोन- तीन तासांनी त्यांना घ्यायला जायचे! ज्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्या आई-वडिलांनी, सगळ्या मुलांचे तिथे स्वागत करायचे आणि त्या मुलांची जबाबदारी घ्यायची. ज्या मुलाचा वाढदिवस आहे त्याच्या पालकांनी सोडून कोणीही त्या सभागृहात असणार नाही ही दुसरी अट!

म्हणजे काय तर अगदी घरातले आजी-आजोबासुद्धा कटाप! किती भयानकेकडे आपण चाललेलो आहोत. कुटुंबाला वगळून केलेला वाढदिवस, दोन-तीन तासांच्या फोटो आणि व्हीडिओपुरते केलेले खर्चिक डेकोरेशन, लहान मुलांच्या खाण्यापिण्याच्या आवाक्याबाहेरचा मेन्यू, महागडे रिटर्न गिफ्ट तसेच आणखी कितीतरी गोष्टी!

आता तुम्ही म्हणाल हा लेख लिहायला तुम्हाला काय जातंय! आमचा पैसा, आमचा आनंद!

अगदी बरोबर आहे. हल्ली प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्यासुद्धा बदलल्या आहेत ‘आम्ही सर्व’, ‘आपण दोघे’ आणि आता ‘मी’ म्हणजेच मी करेल तो कायदा आणि माझा आनंद!

अनेक गोष्टींबद्दल वाईट वाटत राहते, पण आपण काहीच करू शकत नाही. कोणत्याही हॉटेलमध्ये वाढदिवस साजरा करायला गेल्यावर प्रत्येक माणूस वेगवेगळा पदार्थ ऑर्डर करतो आणि आपलाच पदार्थ खातो. पहिल्या टेबलावर बसलेला माणूस तिसऱ्या टेबलावर बसलेल्या माणसाशी हॉटेलमध्ये दोन तास बसूनही संवाद साधू शकत नाही. अजूनही मला वाटतं की, ‘वाढदिवस’ ही खूप वैयक्तिक गोष्ट आहे. जवळच्यांनी एकत्र येऊन साजरी करायची गोष्ट आहे. जे पदार्थ घरामध्ये बनवलेले आहे ते सगळ्यांनी एकत्रित बसून एकमेकांशी गप्पा करत खाण्यात आनंद आहे! असो…माझी मुलगी चौदा वर्षांची होईपर्यंत आम्ही घरातले चौघेही म्हणजे आम्ही दोघे आणि माझे सासू-सासरे तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिला घेऊन आमच्या घराजवळील ‘चिल्ड्रेन्स होम’, मानखुर्द येथे जायचो. वर्षभरात तिचे वापरून झालेले जुने कपडे (संस्थेच्या अटीनुसार वापरण्यायोग्य) याशिवाय खाऊ, खेळणी आणि शालेय अभ्यासाचे सामानही घेऊन जायचो. त्यांचा चेहरावरचा आनंद आजही माझ्या डोळ्यांसमोर जसाच्या तसा आहे; त्याचे कदाचित कोणतेही फोटो आणि व्हीडिओ माझ्याकडे नाहीत आणि ते काढले नाहीत, हेही या क्षणी बरेच वाटते आहे.

त्यानंतर आजच्या काळचक्रात अडकून मुलगीसुद्धा तिचे वाढदिवस साजरे करत आहे. पण त्या वाढदिवसाच्या दिवशी जमले नाही, तर मागेपुढे केव्हातरी जाऊन त्या ‘चिल्ड्रन होम’ला जरूर भेट देते, ही गोष्ट मात्र मनाला समाधान देणारी आहे.वाढदिवसाच्या दिवशी फक्त शरीराने वाढू नका, मनाने तर वाढाच; परंतु विचारानेही प्रगल्भ व्हा! सर्वांना वर्षभरात एकदा हमखास येणाऱ्या ‘वाढ’दिवसाच्या शुभेच्छा!

pratibha.saraph@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -