Wednesday, July 24, 2024
Homeताज्या घडामोडीPolitical activists : नेते तुपाशी तर कार्यकर्ते मात्र उपाशी

Political activists : नेते तुपाशी तर कार्यकर्ते मात्र उपाशी

नेत्यांनी सत्तेचा मलिदा चाखायचा आणि कार्यकर्त्यांनी फक्त माईक टेस्टिंग, सतरंजी उचलणे, हातात झेंडे आणि तुणतुणे वाजवायचे का ?

कार्यकर्त्यांनी मांडली व्यथा

सिडको : राज्यातील सत्ता संघर्षाकडे बघितले तर पक्षातील काही विशिष्ट लोकच सत्तेचा मलिदा चाखत असल्याचे विचित्र चित्र गेल्या साडेचार वर्षांपासून नागरिकांना याचि देही याचि डोळा बघायला मिळत आहे. तर पक्षातील बाकीच्यांची अवस्था ही ‘पिंजरा’ या मराठी चित्रपटातील ‘मास्तरा’ प्रमाणे म्हणजेच हाती घेतलेल्या तुणतुण्यासम झाल्याचे दिसून येत आहे, असे म्हटल्यास नक्कीच वावगे ठरणार नाही.

गेल्या साडेचार वर्षांमध्ये विविध पक्षाच्या आमदार खासदारांनी ‘सत्तेसाठी काहीपण’ म्हणत राजकारणाची पुरती वाट लावली आहे. त्यात फरफटत गेला तो पक्षाचा निष्ठावंत असा एकनिष्ठ पदाधिकारी व कार्यकर्ता. त्याला ना कुठले महामंडळ, ना कुठली समिती, ना कुठले विशेष कार्यकारी अधिकारी, ना कुठले पद, ना हाताला काम मिळाल्याचे दिसून आले. तुम्हाला कधीतरी काहीतरी देऊ असं म्हणून – म्हणून आता त्यांच्यावर पार कंबरडे मोडायची आणि झिजलेल्या चपला बदलायची वेळ आली. परंतु नेहमीप्रमाणे कार्यकर्त्यांच्या हाती मात्र आश्वासनांचे गाजरच बघायला मिळाल्याचे दिसून आले.

या पूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी, काँगेस नंतर शिंदे गटाची शिवसेना, भाजपा व अजित पवार गटाचा राष्ट्रवादी पक्ष असे तब्बल पाच ते सहा पक्ष सत्तेत आले. त्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कॅबिनेट व राज्यमंत्री अशी अनेक पदं मिळाली. परंतु त्यांच्यासाठी काम करणाऱ्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हाती मात्र नेहमीप्रमाणे धोपटणे आल्याची भावना आजही ते व त्यांच्या घरचे व्यक्त करताना दिसून येतात. ही राज्यातील विविध पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी शोकांतिकाच म्हणावी लागेल.

पत्रकार नेहमी या मंत्री-संत्री व वरिष्ठ नेत्यांबद्दलच लिहितात. त्यांचे फोटो व बातम्या छापतात. त्यांना प्रसिद्धी देतात. परंतु कधीतरी आमच्या देखील व्यथा बातमी स्वरूपात मांडा. अशी कळकळीची व आग्रहाची विनंती पदाधिकारी व कार्यकर्ते “दैनिक प्रहार” कडे नाव न सांगण्याच्या अटीवर करत आहेत. अनेक वर्षे झाली, परंतु आम्ही केवळ सतरंजा उचलण्याचेच काम करायचे का ? स्टेजवर हॅलो! माईक टेस्टिंगच म्हणायचे का? अशी देखील संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली आहे. गेले वर्षानुवर्ष केवळ काही ठराविक नेते मंडळीच सत्तेचा मलिदा चाखत आहेत. आम्ही पदाधिकारी व कार्यकर्ते मात्र एकनिष्ठ राहून त्यांच्या खांद्याला खांदा लावून झिजतोय. शेव-मुरमुरे व पाव-वडे खाऊन दिवस-रात्र काढतोय. हे मात्र सत्ता आली की आम्हाला हळूच बाजूला करतात. नंतर साधं कुणी विचारतही नाही आणि ढुंकूनही पाहत नाही. मात्र काही महत्वाचं काम असलं की आम्हाला हे नेते मंडळीं रात्री – बेरात्री हक्काने फोन करतात.

सभेसाठी कार्यकर्ते गोळा करा, बॅनर लावा, गर्दी करा, फुलं उधळा, रांगोळी काढा, हातात झेंडे घ्या, घोषणा द्या, आंदोलन करा, मोर्चे काढा, निवेदन द्या, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, दहीहंडी, पाडवा पहाट, रावण दहन, जयंती, पुण्यतिथी, शिबिर, साई भंडारा कावड, कानबाई उत्सव, भाऊचा बर्थडे करायचा आणि पेपरला नाव व फोटो कुणाचे तर यांचे आणि आमचे नाव शेवटच्या ओळीत. आदी, इत्यादी, असंख्य जण उपस्थित होते. अशा शब्दात येणार. हे असे आमच्या बाबतीत नेहमीच घडतेय बघा. लाठ्या – काठ्या आम्हीं खायच्या. अंगावर केसेस आम्ही घ्यायच्या. आम्हीच आमच्या पैशाने केस लढायची आणि बाहेर आल्यावर मात्र यांनी नेहमीप्रमाणे गळ्यात हात घालायचा आणि पुन्हा एकदा लढ म्हणायचं. हे असं किती दिवस बरं चालायचं. असाही प्रश्न ते या निमित्ताने उपस्थित करताना दिसत आहेत.

थोडक्यात काय तर पदाधिकाऱ्यांनी करायचे कार्यकर्ते गोळा आणि कार्यकर्त्यांनी करायच्या सतरंज्या गोळा? हे असे किती दिवस चालायचे. ना महामंडळ, ना समिती, ना विशेष कार्यकारी, हाती केवळ ‘तुणतुणे’ धरी ! अशी अवस्था कार्यकर्त्यांची झाली आहे बघा. त्यामुळे नेते तुपाशी तर कार्यकर्ते मात्र उपाशी. अखेर अशी म्हणण्याची वेळ आलीय आम्हां कार्यकर्त्यांवर. कार्यकर्त्यांनी फक्त हॅलो, माईक टेस्टिंग म्हणायचे आणि नेत्यांनी मात्र नुसते गफाड्या मारत भाषणं झोडायचे. हे असे किती दिवस बरं चालायचे, अशी व्यथा कार्यकर्त्यांनी मांडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -