Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

Nashik : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर, पोलिसांची बघ्याची भूमिका?

Nashik : सर्वोच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर, पोलिसांची बघ्याची भूमिका?

आजी-माजी पोलीस आयुक्तांच्या नजरेसमोर 'डीजे'चा 'दणदणाट'!


नाशिक : सर्वोच्च न्यायालयाचे (Supreme Court) डीजे वाजविण्यास बंदी असलेले आदेश धाब्यावर बसवत नाशिक (Nashik) मधील तब्बल आठ गणेश मंडळांनी शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजेच्या दणदणाटात लाडक्या बाप्पाला निरोप दिला.


विशेष म्हणजे ही विसर्जन मिरवणूक पार पडेपर्यंत ज्यांनी दोन वर्षांपूर्वी याच डीजेच्या मुद्द्यावरून काही गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना धडा शिकवला होता ते तत्कालीन पोलीस आयुक्त आणि विद्यमान एडीजीपी आयर्न मॅन डॉ. रवींद्रकुमार सिंगल आणि नाशिकचे विद्यमान पोलीस आयुक्त अंकुश हे दोन्ही वरिष्ठ पोलीस अधिकारी विसर्जन मिरवणूकीची सांगता होईपर्यंत मेहेर चौकात उभारलेल्या पोलीस पंडालमध्ये जातीने उपस्थित होते.


प्रत्येक मंडळाच्या मिरवणूकीतील हालचालींचे या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली येथील अधिकारी देखिल सूक्ष्म निरीक्षण करीत होते. तरीही विद्यमान शांतता समिती आणि गणेश महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


याबाबत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा असून एकाला बंदी आणि दुसऱ्याला खुली सुट यामुळे काही गणेश मंडळाचे पदाधिकारी नाराजी व्यक्त करीत आहेत. डीजे वाजविणाऱ्या या खास मंडळांना नेमका कुणाचा आशीर्वाद मिळाला, अशी चर्चा शहरात रंगली आहे.


सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डीजे वाजविण्यावर बंदी घालण्यात आलेली आहे. ही बंदी राज्यातच नव्हे तर देशभरात आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे. गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वीच शहर पोलिसांनी शांतता समितीच्या बैठका घेत डीजे न वाजविण्याच्या सूचना दिल्या होत्या. तसेच सूचनांचे उल्लंघन केल्यास कारवाईचाही इशारा दिला होता. पोलिसांच्या या सूचनांना शांतता समितीच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेल्या गणेश मंडळांच्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी संमतीही दिली होती. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून शहराच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे न वाजविण्याची परंपरा कायम राहील असे संकेत होते. मात्र विसर्जन मिरवणुकीतील आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट करीत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला धाब्यावर तर बसविलेच, शिवाय पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजे वाजवून व्यवस्थेलाच आव्हान दिले आहे. यामुळे पोलीस आता काय कारवाई करतात, याकडे नाशिककरांचे लक्ष लागून आहे.


गुन्हे दाखल होणार का? रवींद्र कुमार सिंगल हे पोलीस आयुक्त असताना गणेश विसर्जन मिरवणुकीत दंडे हनुमान मित्र मंडळाने डीजे वाजविला होता. या प्रकरणी गजानन शेलार यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्यानंतरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविला गेला नाही. यावेळी मात्र आठ मंडळांनी डीजेचा दणदणाट केला. त्यामुळे पोलिसांच्या आदेशाला न जुमानता ज्या मंडळांनी आदेशाचे उल्लंघन केले आहे. त्यांच्या विरोधात पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात याकडे नाशिककरांचे विशेषतः अन्य मंडळाचे लक्ष लागून आहे.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment