५२ लोक ठार तर ५० जण जखमी
बलुचिस्तान : दक्षिण-पश्चिम पाकिस्तानातील (Pakistan) बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात एका मशिदीजवळ मोठा आत्मघातकी स्फोट झाला. प्रेषित मुहम्मद यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी भाविक जमले होते. यावेळी ईद मिलाद-उन-नबी उत्सवानिमित्त मिरवणूक काढण्यात येत असताना हा स्फोट झाला. या स्फोटात ५२ लोक ठार झाले असून ५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचाही समावेश आहे. सध्या परिसराची नाकाबंदी करण्यात आली असून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.
स्फोटाच्या पार्श्वभूमीवर प्रमुख शहरांमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मस्तुंगचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे. संशयित आत्मघाती हल्लेखोराने ऑन-ड्युटी पोलीस अधिकाऱ्याच्या गाडीजवळ बॉम्बस्फोट घडवून आणला. यासंबंधी अधिक तपास पोलीस करत आहेत.
दि पाकिस्तानी फ्रंटिअर या पाकिस्तानी वृत्तसंस्थेच्या संकेतस्थळाने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला मृतदेह आणि अवयव आजूबाजूला पडलेले दिसत आहेत. कराची पोलिसांना ईद मिलाद-उन-नबी आणि शुक्रवारच्या नमाज संदर्भात शहरातील सुरक्षा उपाय कडक करण्यासाठी आणि अत्यंत सतर्क राहण्याच्या कडक सूचना देण्यात आल्या आहेत, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे.