Tuesday, April 29, 2025

रिलॅक्ससाप्ताहिक

Amol Bavadekar : मला कलाकार व्हायचंय...

Amol Bavadekar : मला कलाकार व्हायचंय...
  • टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल

कलाकाराच्या घरात कलाकार जन्माला येतो, असे जे म्हणतात ते खरं आहे. सुहास बावडेकर हे कलाकार होते, गायक होते, सेट डिझायनर होते. प्रसिद्ध शास्त्रीय गायक जितेंद्र अभिषेकींकडून ते गाणं शिकले. त्यांच्या घरात एक कलाकार जन्माला आला, त्याचे नाव अमोल बावडेकर. सध्या सोनी मराठी वाहिनीवरील ‘प्रतिशोध झुंज अस्तित्त्वाची’ ही त्याची तृतीयपंथीय व्यक्तीवरील मालिका चर्चेत आहे. यात अमोलने तृतीयपंथीय आई ममताची भूमिका केलेली आहे.

अमोलची आई डॉक्टर व वडील कलाकार होते. सर जे जे. महाविद्यालयात ते अभिनेते अमोल पालेकरसोबत शिकायला होते. त्यांची मैत्री होती. त्यांनी एका नाटकात एकत्र कामदेखील केले होते. अभिनेता प्रशांत दामलेच्या ‘पाहुणा’, ‘फक्त एकदाच’ अभिनेत्री रंजनाच्या व्हीलचेअरवरील नाटकाचे त्यांनी सेट डिझायन केले होते. प्रतिकृती बनविण्यात त्यांचा हातखंडा होता. अशा सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या अमोलला लहानपणापासून कलाकार होण्याची इच्छा मनामध्ये होती. त्याचे शालेय शिक्षण बोरिवलीच्या चोगले हायस्कूलमध्ये झालं. शाळेत स्टेजची भीती वाटायची, त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांत भाग घ्यायचा नाही. तो घरातील लोकांच्यासमोर, मित्रांसमोर तो गाणे गायचा. नंतर त्याने ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांच्याकडे संगीताचे धडे घेतले.

अविनाश हांडे एका कार्यक्रमाची निर्मिती करणार होते. गाण्यावर नृत्याचे सादरीकरण होते.त्या कार्यक्रमासाठी त्यांनी अमोलला गायनासाठी गळ घातली. ‘परंपरा’ असे त्या कार्यक्रमाचे नाव होते. भरत जाधव, अरुण कदम असे नामवंत कलावंत त्यात होते. तो आठ वर्षांचा असताना त्याने अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल टाकले. ‘प्रेषित’ नावाच्या नाटकात त्याने पांगळ्या मुलाची भूमिका केली होती. ते नाटक पाहायला निर्माते मोहन वाघ, ज्येष्ठ अभिनेते यशवंत दत्त आले होते. ते नाटक पाहून झाल्यावर त्यांनी त्याला ‘सोनचाफा’ या नाटकाची ऑफर केली होती; परंतु त्याच्या आईने शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी या नाटकात त्याला काम करण्यास नकार दिला.

शालेय शिक्षण झाल्यानंतर त्याने सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधून इंटेरिअर डिझाईनला प्रवेश घेतला. गाणे शिकण्यास देखील प्रारंभ केला. त्यानंतर त्याचे गाण्याचं वेड वाढले. तो गाण्याचे कार्यक्रम करू लागला. दिग्दर्शक केदार शिंदेच्या ‘टूर टूर’ नाटकात त्याने काम केलं. नंतर ‘कट्यार काळजात घुसली’ या नाटकात त्याने काम केलं. ‘शत जन्म शोधिता’ या नाटकात त्याने काम केलं. भारतरत्न महान गायिका लता मंगेशकर यांनी सर्वात प्रथमच या नाटकासाठी गायन केलं. त्याला पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीत दिले होते. त्यानंतर त्याने ‘अवघा रंग एकचि झाला’ या संगीत नाटकात काम केलं. शत जन्म शोधिता या नाटकानंतर अमोलने ठरविले होते की, यापुढे अभिनय करायचा नाही. केवळ गाणे गात राहायचे. त्याला नाटकाच्या ऑफर येत होत्या; परंतु त्या ऑफर तो नाकारत होता. जवळजवळ दोन वर्षे त्याने अभिनयासाठी नकार दिला होता. ज्येष्ठ अभिनेते प्रमोद पवार यांनी त्यांना ‘गोरा कुंभार’ या नाटकाची ऑफर दिली. सुरुवातीला अमोलने नकार दिला. ते त्याच्यासाठी चार महिने थांबले. वडिलांनी समजूत घातल्यानंतर अमोलने त्या नाटकात काम करण्यास होकार दिला. ते नाटक त्याच्या जीवनात टर्निंग पॉइंट ठरले.

या नाटकाच्या कोणत्या प्रतिक्रिया मिळाल्या असे विचारल्यावर अमोल म्हणाला की, “गोरा कुंभार या नाटकाने मला भरभरून दिले. गायक व अभिनेता अशी ओळख मिळवून दिली. ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांनी माझे अभिनंदन केले. मला आजदेखील आठवतंय की, विलेपार्लेच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात गोरा कुंभार या नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर एक माणूस माझ्याजवळ आला व मला म्हणाला की, तुमच्या कैवल्याच्या चांदण्याला ऐकलं आणि मला माझ्या बाबांची आठवण झाली. मी गायक शौनक अभिषेकी. हे ऐकताच मी भारावून गेलो. इतक्या मोठ्या गायकाला माझे गाणे ऐकून त्यांच्या वडिलांची आठवण व्हावी हे माझ्यासाठी फार मोठं सर्टिफिकेट होते. ही प्रतिक्रिया मला खूप भावली.”

सध्या त्याची सोनी वाहिनीवर ‘प्रतिशोध झुंज अस्तित्वाची’ ही मालिका सुरू आहे. या मालिकेमध्ये त्याने ममता या तृतीयपंथीय व्यक्तीची भूमिका साकारली आहे. सुरुवातीला ज्यावेळी या भूमिकेसाठी त्याला विचारणा झाली. तेव्हा तो ही भूमिका करण्यासाठी कचरला होता; परंतु घरच्यांनी विशेषतः त्याचा पत्नीने ही भूमिका करण्यासाठी त्याला पाठिंबा दिला. मित्रांनी देखील त्याला ही भूमिका करण्यासाठी पाठिंबा दर्शविला. ममता ही एका आईची भूमिका आहे, ही आई स्त्री नसून तृतीयपंथीय आहे. ही तृतीयपंथीय आई साकारणं कठीण काम होतं. या भूमिकेमध्ये जास्त स्त्री पात्र किंवा पुरुष पात्र याचा वरचष्मा असता कामा नये, याची काळजी त्याने घेतली. ममता व तिची मुलगी दिशा यांची गोष्ट यांत सांगितली आहे. ममताचा भूतकाळ आहे. त्यात रहस्य आहे, ते हळूहळू उलगडत चालले आहे.

या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एखाद्या पुरुषाने स्त्री पात्र साकारताना त्यात हिडिसपणा येऊ नये यासाठी या भूमिकेचा अभ्यास देखील त्याने केला होता. या भूमिकेला सगळ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अभिनेते सचिन पिळगांवकर, शिवाजी साटम यांनी त्याला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या. अभिनेत्री नीना कुलकर्णींनी देखील त्याच्या अभिनयाचे कौतुक केले. या मालिकेचे निर्माते, लेखक व दिग्दर्शक राकेश सारंग यांचे ही भूमिका साकारण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले, असे त्याचे म्हणणे आहे.

अमोलला संगीत ऐकायला आवडतं. ऐतिहासिक पुस्तके वाचायला आवडतात. गायन, अभिनय हे कलाकाराच्या अंगी असणारे गुण आहेत. त्याला कलाकार व्हायचंय. त्याला त्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra
 
Comments
Add Comment