
सुधीर मुनगंटीवार यांचे शरद पवारांवर गंभीर आरोप
मुंबई : शरद पवार (Sharad Pawar) यांनी १ मे १९६० पासून मराठा आरक्षणाची आश्वासनं दिली आणि आता त्यांनी ही जबाबदारी आमच्यावर टाकली आहे. कारण त्यांना कळलं की ते मराठा आरक्षण (Maratha Reservation) देण्यात असमर्थ ठरले आहेत. आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये आमचा एक मर्द मराठा मुख्यमंत्री आहे. तर हा प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय एकत्र बसून सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणार आहेत, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी व्यक्त केला. यावेळेस त्यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्दयावरुन विरोधक आणि विशेषतः शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांचे नेते अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी पूर्ण शक्तीने प्रयत्न करत असतात. त्यांना असं वाटतं की या अस्थिरतेच्या पायऱ्या आपल्याला सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करु शकतील आणि म्हणून सरकारमध्ये असताना ते मराठा आरक्षण का देऊ शकले नाहीत याचं उत्तर ते देऊ शकत नाहीत.
पुढे ते म्हणाले, शरद पवारांना महाराष्ट्रातील अस्थिरता म्हणजे सत्तेपर्यंत पोहोचण्याची पायरी वाटते. त्यांना विकासकार्य, निर्णय, गरिबांचं कल्याण, दहा लाख ओबीसींना घरं बांधून देण्याचे कार्यक्रम, राज्य सरकारने सहा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट टाकणं, एक रुपयाचा विमा देऊन शेतकऱ्यांचे १५५१ कोटी वाचवले, महिलांना केंद्र सरकारने दिेलेलं आरक्षण हे सगळं त्यांना आम्हाला असं का सुचलं नाही, असं वाटतं. या सर्व भीतीमध्ये, अंधारामध्ये त्यांना मराठा आरक्षणासारखे मुद्दे म्हणजे टॉर्च वाटतात की ज्यामुळे ते सत्तेपर्यंत पोहोचू शकतील. पण हा त्यांचा गैरसमज आहे, असा हल्लाबोल सुधीर मुनगंटीवार यांनी केला.