पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विलासपूर येथील जाहीर सभेत घणाघात
रायपूर (वृत्तसंस्था): ‘आता लोकसभा आणि विधानसभेच्या ३३ टक्के जागा महिलांसाठी राखीव असतील. आमच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यावर स्वाक्षरी करून कायदा बनवला. हा प्रश्न काँग्रेसने ३० वर्षे लटकत ठेवला होता. आता ते नवीन खेळ खेळत आहेत. माता-भगिनींमध्ये निर्माण झालेल्या जागृतीमुळे ते घाबरले असून माता-भगिनींमध्ये जातीयवादातून फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी विलासपूर येथील जाहीर सभेत केला. ‘आत्तापर्यंत गरिबांसोबत कोणीही जितका अन्याय केला नसेल तितका अन्याय काँग्रेसने केला आहे. कारण कोविडच्या काळात आम्ही गरिबांना रेशन देण्याचा निर्णय घेतला. पण छत्तीसगडमधील काँग्रेसच्या सरकारने यामध्येही घोटाळा केला’, असा घणाघातही मोदी यांनी केला.
छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी इथल्या गरीब जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे.जर छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आले तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये पक्की घरे बांधून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मोदींनी यावेळी दिले आहे.
भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या समारोपासाठी मोदी शनिवारी बिलासपूरमध्ये दाखल झाले. जय जोहरने भाषणाची सुरुवात करताना ते म्हणाले की, ‘छत्तीसगडमध्ये यावेळी सत्ता बदलाचा निर्णय झाला आहे. आमचा एकच नेता आहे, कमल, आमचा एकच उमेदवार आहे, कमल. प्रत्येक बूथवर कमळ फुलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. छत्तीसगडच्या काँग्रेस सरकारने तरुणांचा विश्वासघात केला आहे. मात्र भाजपचे सरकार येताच ‘पीएससी’ घोटाळ्याची चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल’ असे आ्वासन मोदींनी यावेळी दिले. तसेच ‘औ नही साहिबो, बादल के रहिबो’ असा बदलाचा नारा त्यांनी दिला.
छत्तीसगडच्या बिलासपूर येथे पंतप्रधान मोदींच्या ‘परिवर्तन महा संकल्प रॅली’चे आयोजन करण्यात आले होते. गेल्या तीन महिन्यांतील पंतप्रधान मोदींचा हा तिसरा छत्तीसगड दौरा आहे. या वर्षाच्या अखेरीस राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. रमण सिंह यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारचा छत्तीसगड विधानसभेच्या २०१८ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून पराभव झाला होता. विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी भाजपने गेल्या महिन्यात २१ जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
गरीबांना पक्की घरे देणार
दरम्यान, जर छत्तीसगडमध्ये भाजप सत्तेत आले तर पहिल्याच कॅबिनेटच्या बैठकीत राज्यातील सर्व गरीबांना पक्की घरं बांधून देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मोठे आश्वासनही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिले.
मोदींच्या ६ दिवसांत ८ सभा
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता फारसा वेळ उरलेला नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जाते. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरामच्या विधानसभा निवडणुकीत विरोधीपक्षांच्या एकजुटीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः मैदानात उतरले आहेत. येत्या सहा दिवसांत, सोमवार ते शनिवार या ६ दिवसांत ५ राज्यांपैकी चार राज्यांना मोदी भेट देणार आहेत. चारही ठिकाणी त्यांच्या जाहीर सभा प्रस्तावित आहेत. निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्याआधीच पंतप्रधान मोदी निवडणूक मोडमध्ये आले आहेत.
मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तेलंगणाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. १ ऑक्टोबरला महबूबनगर जिल्ह्याचा दौरा केल्यानंतर पीएम मोदी ३ ऑक्टोबरला निजामाबादला पोहोचतील. दोन्ही ठिकाणी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. याशिवाय पंतप्रधान मोदी जाहीर सभांनाही संबोधित करणार आहेत. तेलंगणात नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे.
गांधी जयंतीला मध्य प्रदेशात
पंतप्रधान मोनी २ ऑक्टोबर गांधी जयंतीला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरला भेट देणार आहेत. तेथे दोन जाहीर सभा घेणार आहेत. ५ ऑक्टोबरला मोदी पुन्हा मध्य प्रदेश दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. जबलपूर आणि जगदलपूरमध्ये ते जाहीर सभा घेऊ शकतात.