Tuesday, April 22, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सKonkan Ganeshotsav : गणपती गेले गावाक...

Konkan Ganeshotsav : गणपती गेले गावाक…

  • मनातले कवडसे : रूपाली हिर्लेकर

यंदा जायचं म्हणजे जायचंच… असा ठाम निश्चय करून मी अखेर या वर्षी गौरी गणपतीच्या सणासाठी गावाला गेले. आमचं गाव टिपिकल कोकणातलं. कोकणात गौरी गणपतीचा सण म्हणजे एक सोहळाच असतो. यावर्षी देवगडमधील आमच्या मुणगे गावात बऱ्याच वर्षांनी जाण्याचं भाग्य मला लाभलं. त्यामुळे मनात एक वेगळीच ओढ व धाकधूकही वाटत होती.

आमच्या लहानपणी बाबा नेहमी भरपूर खाऊ घेऊन गावी जात. तसंच मीही भरपूर मिठाई, चिवडा, लाडू असा बराच खाऊ नातेवाईक आणि बालगोपाळांसाठी घेऊन गेले. ज्यादा ट्रेन विलंबाने निघाल्यामुळे आम्हाला पोहोचेपर्यंत थोडा उशीरच झाला. पण प्रवासात आजूबाजूला दिसणारी हिरवळ पाहताच आमची मरगळ दूर निघून गेली. हा हिरवा साज मला सांगत होता की, आता लवकरच माझं गाव येणार आहे! कणकवलीला उतरून लगेचच आम्ही रिक्षा केली. रिक्षातून जाताना तोच आठवणीतला गंध मनात पुन्हा दाटला. गावची माती, चुलीचा धूर, गौरी गणपतीच्या उत्सवामध्ये येणारा अगरबत्ती, धूप व कापराचा विशिष्ट सुगंध असे अनेक वास त्यात मिश्रित झालेले होते आणि त्या सुवासात बघता बघता माझं मन थेट बालपणीच्या आठवणीत हरवून गेलं.

थोड्या वेळाने गावची शाळा, मग आमचा सडा आणि अखेर गावच्या प्रवेश द्वारापाशी आम्ही येऊन पोहोचलो. पटापटा सामान उतरवून घरात गेलो. दारात येताच तांब्याच्या गडव्यातून आमच्या पायांवर पाणी टाकलं गेलं आणि भाकरीचा तुकडा ओवाळून फेकला गेला. स्वागत करण्याची ही जुनी पद्धत आजही गावात टिकून होती. घरात प्रवेश केल्यानंतर गणपतीच्या मूर्तीला सर्व प्रथम लांबून नमस्कार केला. बाप्पाची प्रसन्न मूर्ती पाहताच प्रवासाचा सर्व शीण पार उडून गेला आणि पुन्हा ताजंतवानं वाटू लागलं. नमस्कार व पूजा करून बाप्पाला म्हटलं, खूप वर्षांनी इथं आलेय खरी, पण माझ्या मनात तर तू कायमच आहेस ना! मग घरातील सर्वांना भेटायला निघाले. स्वयंपाकघरात वहिनीची जेवणाची गडबड चालू होती. कारण आमचं कुटुंब तसं फार मोठं आहे. त्यामुळे जेवणाची जय्यत तयारीही मोठीच असते. आज गणपतीला आवडणारे मोदक तसंच चपाती आणि काळा वाटाणा उसळ, वरणभात, पालेभाजी आणखीन एक गोड पदार्थ असा खास बेत होता. आरतीची वेळ होताच आम्ही आरत्या म्हणण्यासाठी टाळ, मृदंग, घंटा हाती घेतल्या आणि दणक्यात आरतीला सुरुवात झाली. आरत्या म्हणताना सर्वांनाच बाबांची खूप आठवण आली. कारण, जेव्हा जेव्हा बाबा गावी येत, तेव्हा आरतीच्या वेळी ते छान मृदंग वाजवत. गावी गेल्यावर बाबांचं एक निराळंच रूप आम्हाला पाहायला मिळे. गावी ते नेहमीपेक्षा खूप सहज व मोकळे-ढाकळे वाटत. त्यांचं आणि गणपतीचं नातं तर खूप वेगळंच होतं. मला वाटे की आपलं आणि बाप्पाचंही असंच नातं जमावं.

आरती झाल्यावर बापाला नैवेद्य दाखवून आम्ही सुग्रास जेवणाचा आस्वाद घेतला. दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमीच्या दिवशी खास असं अळूचं फदफदं हे बाप्पाच्या नैवेद्यात असतं. आशिवाय इतरही बरेच पदार्थ असतात. त्यासाठी आम्ही वहिनीला यथाशक्ती मदत केली. गणपतीला ऋषीची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला. गावच्या पाण्याची व घरच्या नारळाची चव छान असल्यामुळे जेवण खूपच रुचकर झालं होतं. तिसऱ्या दिवशी एकादशीची पूजा होती. यात अथर्वशीर्षाची आवर्तनं केली जातात. सारं वातावरण त्या मंत्रांनी पवित्र होऊन गेलं. संध्याकाळच्या आरतीची मजा काही औरच असते. गावातला एक ग्रुप ठरलेला असतो. ते लोक प्रत्येकाच्या घरात जाऊन आरत्या आणि भजनं म्हणतात. या आरत्यांमध्ये आम्ही “आरती ज्ञानराजा” म्हणताना असा काही सूर धरायचो की आरती म्हणताना टाळ व टाळ्यांची अक्षरशः स्पर्धा लागे. त्या दिवशी प्रथम गावातील देवळात आणि नंतर आमच्या घरी भजन होतं. भजनी मंडळींसाठी घरी पावभाजीचा मोठा बेत ठरला. जवळजवळ १५० ते २०० लोकांची पावभाजी आम्ही घरातच बनवली होती. सर्वजण खाऊन आनंदाने तृप्त झाले. सर्वांबरोबर एकत्रित खाण्याची मजा काही वेगळीच असते. ती फक्त गावाकडेच अनुभवायला मिळते.

नंतरच्या दिवशी गौरीचं आगमन झालं. गौरीचं आगमन हा तर आणखीन एक मोठा सोहळा असतो. माहेरवाशिणींनी गौरी आणण्याची प्रथा असल्यामुळे गवर आणण्यासाठी घरातील सर्व लेकी-सुना विहिरीवर निघाल्या. कारण गौरी माता पाण्यातून येते असं मानलं जातं. विहिरीच्या पाण्यानेच मग गौरीच्या पाच खड्यांची व पाच रोपांची पूजा करण्यात आली. त्यानंतर ती हिरवी बहरलेली गवर कलशात ठेवून घरात आणण्यात आली. मग बाप्पाला, देवघरातील देवतांना स्वयंपाक घराला आणि घरच्या सर्व सदस्यांना तिला भेटवलं गेलं. त्याच रात्री गौरीचा सुंदर मुखवटा चढवून तिला नवीन दागिने आणि नवीन साडी नेसवून छान नटवून-थटवून, सजवून तयार करण्यात आलं आणि ती गणपतीच्या बाजूला विराजमान झाली. त्यादिवशी रात्री गौरी जागरणाचा कार्यक्रम असतो. सर्व लेकी-सुनांनी एकत्र येऊन गौरीची गाणी म्हटली. ताल धरत पारंपारिक नृत्यंही केली. पाचव्या दिवशी गौरी गणपतीच्या विसर्जनाचा दिवस आला तसे आमच्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले. कारण या ५ दिवसांत गौरी आणि गणपती जणू आमच्या घरचेच सदस्य बनून गेले होते. “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…” असा जयघोष करत आम्ही बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीच्या काठी निघालो. तिथे गणपतीचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईहून गावी आलेल्या कोण्या छोट्या चिमुरडीने विचारलं, “हे बाप्पा पाण्यातून गेले तरी कुठे?” त्यावर तिची आजी तिला म्हणाली, “अगो, गणपती गेले त्यांच्या गावाक!” आजीने नातीला समजावत पदराच्या टोकाने तिचे आणि हळूच स्वतःचेही डोळे पुसले.

गणपतीला निरोप देऊन आम्ही घरी परतलो. सणासुदीचे पाच दिवस कसे सरकन निघून गेले ते कळलंही नाही. गौरी गणपतीचे आशीर्वाद व गावच्या मधुर आठवणी आमच्यासोबत कायम राहणार आहेत, हा आनंद व दिलासा सोबत घेऊन आम्हीही मग नाईलाजाने परतीच्या प्रवासाला लागलो.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -