
चंदीगड : अंमलीपदार्थ तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी गुरुवारी काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांना अटक केली. पोलिसांनी पहाटे खैरा यांच्या चंदीगड येथील निवासस्थानी छापा टाकून ताब्यात घेतले.
काँग्रेस आमदार खैरा यांच्या अटकेबाबत पंजाब सरकारने सांगितले की, राज्यातील २०१५ च्या ड्रग्ज तस्करी प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. ड्रग्ज तस्करी प्रकरणात महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. पोलिसांनी पुराव्याच्या आधारे कारवाई केली. सत्र न्यायाधीशांच्या आदेशानुसार एसआयटीची स्थापना करण्यात आली. पंजाब पोलिसांचे डीआयजी स्वपन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली ही टीम तयार करण्यात आली होती.
एसआयटीच्या तपासात अमली पदार्थांच्या तस्करीत त्यांच्या सहभागाचे पुरावे मिळाले आहेत. ड्रग्ज तस्कर गुरदेव सिंग हा आमदार सुखपाल खैरा यांचा निकवटर्तीय असल्याचे सांगितले जाते.
दरम्यान, काँग्रेस आमदार सुखपाल खैरा यांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर आरोप करत त्यांच्या विरोधात सूड भावनेतून कारवाई केली जात असल्याचे सांगितले. ही अटक जुन्या एनडीपीएस प्रकरणात करण्यात आली आहे.