इंडिया कॉलिंग: डॉ. सुकृत खांडेकर
भारतात खलिस्तानची निर्मिती व्हावी अशी मागणी करणाऱ्या कॅनडातील खलिस्तानवाद्यांना कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो संरक्षण देत आहेत व त्यांचे समर्थनही करीत आहेत. भारताने ज्यांना दहशतवादी घोषित केले, अशा दोन डझन खतरनाक खलिस्तानवाद्यांची यादी भारताने कॅनडाला यापूर्वीच दिली आहे. पण त्यावर कॅनडा सरकारने कोणताही कारवाई केलेली नाही किंवा कारवाई करण्याची तयारीही दर्शवलेली नाही. उलट भारताने फरार म्हणून घोषित केलेल्या हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानवाद्याची कॅनडात हत्या झाल्यानंतर त्या देशाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी स्वत:च त्या हत्येत भारतीय एजन्सीचा हात आहे असे जाहीर करून भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. कॅनडाचे पंतप्रधान भारत सरकारने ज्यांना दहशतवादी म्हणून घोषित केले आहे, त्यांचीच बाजू का घेत आहेत? खलिस्तानवाद्यांना संरक्षण देणे व त्यांचे समर्थन करणे हे भविष्यात कॅनडालाही महागात पडू शकते.
खलिस्तानवाद्यांनी पंजाबमध्ये चार दशकांपूर्वी रक्तरंजित हिंसाचार घडवला होता. काही काळाने हेच खलिस्तानवादी कॅनडामध्ये हिंसाचाराचा धुडगूस घालतील तेव्हा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो काय करतील? खलिस्तानवाद्यांचे कॅनडामध्ये तेथील सरकारने लाड चालूच ठेवले, तर तेच भविष्यात कॅनडामध्येच खलिस्तानची मागणी करतील तेव्हा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो त्यांना रोखू शकतील का?
जेव्हा भारतात खलिस्तान चळवळ जोरात होती तेव्हा जे घडले, ते भविष्यात कॅनडामध्ये घडू शकते. भारतात भिंद्रानवाले निर्माण झाले आणि त्याने सरकारलाच कसे आव्हान दिले हे सर्व देशाने अनुभवले आहे. जेव्हा इंदिरा गांधींच्या कारकिर्दीत ऑपरेशन ब्लू स्टार मोहीम राबवली गेली आणि अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातून दहशतवाद्यांना वेचून वेचून भारतीय सैन्य दलाने संपवले. त्यानंतर खलिस्तानची चळवळ संपुष्टात आली. हा सर्व इतिहास जगापुढे असताना कॅनडाचे सत्ताधारी तेथील खलिस्तानवाद्यांना का आश्रय देत आहेत व त्यांचे समर्थन करून भारत सरकारलाच का जाब विचारत आहेत?
पंजाबमध्ये खलिस्तानवादी चळवळ जोरात होती तेव्हा पंजाबातील हिंदूंनी पंजाब सोडून निघून जावे असे फर्मान काढले होते. आता कॅनडामधील हिंदूंनी भारतात निघून जावे असा फतवा शीख फॉर जस्टिसचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू याने अमेरिकेतून काढला आहे. जे पंजाबमध्ये घडले तसे आता कॅनडात घडू लागले, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे?
पंजाब राज्यात १९८० मध्ये खलिस्तानवाद्यांची चळवळ जोर धरू लागली तेव्हा तत्कालीन इंदिरा गांधी सरकारने त्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले. पंजाबमध्ये हिंदूंवर हल्ले होऊ लागले व तेथील हिंदू पंजाब सोडून दिल्लीकडे जाऊ लागले तेव्हा इंदिरा गांधींना त्याचे गांभीर्य समजले. भिंद्रानवाले याची लोकप्रियता वेगाने वाढली तेव्हा सुरुवातीलाच त्याला चाप लावायला हवा होता. पण केंद्र सरकारने तेव्हा तसे काहीच केले नाही. पण भिंद्रानवाले जेव्हा भारत सरकारलाच डोईजड होऊ लागले तेव्हा त्याला संपविल्याशिवाय खलिस्तान चळवळ संपणार नाही हे कळून चुकले. ज्या काँग्रेस पक्षाने स्वत:च्या राजकीय लाभासाठी भिन्द्रानवालेला खतपाणी घातले तेच भिन्द्रानवाले हे काँग्रेससाठी नंतर भस्मासूर ठरले. शीख समाजाचे सर्वोच्च श्रद्धास्थान असलेल्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातच त्याने आपला तळ ठोकला होता. तेथे त्याच्यापर्यंत पोहोचणेही कठीण होते. भिंद्रानवालेला सुवर्ण मंदिरातून बाहेर काढण्यासाठी इंदिरा गांधींना लष्कराची मदत घ्यावी लागली. ऑपरेशन ब्लू स्टारमध्ये त्याची हत्या झाली. त्याच्याच दोन सुरक्षा रक्षकांनी त्याची हत्या केली असेही सांगण्यात आले.
चाळीस वर्षांपूर्वी भारतात पंजाबमध्ये घडले त्याची सुरुवात आता कॅनडात झाली आहे काय? १९८० च्या दशकात खलिस्तान समर्थकांची सुरुवात कॅनडात झाली, त्यावेळी पियरे ट्रुडो हे कॅनडाचे पंतप्रधान होते. आजचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे ते वडील. त्यावेळी भारतातून तलविंदर परमार हा दहशतवादी चार पोलिसांची हत्या करून कॅनडाला पळाला होता. इंदिरा गांधी या पियरे ट्रुडो यांना चांगल्या ओळखत होत्या. त्यांनी पंतप्रधान असताना कॅनडाला भेट दिली होती. मात्र १९८२ मध्ये इंदिराजींनी तत्कालीन पंतप्रधान पियरे ट्रुडो यांच्याकडे तलविंदर परमारला भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणी केली तेव्हा त्यांनी ती फेटाळून लावली.
पियरे ट्रुडो हे पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यावर साधारण वर्षभराने जून १९८५ मध्ये एअर इंडियाच्या लंडन ते मुंबई फ्लाईट नंबर १८२ (कनिष्क)मध्ये मोठा बॉम्बस्फोट झाला व विमानातील सर्वच्या सर्व ३२९ प्रवासी ठार झाले. मरण पावलेल्यांत कॅनडाचेच नागरिक जास्त होते. या विमान बॉम्बस्फोटात कॅनडातील काही परिवार संपूर्ण संपले. विमानात बॉम्बस्फोट घडविण्यामागे तलविंदर परमार हाच सू्त्रधार होता. जस्टिन ट्रुडोचे पिताजी पियरे ट्रुडो यांनी इंदिरा गांधींची मागणी मान्य करून तलविंदर परमारला भारताच्या स्वाधीन केले असते, तर कनिष्क विमानातील बॉम्बस्फोटाची घटना कदाचित टळली असती. जी चूक वडिलांनी केली तीच चूक आज त्यांचा मुलगा कॅनडाच्या पंतप्रधानपदावर असताना करीत आहे का? तेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या, आज नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत. निज्जर हत्येप्रकरणी जस्टिन ट्रुडो हे भारतावर गंभीर व सनसनाटी आरोप करून कॅनडातील खलिस्तानवाद्यांचे समर्थन करीत आहेत, हे मोठे दुर्दैव आहे. कॅनडातील आपले सरकार चालविण्यासाठी खलिस्तानवादी– दहशतवाद्यांचे समर्थन करणे ही पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची मोठी चूक आहे. कॅनडाचे पंतप्रधानच निज्जार हत्या प्रकरणी जाहीरपणे भारताला जबाबदार धरीत आहेत म्हणून कॅनडातील खलिस्तानवाद्यांना एकप्रकारचे बळ प्राप्त होत आहे. विशेष म्हणजे कॅनडामधील भारतीय दूतावासालाही कॅनडाने निज्जार हत्येप्रकरणात गोवले आहे व तेथील भारताच्या उच्चायुक्तांची भारतात तत्काळ पाठवणी केली आहे. भारतानेही कॅनडाच्या नवी दिल्लीतील राजदूताला मायदेशी पाठवून देऊन कॅनडाला जशास तसे उत्तर
दिले आहे.
कॅनडातील खलिस्तानवाद्यांनी कॅनडातील भारतीय दूतावासापुढे निदर्शने केली. त्याची आखणी कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया परिसरातील गुरुद्वारामध्ये झाली अशीही माहिती पुढे आली आहे. कॅनडातील खलिस्तानवादी भारत विरोधी सतत काही ना काही कार्यक्रम राबवत असतात. खलिस्तानवाद्यांचे भारत विरोधी फलक गुरुद्वारांच्या अवती-भोवती नेहमीच झळकत असतात. मध्यंतरी इंदिरा गांधींच्या हत्येचा एक चित्ररथ घेऊन खलिस्तानवाद्यांनी मोठी शोभा यात्रा काढली होती.
पण त्यांना कोणी रोखले नाही हे जास्त गंभीर आहे. कॅनडाच्या भूमीवर खलिस्तान समर्थकांना कॅनडा सरकार गेली अनेक वर्षे आश्रय देत आहे आणि आता भारत विरोधी कारवायांना सुद्धा मोकळीक देत आहे. भारताच्या विरोधात मिरवणुका-मोर्च काढणे किंवा फलक झळकवणे यासाठी त्यांना पोलिसांची व अन्य यंत्रणांची परवानगी कशी दिली जाते हे गूढ आहे. स्वत: कॅनडाचे पंतप्रधानच खलिस्तानवाद्यांची बाजू घेत आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस भारत-कॅनडा यांच्या संबंधात तणाव वाढत चालला आहे. कॅनडातील हिंदू लोकांची सुरक्षितता हा चिंतेचा विषय बनला आहे. भारतीय मूळ वंशाचे असलेले कॅनडामधील खासदार चंद्र आर्य यांनी खलिस्तानी कारवायांपासून कॅनडातील अल्पसंख्य असलेल्या हिंदूंना धोका निर्माण होऊ शकतो. हिंदू सध्या भयभीत आहेत, असे म्हटले आहे.
खलिस्तानी कारवाया वाढत असतानाच गुरपतसिंह पन्नू याने कॅनडातील हिंदूंनी भारतात निघून जावे अशी धमकी दिल्यानंतर कॅनडा सरकारने मात्र या देशात द्वेष व मत्सर याला जागा नाही असे स्पष्ट केले आहे. निज्जार हत्येप्रकरणी भारताने कॅनडाला तपासात सहकार्य करावे असे अमेरिकेने म्हटले आहे. त्याच अमेरिकेत शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत पन्नू अमेरिकन नागरिक म्हणून राहात आहे. भारताने त्याला फरार म्हणून घोषित केले आहे. भारताच्या नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सीने त्याची अमृतसर व चंदिगढमधील मालमत्ता जप्त केली आहे. कॅनडा सरकार ज्या पद्धतीने तेथील खलिस्तानवाद्यांची बाजू घेत आहे ते पाहता तोच भस्मासूर कॅनडाच्या सरकारला भविष्यात भारी पडू शकतो. कॅनडामध्ये खलिस्तानवाद्यांनी हिंसाचार सुरू केला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे? नवा भिंद्रानवाले निर्माण होण्यापूर्वीच कॅनडाने वेळीस सावध व्हावे?
[email protected]
[email protected]