
मुंबई पोलिसांच्या रजा रद्द... कडक बंदोबस्तासाठी पोलीस सज्ज
जाणून घ्या कोणते रस्ते बंद आणि काय आहेत पर्यायी मार्ग?
मुंबई : म्हणता म्हणता मुंबईकरांसाठी उत्साहाचा असा गणेशोत्सव (Ganeshotsav)अखेरच्या टप्प्यात आला आहे. दहा दिवस बाप्पाची मनोभावे पूजा करता करता अनंतचतुर्दशीचा (Anant Chaturdashi) दिवस उद्यावर येऊन ठेपला हे कळलं देखील नाही. आपल्या याच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबईत गणेशभक्तांची हमखास गर्दी पाहायला मिळणार आहे. ज्यांना लांबच्या लांब रांगा लावून मंडपात बाप्पाचे दर्शन घेणे शक्य होत नाही ते हमखास गिरगांव चौपाटी, दादर चौपाटी अशा ठिकाणी बाप्पाच्या अखेरच्या दर्शनाकरता जातात. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनेक महत्त्वाचे रस्ते बंद ठेवण्यात येणार आहेत. शिवाय मुंबई पोलिसांच्या रजा रद्द करण्यात आल्या असून त्यांना २४ तासांच्या कडक पहाऱ्यासाठी ऑन ड्युटी राहावं लागणार आहे.
मुंबईतील गर्दीत होणाऱ्या चोऱ्यामाऱ्या, हाणामारी असले प्रकार टाळण्यासाठी मुंबई महापालिका, पोलिस, वाहतूक शाखा यासह विविध सरकारी यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. विसर्जनाच्या दिवशी मुंबई शहर आणि उपनगरातील महत्त्वाचे रस्ते बंद राहणार आहेत. तसेच अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबईतील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या वैद्यकीय रजा वगळता इतर सगळ्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत. चौपाट्या, तलाव या ठिकाणी पालिकेने विसर्जनाची चोख तयारी ठेवली आहे.
कोणते मार्ग राहणार बंद?
नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे मार्ग, रामभाऊ साळगावकर मार्ग, सीएसएमटी जंक्शनते मेट्रो जंक्शन, जे. एस. एस. रोड, विठ्ठलभाई पटेल मार्ग, बाबासाहेब जयकर मार्ग, राजाराम मोहन रॉय रोड, कावसजी पटेल टँक रोड, संत सेना मार्ग, नानुभाऊ देसाई रोड, सरदार वल्लभभाई पटेल रोड, दादासाहेब भडकमकर मार्ग, सरदार वल्लभभाई पटेल मार्ग, वाळकेश्वर रस्ता, पंडिता रमाबाई मार्ग, जगन्नाथ शंकरशेठ मार्ग, एम.एस.अली मार्ग, पठ्ठे बापूराव मार्ग, ताडदेव मार्ग, जहांगीर बोमण बेहराम मार्ग, एन. एम. जोशी मार्ग, बी. जे मार्ग, मिर्झा गालीब मार्ग, मौलान आझाद रोड, बेलासिस रोड,मौलाना शौकत अली रोड, डॉ. बी. ए. रोड, चिंचपोकळी जंक्शन ते गॅस कंपनी, भोईवाडा नाका ते हिंदमाता जंक्शन, केईएम रोड, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, रानडे रोड, संत ज्ञानेश्वर मंदिर रोड, जांभेकर महाराज मार्ग, केळूस्कर रोड दक्षिण मार्ग, टिळक उड्डाण पूल, ६० फिट रोड, माहिम सायन लिंक रोड, टी. एच. कटारिय मार्ग, माटुंगा लेबर कॅम्प रोड, एल. बी. एस. रस्ता, न्यु मिल रोड, संत रोहिदास मार्ग.
अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना निर्बंधातून सूट
मुंबईतील मुख्य रस्ते सकाळच्या वेळी सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. तसेच या रस्त्यांवर वाहने पार्क करण्यासही बंदी करण्यात आली आहे. बंद असलेल्या मार्गांचे पर्यायी मार्ग वाहतूक विभागाकडून देण्यात आले आहेत. तसेच या दिवशी मुंबईत येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. मात्र या निर्बंधातून भाजीपाला, दूध तसेच अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या वाहनांना सूट देण्यात आली आहे.