- मोहन शेटे : इतिहास अभ्यासक
पार्थिव गणेशमूर्तीचे विसर्जन झाल्यानंतर जाणवणारी हुरहुर, वाटणारा एकटेपणा, उत्सवाचा समारोप झाल्यानंतर दिनचर्येला लागताना जाणवणारी मरगळ हे सर्व सध्या प्रत्येकजण अनुभवत असेल. मात्र दर वर्षीचा गणेशोत्सव आपल्याला खूप काही शिकवून जात असतो. बदलत्या काळानुसार उत्सवाच्या स्वरूपात बदल घडवून आणण्याची गरज दाखवून देत असतो. प्रत्येक गणेशभक्ताने काळाच्या या गरजेचाही विचार करायला हवा.
एखादे मंगलकार्य संपन्न पार पडल्यानंतर अनुभवास येणारे एकाकीपण, हुरहुर, कंटाळवाणी अवस्था हे सर्व काही बघायला मिळण्याचा काळ म्हणजे अनंत चतुदर्शीनंतरचे दिवस. पार्थिव गणेशमूर्तीच्या विसर्जनाबरोबरच कदाचित काही काळासाठी घरातील चैतन्यही हरवल्यासारखे वाटते. दहाव्या दिवशी गणपतीला निरोप द्यावा लागणार आहे, हे ठाऊक असूनही दरवर्षी मनात त्याच्या वियोगाच्या भावनांची दाटी होतेच. आताचे दिवसही तसेच आहेत. मात्र हेही बरेच काही सांगून, शिकवून जाणारे आहे.
काही देवांच्या मूर्ती वा प्रतिमा घरात नेहमीच असतात. मात्र पार्थिव गणेश वर्षातून एकदा येतो आणि विसर्जनाच्या दिवशी आपला निरोप घेतो. गणेशाची मूर्ती निवडताना, खरेदी करता काही वेळा विक्रेत्याशी किमतीबद्दल घासाघीस होते. एका अर्थी तेव्हा ती पैसे देऊन खरेदी केलेली वस्तू असते. पण हीच मूर्ती घरात येते, तिची प्राणप्रतिष्ठा होते आणि नंतर विसर्जनाच्या दिवशी जायला निघते तेव्हा प्रत्येकाच्या डोळ्यांत पाणी तरळत असते. तेव्हा मात्र ती वस्तू नसून देवत्व लाभलेली एक प्रतिमा असते. उत्सवाच्या काळात गणेशाच्या या रूपाशी आपले भावनिक नाते जोडले गेलेले असते. अशी समरसता, एकरूपता आणि कृतज्ञता हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्टच म्हणता येईल. आपण काही वनस्पतींची, बैलपोळ्याला बैलाची, वसुबारसेच्या दिवशी गायीची, नागपंचमीला नागाची पूजा करतो. या सर्व माध्यमातून आपण परमेश्वराबद्दलची कृतज्ञताच व्यक्त करत असतो. ही भावना आणि निरलस प्रेम असल्यामुळेच पार्थिव गणेशाच्या विसर्जनाची घटिका भाविकांना विव्हल करून जाते. त्याचा विरह दु:खी करून जातो.
खरे सांगायचे तर संपूर्ण गणेशोत्सवातूनच आपल्या संस्कृतीचे दर्शन घडते. गीतेमध्ये सांगितल्यानुसार माणूस जन्माला येणे आणि त्याचा मृत्यू होणे हे वस्त्रासमान असते. वस्त्र जीर्ण झाल्यानंतर बाजूला करून नवीन वस्त्र परिधान केले जाते, त्याचप्रमाणे आत्मा देह धारण करत असून देह जीर्ण झाल्यानंतर तो त्यागून नवीन देह धारण करतो. आपली संस्कृती जन्म आणि मृत्यूकडे अशा नजरेने बघत असताना गणेशोत्सवातही त्याचेच प्रतिबिंब बघायला मिळते. इथे गणेशाची मातीची मूर्ती प्रतिष्ठापित होते, देवाचा तो अवतार दहा दिवस चराचरात आनंद निर्माण करतो, उत्साह आणि जल्लोश पसरवतो आणि दहा दिवसांनंतर ती मूर्ती मातीत मिसळून नष्टही होऊन जाते. यातून माणसाला मिळणारा संदेश असा की, या मूर्तीप्रमाणे आपणही पृथ्वीवर काही काळासाठीच आलो आहोत. एक दिवस आपल्या शरीराचीही माती होणार आहे. पंचतत्त्वापासून बनलेले आपले शरीर त्याच तत्त्वांमध्ये मिसळून जाणार आहे. त्यामुळेच गणपती दहा दिवस आनंद निर्माण करतो. त्याचप्रमाणे तू देखील इथे येऊन आनंद निर्माण करायला हवा. गणेशोत्सवाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचणारा हा विचार लक्षात घेतला आणि त्यानुसार वर्तन ठेवले तर प्रत्येकाचे जगणे आनंददायी, सहज आणि चैतन्यमय होऊ शकेल.
यंदा गणेशोत्सव अत्यंत धुमधडाक्यात संपन्न झाला. मधल्या काही काळात या उत्सवाला विकृत स्वरूप प्राप्त झाले होते. अश्लील गाणी, त्यावरील नृत्य, कमालीचा गोंगाट, गदारोळ अशा हिणकस स्वरूपामुळे या उत्सवाला गालबोट लागल्याचे अनुभवायला मिळत होते. पण आता हा प्रकार बऱ्यापैकी कमी झाल्याचे बघायला मिळणे ही निश्चितच सकारात्मक बाब म्हणावी लागेल. थोडे मागे वळून पाहायचे तर ज्ञानप्रबोधिनीचे आप्पासाहेब पेंडसे, गरवारे शाळेचे गाडगीळ सर, रँगलर महाजनी, दगडूशेठ गणेशोत्सव मंडळाचे तात्यासाहेब गोडसे, मंडईचे थोरात अशा त्या काळातील जाणत्या मंडळींनी या खटकणाऱ्या गोष्टींबद्दल आवाज उठवला होता. प्रवाहाच्या काठावर बसून त्यात काय चूक आहे हे सांगणे सोपे असते, मात्र सगळ्यांनी प्रवाहात उतरून घाण दूर करण्याचे आणि संबंधित जागा स्वच्छ करण्याचे खूप मोठे काम करून ठेवले. आप्पासाहेब पेंडसे यांचे वैशिष्ट्य असे की काही लोक गणेशोत्सवामध्ये चित्रपटातील गाण्यांवर अश्लील नृत्य करत असल्याचे लक्षात घेऊन त्यांनी प्रबोधिनीच्या मुलांना ढोलाच्या, हलगीच्या तालावर लेझीम वा बरची नृत्य शिकवण्यास सुरुवात केली आणि बघता बघता मिरवणूक देखणी, प्रदर्शनीय झाली. यंदाही अशीच देखणी विसर्जन मिरवणूक आपण अनुभवली. केवळ पुण्याचाच विचार केला तर इथे ढोल पथकांमध्ये पन्नास हजारांपेक्षा अधिक मुले-मुली काम करताना दिसतात, हे दखलपात्रच.
गणेशोत्सवाने दिलेले विधायक वळण हादेखील नोंद घेण्याजोगा मुद्दा म्हणायला हवा. काही वर्षांपूर्वी मला दगडूशेठ हलवाई मंडळातर्फे आयोजित गणेशोत्सव स्पर्धेमध्ये परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा उत्सवाचे हे विधायक वळण मला जवळून अनुभवता आले. परीक्षकाचे काम करताना मी जवळपास ४००-५०० मंडळांना भेटी दिल्या. माझ्यासाठी ते एक विराट दर्शनच होते. टिळकांनी काय पेरले होते आणि काय उगवले, हे तेव्हा मला अगदी जवळून बघायला मिळाले. आम्ही मंडळांना भेट द्यायचो तेव्हा काही प्रश्न विचारायचो. त्यात तुम्ही आता मांडवात काय केले हे सांगू नका, तर वर्षभर काय करता हे सांगा, असा प्रश्न असायचा. त्याची उत्तरे ऐकून आम्ही चकित व्हायचो. तेव्हा समजले की, गणेशोत्सव साजरा करताना मुले केवळ दहा दिवस एकत्र येऊन काम करत नाहीत, तर वर्षभर कोणत्या ना कोणत्या सामाजिक उपक्रमांमध्येही भाग घेतात. काही गणेश मंडळातील कार्यकर्ते वर्षभरात रक्तदान शिबिरे घेतात, अनाथ विद्यार्थ्यांच्या सहली आयोजित करतात, वृद्धांश्रमांना भेटी देतात. एखाद्या ठिकाणी वादळ, पूर, भूकंप यांसारखी नैसर्गिक आपत्ती आली तर एकत्र येऊन, ताबडतोब पोहोचून गरजूंना कोणत्या गोष्टींची गरज आहे ते बघतात आणि त्या पुरवण्याची व्यवस्था करतात. थोडक्यात, त्यांच्या माध्यमातून तिथे मदतीचा ओघ सुरू होतो. एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की, आम्ही दर वर्षी एक जानेवारी या दिवशी झाड लावतो आणि आधी लावलेल्या सगळ्या झाडांचा वाढदिवसही साजरा करतो. यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये लावलेली झाडे जिवंत आहेत की नाहीत, त्यांची स्थिती काय आहे हे आम्हाला बघता येते. म्हणजेच या कामातून गणेश मंडळांकडून पार पडणाऱ्या अनेक उत्तम कामांची माहिती मला मिळाली आणि तरुणाईला एकत्र करून त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव देण्यासाठी गणेशोत्सवाचे महत्त्वही नव्याने अधोरेखीत झाले. म्हणजेच या उत्सवात समाजातील तरुणाईला, त्यांच्यातील ऊर्जेच्या, इच्छाशक्तीला विधायक वळण देण्याची ताकद आहे, हे मान्य करावेच लागेल.
गणेशोत्सव ही नेतृत्वगुण निर्माण करणारी शाळाच आहे, असेही आपण म्हणू शकतो. भारताच्या पारतंत्र्याच्या काळात विविध चळवळी, आंदोलन यामध्ये तरुण भाग घ्यायचे. त्यातूनच देशाला नेते मिळाले; जे स्वातंत्र्यानंतर राजकारणात आले, मंत्री झाले आणि देशाचा कारभार सांभाळला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलने वा चळवळींचे प्रमाण पूर्वीइतके राहिले नाही. पण गणेशोत्सवामधून कार्यकर्ते निर्माण झाले आणि तरुणांमधील नेतृत्वगुणांचा विकास झाला. नेतृत्वगुण असणारा एखादा मुलगा वा मुलगी अनेकांना मार्गदर्शन करतो. तोच पुढे अनेकदा नगरसेवक, आमदार, खासदार झाल्याचे सांगता येईल. शेवटी अंगी नेतृत्वगुण असणाऱ्या माणसाला कुठेतरी वाव मिळणे गरजेचे असते. त्यांची ही गरज गणेशोत्सवाच्या निमित्ताने मिळते हीदेखील एक सकारात्मक बाब म्हणावी लागेल.
काळानुरूप प्रत्येक गोष्ट बदलते. साहजिकच येत्या काळात या उत्सवाचे स्वरूप बदलणेही गरजेचे आहे. यापुढे गणेश मंडळांनी वा या उत्सवाचा भाग होणाऱ्या सगळ्यांनीच पर्यावरणाचे भान राखणे गरजेचे आहे. हा उत्सव अधिक पर्यावरणपूरक व्हायला हवा. भाऊ रंगारी मंडळाची गणेशमूर्ती बघितली, तर तो गणेश राक्षसाचा वध करताना दिसतो. भाऊ रंगारी स्वत: क्रांतिकारी विचारांचे असल्यामुळे तसेच सशस्त्र क्रांतीला त्यांनी प्रोत्साहन दिले असल्यामुळे उघडपणे बोलता येत नसलेले त्यांनी या मूर्तीतून दाखवण्याचा प्रयत्न केला होता. इंग्रजरूपी राक्षसाचा वध करण्यासाठी गणपतीप्रमाणे आपल्यालाही हातात शस्त्र घ्यावे लागेल, असे त्यांचे सांगणे होते. मात्र आज मी त्या मूर्तीकडे बघतो तेव्हा मनात येते की, आता काळ बदलला आहे. राक्षसही बदलले आहेत. त्यामुळेच आताच्या राक्षसांचा वध करण्यासाठी शस्त्रदेखील बदलायला हवीत. आता पर्यावरणाची हानी, अस्वच्छता, अज्ञान या बाबी राक्षसासमान आहेत. त्यामुळेच त्यांचा वध करण्यासाठी आता आपल्याला वेगळ्या शस्त्रांचा वापर करावा लागेल. ते घेऊन वाटचाल करावी लागेल. आता गणेशभक्तांनी हा विचार करायला हवा. गणपती नसताना रस्ते गर्दीने दुथडी भरून वाहत असतील, तर आता मोठे मंडप टाकणे गरजेचे आहे का, याचा अंतर्मुख होऊन विचार करायला हवा. मंडपांचा आकार कमी करून विधायक कामांना भर दिला, तर पुढील गणेशोत्सव अधिक देखणा आणि प्रबोधक होईल याची खात्री वाटते.
(लेखक ‘इतिहासप्रेमी मंडळ’ या संस्थेचे अध्यक्ष आहेत.)
(शब्दांकन: स्वाती पेशवे)