- माझे कोकण : संतोष वायंगणकर
भारतीय संसदेत लोकसभागृहात तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू ज्यांचे अभ्यासपूर्ण भाषण ऐकण्यासाठी आवर्जुन उपस्थित राहात असत, त्या स्व. बॅ. नाथ पै यांची १०१वी जयंती तीन दिवसांपूर्वीच झाली. सर्व बदलत्या राजकारणात नाथ पै कोण असा दुर्दैवाने आजच्या तरुण पिढीतील कोणी प्रश्न केला तर त्यात कोणाला आश्चर्य वाटणार नाही. असेच आजचे आपल्या अवती-भवतीचं राजकारण आहे. मात्र, जेव्हा-जेव्हा कोकणचं राजकारण, समाजकारण कोकणंच नेतेपण या विषयाची चर्चा होत राहील तेव्हा-तेव्हा बॅ.नाथ पै हे नाव अग्रक्रमाने घेतल्याशिवाय राहात नाही. संसद, लोकसभा या विषयांची चर्चा सुरू होते, तेव्हा नाथांचे कोकण म्हणून एक वेगळी ओळख निर्माण झालेली आहे.
समाजवादी विचारसरणी असलेल्या बॅ. नाथ पै यांनी राजापूर लोकसभा मतदारसंघाचे १९५७, १९६२ आणि १९६७ अशा सलग तीन वेळा लोकसभा निवडणुकीत विजयाची हॅटट्रीक करत राजापूर लोकसभा मतदारसंघाचे संसदेत प्रतिनिधित्व केले. तत्पूर्वी १९५२ साली मुंबईतून बॅ. नाथ पै यांनी निवडणूक लढवली; परंतु बॅ. नाथ पै मुंबईतील विधानसभा निवडणुकीत ते पराभूत झाले. त्या पराभवानंतर नाथांनी कोकणातील मतदारसंघ निवडला आणि कोकणानेही नाथांवर भरभरून प्रेम केले. कोकणातील जनतेशी बॅ. नाथ पै यांचे सहज सुंदर नातं होतं. उत्तम वक्ते असलेले नाथ जनतेशी सहज सोप्या भाषेत संवाद साधत. यामुळे बॅ. नाथ पै हे कोकणातील प्रत्येक कुटुंबाला आपले वाटत. नि:स्वार्थी, सरळ, साधा स्वभाव जगण्यातला, वागण्यातला आणि बोलण्यातील असलेली सत्यता यामुळे बॅ. नाथ पै हे आदर्शच राहिले. बॅ. नाथ पै यांना त्यावेळचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी काँग्रेसमध्ये मंत्रीपद देऊ केले; परंतु बॅ. नाथ पै यांनी ते विनम्रपणे नाकारले.
बॅ. नाथ पै यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते. नाथांच्या भाषणांचा प्रभाव संसदेत होता. बॅ. नाथ पै बोलायला उभे राहिले की, सरकारचे दोष दाखवत. सत्ताधारी काँग्रेसच्या अनेक निर्णयांवर नाथांनी आपल्या भाषणातून आसूड ओढले आहेत; परंतु दोष दाखवतानाही ज्या हळुवारपणे ते दाखवत ते नाथांचे कसब होते. बॅ. नाथ पै अल्पायुषी ठरले. ४९व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नी क्रिस्टल या ऑस्ट्रेलियाच्या होत्या. बॅ. नाथ पै यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा बॅ. नाथ पै यांच्या घरी १०,०००(दहा हजार रुपये) शिल्लक होते. नाथांच्या पत्नी श्रीमती क्रिस्टल यांनी ते दहा हजारांचे पाकीट नाथांच्या मृत्यूनंतर राजापूर लोकसभा मतदारसंघ निवडणूक लढविणाऱ्या स्व. प्रा. मधू दंडवते यांच्या हाती दिले आणि समाजवादी पक्षकार्याला ते खर्च करायला सांगितले. प्रा. मधू दंडवते यांनी पुढची पंचवीस वर्षे राजापूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तब्बल चाळीस वर्षे बॅ. नाथ पै यांच्या विचारांचा राजकीय प्रभाव राहिला. साधा माणूस; परंतु उच्च विचारसरणी असलेल्या बॅ. नाथ पै यांचा विचार आणि त्यांचं स्थान अबाधितच आहे. नाथांच्या प्रा. मधू दंडवते यांच्यासोबत वावरणारी, त्यांच्यासोबत काम केलेली काही मोजकी माणसेच आज हयात आहेत. बॅ. नाथ पै यांचा विषय जरी कोकणात कोणत्या गावी निघाला आणि त्या पिढीच्या कोणी ज्येष्ठ जर तिथे उपस्थित असेल, तर नाथांच्या असंख्य आठवणी तो भरभरून बोलल्याशिवाय राहणार नाही. या राजापूर मतदारसंघाचे नंतर नाव बदलले गेले. आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ म्हणून अस्तित्वात आला. कर्नल सुधीर सावंत, निलेश राणे, विनायक राऊत यांना या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याचे भाग्य लाभले.
कोकणातील या मतदारसंघाला एक वेगळा वारसा आहे. विचारांचा, अभ्यासूपणाचा आहे. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व कोण करणार? हा विषय चर्चिला जात आहे. २०१४ आणि २०१९ साली या मतदारसंघातून शिवसेना-भाजप पक्षाला जनतेने कौल दिला होता. आजच्या घडीला या मतदारसंघाचं चित्र वेगळे आहे. २०१९ च्या निवडणुकीत स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविलेल्या माजी खासदार निलेश राणे यांना तीन लाख मतं मिळाली होती. या निवडणुकीत ही तीन लाख मतं भाजपसोबत आहेत. यामुळे मतदारसंघाचे या निवडणुकीचे चित्र वेगळे असणार आहे. या मतदारसंघाचे गेली १० वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या खा. विनायक राऊत यांनी फक्त राणे विरोध, राणेंवर टीका असा एककलमी कार्यक्रम राबविला. हे गेल्या दहा वर्षांतील राजकारणाकडे तटस्थपणे पाहिल्यावर समजून येते. दहा वर्षांत सत्तेत असूनही विकासात एक पाऊलही त्यांना पुढे टाकता आले नाही. संसदेतील कामगिरीबद्दल न बोलणेच योग्य ठरेल. याचं कारण त्यावर काही बोलावं आणि एेकावं अशी कोणतीही कामगिरी नाही. केवळ भाजप-सेना युती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा करिष्मा यामुळे विनायक राऊत यांना या मतदारसंघातून दोन वेळा निवडून जाण्याची संधी मिळाली हे वास्तव कुणाही राजकीय धुरिणांना खोडून काढता येणार नाही. २०२४ च्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशी आताच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली आहे. काय होणार? कोण कोणासोबत असणार? उमेदवार कोण असणार हे सर्व जर-तरचे प्रश्न आहेत. जर-तरवर राजकीय अंदाज बांधणं योग्य होणार नाही. जे होईल ते दिसेलच; परंतु शेवटी राजकारण आहे ना! मग चर्चा तर होत राहणारच.