गैरप्रकार रोखण्यासाठी Department of Telecommunication ने जारी केली नोटीस
नवी दिल्ली : मोबाईल टॉवर उभारण्यासाठी दूरसंवाद विभाग (Department of Telecommunication) आणि ट्रायकडून (TRAI) एनओसी मिळवून देतो, अशी बतावणी करुन लोकांची फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्याने, मोबाईल टॉवर उभारण्यासाठी दूरसंवाद विभाग, ट्राय किंवा त्यांचे अधिकारी कोणतेही ना हरकत प्रमाणपत्र देत नाहीत, असे दूरसंवाद विभागाने स्पष्ट केले आहे.
एक कंपनी मोबाईल टॉवर लावण्यासाठी नोंदणी शुल्क म्हणून ३८०० रुपये मागत आहे आणि ४५ हजार रुपये मासिक भाडे देण्याचा दावा करत आहे आणि ४० लाखांचे आगाऊ पेमेंट करत आहे, अशी माहिती समोर आली आहे. पण ट्रायच्या नावावर ही फसवणूक होत असल्याचा खुलासा पीआयबी कडून करण्यात आला आहे.
भ्रमणध्वनीसाठी मनोरा उभारण्याच्या मोबदल्यात भरघोस मासिक भाडे देण्याची बतावणी करणाऱ्या व्यक्ती, यंत्रणा आणि कंपन्यांपासून जनतेने सावध राहावे, अशी सूचना दूरसंवाद विभागाने केली आहे. भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्याकरता जागा भाडेतत्त्वावर देण्याबाबत व्यवहारात दूरसंवाद विभाग किंवा ट्राय अर्थात भारतीय दूरसंवाद नियामक प्राधिकरणाचा कोणत्याही प्रकारे सहभाग नसतो.
भ्रमणध्वनीचा मनोरा उभारण्यापूर्वी कोणत्याही स्वरुपात आगाऊ रकमेची मागणी करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा कंपन्यांच्या पात्रतादर्शक बाबींची, जनतेने अत्यंत जागरूक राहून व्यवस्थित चौकशी करावी. मनोरा उभारण्याच्या प्रस्तावावर विचार करण्याआधी दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध टी.एस.पी./आय.पी.-१ ची वैधता तपासून घ्यावी.
टी.एस.पी. आणि आय.पी.-१ ची अद्ययावत यादी दूरसंवाद विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे-
https://dot.gov.in/access-services/list-access-service-licences-issued
https://dot.gov.in/infrastructure-provider
अशा प्रकारच्या घोटाळ्यांची तक्रार कुठे करावी?
अशा प्रकारचा घोटाळा लक्षात आल्यास, संबंधित प्रसंगाची स्थानिक पोलिसांकडे तक्रार करावी.
दूरसंवाद विभागाच्या स्थानिक क्षेत्रीय कक्षाशी खालील पत्त्यावर संपर्क करता येईल :
जे.टी.ओ. (कॉम्प्लायन्स), केअर ऑफ वरिष्ठ उप-महासंचालक, दूरसंवाद विभाग मुंबई एल.एस.ए. पाचवा मजला, टेक्निकल कक्ष, साकी विहार टेलिफोन एक्स्चेंज बिल्डिंग, साकी विहार रस्ता, अंधेरी (पूर्व), मुंबई – ७२