
तर ईशाने मिळवलं रौप्यपदक.... सहाव्या दिवशी भारताची दमदार सुरुवात
हांगझोऊ : आशियाई स्पर्धेत (Asian Games 2023) भारताच्या नेमबाजांनी चांगलीच बाजी मारली आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून नेमबाजी प्रकारात सांघिक आणि वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारताने अनेक पदकं आपल्या खात्यात जमवण्यास सुरुवात केली आहे. आज स्पर्धेच्या सहाव्या दिवशी महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल शूटिंग प्रकारात (Shooting 10m Air Pistol Women) भारताच्या पलकने (Palak) सुवर्णपदकाची कमाई करत भारताला आठवं सुवर्णपदक मिळवून दिलं. तर याच स्पर्धेत भारताच्या ईशा सिंगने (Esha Singh) रौप्यपदक पटकावलं.
१० मीटर एअर पिस्तूल नेमबाजीच्या वैयक्तिक स्पर्धेत १७ वर्षीय पलक आणि १८ वर्षीय ईशा सिंगने चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्य अशी दोन्ही पदकं भारताच्या नावावर केली आहेत. तर कांस्यपदकावर पाकिस्तानने आपले नाव कोरले आहे. आतापर्यंत भारताच्या खात्यात एकूण ३० पदकं जमा झाली आहेत आणि सर्वाधिक पदकांच्या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आला आहे.
पलकने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत २४२.१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये हैदराबादच्या रहिवासी ईशा सिंगने भारतासाठी चार पदके जिंकली आहेत. ईशाने १० मीटर एअर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं. तर यापूर्वी तिने २५ मीटर पिस्तूल सांघिक स्पर्धेत सुवर्ण आणि वैयक्तिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकलं होतं.