
नेमकं काय झालं?
सांगली : हल्ली गणेशोत्सवाला (Ganeshotsav) धांगडधिंग्याचे एक वेगळेच स्वरुप आले आहे. गणपतींच्या मिरवणुका काढत लोक अक्षरशः डीजेच्या प्रचंड आवाजात वेडेवाकडे नाचतात. गणपती तर बाजूला राहतोच मात्र या कर्कश डीजेंमुळे परिसरातील नागरिकांनाही त्रास होतो. अशीच एक दुर्घटना सांगलीत घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीमधील डीजेच्या दणदणाटामुळे सांगलीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
सांगली जिल्ह्यात तासगाव तालुक्यातील कवठेएकंदमधील शेखर पावशे या बत्तीस वर्षीय आणि वाळवा तालुक्यातील दुधारीमधील प्रवीण शिरतोडे या ३५ वर्षीय तरुणांचा सोमवारी रात्री अचानक मृत्यू झाला. हा मृत्यू मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटाने अस्वस्थ वाटू लागल्याने झाल्याचे समोर आले आहे. यामधील शेखर पावशेची १० दिवसांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती.
नाचत असतानाच प्रवीणला चक्कर आली
दुधारी येथील प्रवीण शिरतोडेचा सेंट्रिंग व्यवसाय आहे. सोमवारी संध्याकाळी सात वाजता कामावरून घरी परतत असताना रस्त्यात त्याची दुचाकी बंद पडली. त्यामुळे बरंच अंतर दुचाकी ढकलतच त्याने पार केलं. घरी पोहोचल्यावर परिसरातील मंडळाचीच मिरवणूक असल्याने डबा व गाडी घरी ठेवून तो लगेचच मिरवणुकीत सामील झाला. परंतु दुचाकी ढकलत घरी आल्यामुळे आधीच त्याला दम लागला होता त्यात डीजेच्या आवाजाने त्याला आणखी अस्वस्थ वाटू लागले. नाचत असतानाच त्याला चक्कर आली व तो खाली पडला. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याला तातडीने उपचारासाठी इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते.
शेखरची १० दिवसांपूर्वी झाली होती अँजिओप्लास्टी
सोमवारी रात्री शेखर पावशे एका गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. त्यावेळी विविध मंडळांसमोर जोरजोराने गाणी वाजत होती. एकावर एक असे बॉक्सचे थर चढवून गाणी वाजवली जात होती. तीव्र आवाजाच्या ध्वनिक्षेपकांमुळे संपूर्ण गावात दणदणाट सुरु होता. मिरवणुकीत चालणाऱ्या शेखरला रात्री १० वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागले. बसस्थानक परिसरात जाईपर्यंत त्रास वाढल्याने तो घरी परतला. घरात भोवळ येऊन पडला. छातीत असह्य वेदना होऊ लागल्याने तासगावला खासगी रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला. अवघ्या १० दिवसांपूर्वीच त्याच्या हृदयाची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया झाली होती. शेखर पावशेचा पलूस येथे चारचाकी वाहने दुरुस्तीचा व्यवसाय होता. त्याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांची एक मुलगी, वडील, भाऊ असा परिवार आहे. ऐन उमेदीत तरुणाचा नाहक मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
खबरदारी घ्यायला हवी...
सणसमारंभ साजरे करताना ते दणक्यातच झाले पाहिजेत. मात्र आपण करत असलेल्या कृत्यांचा इतरांना त्रास होणार नाही, याचीही काळजी आपण घेतली पाहिजे. पारंपरिक पद्धतीने गणरायाचे आगमन झाले तर प्रसन्नताही येईल आणि ध्वनिप्रदूषणालाही आळा बसेल. त्यामुळे खबरदारी घेऊन सण समारंभ साजरे झाले तर अशा दुर्घटना टळतील.