Saturday, March 22, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखFather of Green Revolution : हरितक्रांतीचा जनक

Father of Green Revolution : हरितक्रांतीचा जनक

  • प्रा. अशोक ढगे

आयातदार देशाची प्रतिमा बदलून अन्नधान्याच्या बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महत्त्वाच्या धुरिणांपैकी एक प्रमुख नाव म्हणजे स्वामीनाथन. त्यांच्या प्रयत्नांमुळे १९६०च्या दशकात हरितक्रांती यशस्वी झाली, म्हणूनच त्यांना हरितक्रांतीचे जनक मानले जाते. शेतीत हरितक्रांती करणाऱ्या स्वामीनाथन यांचे गणेश विसर्जनाच्या दिवशीच निधन झाले. त्यांच्या कार्याचा आवाका समजून घेण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.

कृषिप्रधान देश असल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. अजूनही ५९ टक्के लोक शेतीवर अवलंबून आहेत. शेतीला प्राधान्यक्षेत्राचा दर्जा असला, तरी त्याच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होते. शेतीसंबंधी अनेक धोरणे आखण्यात आली, तरीही निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या जीवनात शाश्वत उत्पन्नाचा कोणताही मार्ग अजून तरी सापडलेला नाही. भारतातील लोकांची अन्नधान्याची गरज भागवण्यासाठी परदेशातून आयात करावी लागत होती. मिलो गव्हावर भारताची गरज भागवली जात होती. आयातदार देश अशी भारताची असलेली प्रतिमा बदलण्यामागे स्वामीनाथन यांचा हात होता.

स्वामीनाथन यांच्या कुटुंबात संशोधनाचा वारसा आहे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर मोठा अहवाल दिला होता. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची शिफारस केली होती. ही शिफारस अमलात आणण्याची आश्वासने राजकीय पक्षांनी जाहीरनाम्यात दिली. त्यावर निवडणुका जिंकल्या. सत्तेवर आल्यानंतर मात्र ग्राहकहीत लक्षात घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले. सर्वोच्च न्यायालयात स्वामीनाथन समितीच्या शिफारशी लागू करता येणार नाहीत, असा अहवाल दिला. शेतकऱ्यांच्या जीवनात सुगीचे दिवस आणण्यासाठी अहर्निश झटणाऱ्या स्वामीनाथन यांची ओळख जागतिक कीर्तीते महान कृषी शास्त्रज्ञ म्हणून केली जात होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लोकांना सशक्त करण्याचा सर्वात मोठा आणि प्रभावी मार्ग म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पादन चांगले आणि जास्तीत जास्त असेल याची खात्री करणे. त्यामुळे देशातील शेतकरी समृद्ध होऊन अर्थव्यवस्थेत आपली भूमिका बजावू शकतील. भारताच्या अर्थव्यवस्थेला संकटाच्या काळात कायम शेती क्षेत्राने आधार दिला; परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या आश्वासनांचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र क्रांती करणारे स्वामीनाथन यांनी वैद्यकीय क्षेत्रात अभ्यास सुरू केला; पण नंतर त्यांची शेतीमध्ये आवड निर्माण झाली. स्वामीनाथन एकदा म्हणाले होते, की ‘अशक्य’ हा शब्द प्रामुख्याने आपल्या मनात असतो आणि आवश्यक इच्छाशक्ती आणि परिश्रम दिल्यास महान कार्ये पूर्ण करता येतात. त्याचा सरळ अर्थ असा होतो की, ‘अशक्य’ काहीही नसते. इच्छाशक्ती आणि प्रयत्नांच्या जोरावर अशक्य ते शक्य करता येते.

स्वातंत्र्यानंतर १८ वर्षांनी, धान्य उत्पादनात लक्षणीय घट होत होती आणि दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होऊ लागली होती. अशा परिस्थितीत भारतासारख्या विशाल देशाला केवळ दुष्काळापासून वाचवायचे नव्हते, तर अर्थव्यवस्थेला चालना द्यायची होती, अशा परिस्थितीत स्वामीनाथन यांनी प्रतिकूल परिस्थितीतही भारताला या समस्येतून वाचवले होते. त्यांनी गव्हाचे उत्कृष्ट उत्पादन देणारे वाण विकसित केले. त्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळाली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही शेतकऱ्यांना कोणीही शिक्षित केले नाही. त्यामुळे दुष्काळासारखे प्रश्न निर्माण होऊ लागले. कृषीप्रधान देशात शतकानुशतके पिकांच्या वाढीसाठी उपकरणे आणि बियाण्यांमध्ये सुधारणा झाली नव्हती. स्वामिनाथन हे पहिले व्यक्ती होते, ज्यांनी गव्हाचे उत्कृष्ट वाण ओळखले आणि शेतकऱ्यांना त्याची जाणीव करून दिली. त्यांना शेतकऱ्यांचा मसिहा म्हटले जाते. १९६० च्या दशकात भारत मोठ्या प्रमाणात दुष्काळाच्या उंबरठ्यावर होता. त्या वेळी स्वामीनाथन यांनी नॉर्मन बोरलॉग आणि इतर शास्त्रज्ञांसोबत गव्हाचे एचवायव्ही बियाणे विकसित केले. १९४३ मधील बंगालचा दुष्काळ आणि देशातील अन्नटंचाई अनुभवल्यानंतर स्वामीनाथन यांनी कृषी क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला होता. बटाटा, तांदूळ, गहू, ताग इत्यादींवरील संशोधनाचे श्रेय त्यांना जाते. त्यांनी भारतीय कृषी संशोधन परिषद आणि आंतरराष्ट्रीय भात संशोधन संस्थेचे महासंचालक म्हणून काम केले. १९७९ मध्ये ते कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव होते. १९८८ मध्ये स्वामिनाथन हे निसर्ग आणि नैसर्गिक संसाधनांच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय संघाचे अध्यक्ष झाले. १९९९ मध्ये टाईम मासिकाने त्यांचा विसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आशियाई लोकांच्या यादीत समावेश केला होता. आपले भविष्य सुधारण्यासाठी उच्च दर्जाच्या वाणांसह शेती करणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी भारताच्या कायाकल्पाचा नवा अध्याय लढून नव्हे, तर शांतपणे प्रत्येक बीज रोवून लिहिला. त्यांनी गरीब शेतकऱ्यांच्या शेतात झाडे लावण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि त्यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवला. हरितक्रांती प्रकल्पाद्वारे त्यांनी भारतातील कृषी क्षेत्रामध्ये बदल घडवून आणला आणि संपूर्ण देशात त्याचा विस्तार केला. त्यांच्या योगदानामुळे त्यांनी अवघ्या २५ वर्षांत भारतीय शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनवले आणि हरितक्रांतीचे मुख्य प्रेरणास्थान बनले. भारतीय कृषी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल स्वामिनाथन यांना अनेक सन्मान मिळाले. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नांसाठी त्यांना सन्मानित करण्यात आले आणि त्यांच्या अहोरात्र मेहनतीतून त्यांनी भारतीय शेतीला नवी दिशा दिली.

स्वामिनाथन यांनी त्यांना निधीचा चांगला उपयोग केला आणि १९९० मध्ये चेन्नई येथे ‘स्वामिनाथन रिसर्च फाऊंडेशन’ची स्थापना केली. त्यांनी कृषी संशोधन क्षेत्रात नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन दिले आणि त्यांच्या प्रेरणेने मोठे प्रकल्प पुढे नेले. त्यांच्या समर्पित योगदानामुळे त्यांनी भारतीय कृषी क्षेत्रात विकासाचे नवे मापदंड प्रस्थापित केले आणि देशाची अन्न सुरक्षा मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जबलपूरमधील जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ हे भारतातील सर्वोत्तम कृषी केंद्रांपैकी एक आहे, हे देखील त्यांच्या प्रयत्नांचे फलित मानले जाऊ शकते. त्यांच्या धोरणामुळे भारताने अन्नधान्याच्या तीव्र टंचाईतून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल केली. तांदूळ आणि गव्हाच्या उच्च-उत्पादक वाणांच्या शोधात त्यांनी प्रमुख भूमिका बजावली. स्वामीनाथन यांच्या सांगण्यावरून भारत सरकारने बोरलॉग यांना भारतभेटीचे निमंत्रण दिले. गहू पिकवणाऱ्या काही राज्यांना भेटी दिल्यानंतर त्यांनी मेक्सिकन जातींचे शंभर किलो बियाणे भारताला दिले. काही चाचणीनंतर या बियांची प्रथम दिल्लीत पेरणी करण्यात आली आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. पूर्वी हेक्टरी एक ते दीड टनऐवजी आता हेक्टरी चार ते साडेचार टन गहू उत्पादन घ्यायला सुरुवात झाली आहे. भारतात १९६५-६६ आणि १९६६-६७ अशी सलग दोन वर्षे दुष्काळ पडला होता. धान्याचे उत्पादन घटले आणि भारताला अमेरिकेतून आयातीवर अवलंबून राहावे लागले.

स्वामीनाथन यांचे प्रयत्न या काळात भारतासाठी उपयुक्त ठरले आणि त्यांच्या देखरेखीखाली उच्च उत्पन्न देणाऱ्या जाती संशोधन करण्यात आले. त्यामुळे भारतातील धान्याचे उत्पादन वाढले आणि भारत धान्य संकटातून बाहेर आला. भारताच्या हरितक्रांतीच्या मागे इतरही लोक होते; पण तज्ज्ञांच्या मते स्वामीनाथन यांची भूमिका केंद्रस्थानी होती. देशाच्या इतिहासातील संकटाच्या काळात स्वामीनाथन यांच्या कृषी क्षेत्रातील कार्यामुळे कोट्यवधी लोकांचे जीवन बदलले आणि देशासाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित केली. २००४ मध्ये, भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या घटनांदरम्यान, कृषी क्षेत्र सुधारण्यासाठी राष्ट्रीय शेतकरी आयोगाची स्थापना करण्यात आली. त्याचे अध्यक्ष स्वामीनाथन होते. या आयोगाने किमान आधारभूत किमतीचा दिलेला फॉर्म्युला स्वामिनाथन फॉर्म्युला या नावाने प्रसिद्ध आहे. या अंतर्गत आयोगाने पिकावरील किमान हमी भाव त्याच्या पिकाच्या सरासरी किमतीपेक्षा किमान ५० टक्के जास्त असावा असे सुचवले होते. शेतकरी हिताच्या मार्गातील हा मैलाचा दगड मानला जातो; परंतु आजपर्यंत सरकारे या सूत्राची अंमलबजावणी करू शकलेली नाहीत. १९८७ मध्ये त्यांना कृषी क्षेत्रातील नोबेल पारितोषिक मानले जाणारे पहिले जागतिक अन्न पारितोषिक देण्यात आले. त्यांनी चेन्नई येथे एम. एस. स्वामीनाथन संशोधन संस्था स्थापन केली. ही संस्था कृषी क्षेत्रातील संशोधन कार्यात गुंतलेली आहे. स्वामीनाथन यांची कन्या आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या माजी मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन या संस्थेच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्या अद्वितीय कामगिरीमुळेच त्यांनी जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -