
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहणाची घटना खगोलीय घटनांपैकी एक मानली जाते. २०२३ वर्षातील पहिले सूर्यग्रहण (solar eclipse 2023) २० एप्रिल रोजी झाले होते, तर दुसरे सूर्यग्रहण (solar eclipse) शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर या वर्षातील पहिले चंद्रग्रहण ५ मे रोजी झाले होते. तर दुसरे चंद्रग्रहण (lunar eclipse) कोजागिरी पौर्णिमेला शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, ते केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. पण त्याचा परिणाम संपूर्ण जगावर दिसून येईल.
हिंदू कालगणनेनुसार २०२३ वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर रोजी रात्री ८:३४ वाजता होत आहे जे पहाटे २:२५ वाजता संपेल. हा दिवस अमावस्या तिथी आहे. परंतू, हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यामुळे सुतक कालावधी वैध राहणार नाही. मुख्यतः सूर्यग्रहण अँटिग्वा, कॅनडा, ब्राझील, जमैका, अमेरिका, कोलंबिया इत्यादी देशांमध्ये पाहता येईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा सूर्यग्रहण होते तेव्हा त्याचा प्रभाव सर्व १२ राशींवरही दिसून येतो. या काळात सूर्यग्रहण झाल्यामुळे त्याचा प्रभाव काही राशींवर दिसून येईल यामध्ये मेष, कर्क, तूळ आणि मकर, या राशींचा समावेश आहे. तसेच या काळात संबंधित राशी असलेल्या लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
दुसरे सूर्यग्रहण १४ ऑक्टोबर, शनिवारी होणार आहे, जे एक कंकणाकृती पूर्ण सूर्यग्रहण असणार आहे आणि त्याला रिंग ऑफ फायरदेखील म्हटले जाते.
हे कंकणाकृती सूर्यग्रहण उत्तर-पश्चिम युनायटेड स्टेट्स, मेक्सिको, मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिका, पॅसिफिक, अटलांटिक आणि आर्क्टिक प्रदेशांसह अनेक भागांमधून पाहता येईल. याशिवाय, इतर पाश्चात्य देशांमधून सूर्यग्रहणाचा काही भाग पाहता येईल. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाने हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी डोळ्यांच्या संरक्षणासाठी विशेष चष्मा वापरण्याचा सल्ला दिला आहे.
२०२३ मधील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण २८-२९ ऑक्टोबरच्या रात्री होणार आहे. हे ग्रहण युरोप, आशिया, ऑस्ट्रेलियासह जगातील अनेक भागांतून पाहता येणार आहे. हे आंशिक चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राच्या काही भागालाच ग्रहण लागणार आहे. हे ग्रहण रविवार २९ ऑक्टोबर रोजी पहाटे १:०६ वाजता दिसेल आणि पहाटे २:२२ वाजता समाप्त होईल.
वर्षातील दुसरे चंद्रग्रहण भारतातून पाहिले जाऊ शकते, नवी दिल्ली येथे २९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री ०१:४४:०५ वाजता ग्रहण दिसेल.
ज्योतिषशास्त्रानुसार सूर्यग्रहणाच्या वेळी अन्नपदार्थात तुळशीची पाने टाकल्यास नकारात्मक ऊर्जा निष्क्रिय होऊन अन्न शुद्ध राहते. या ग्रहणाचा अनेक राशींवर वाईट परिणाम होईल. राजकारण आणि व्यवसायात उलथापालथ होईल. गुप्त खात्यात खूप गडबड होईल. तथापि, ज्या ठिकाणी सूर्यास्त पूर्वी होईल तिथे तारण कालावधी आधीच संपेल. या सूर्यग्रहणाचे वेगवेगळ्या राशींवर वेगवेगळे परिणाम (Solar Eclipse Effect on Zodiac) होतील.
सूर्यग्रहणाच्या दिवशी करावे आणि काय करू नये
ग्रहणाच्या दिवशी पृथ्वीवर असे काही प्रभाव पडतात ज्यामुळे वातावरण प्रदूषित होते. या कारणास्तव ते धर्माशी जोडले गेले आहे. ग्रहणाच्या वेळी आपण काही सावधगिरी बाळगली पाहिजे.
पचनशक्ती सांभाळा
सूर्यग्रहणामुळे पचन शक्तीवर परिणाम होतो. यामुळेच सूर्यग्रहण काळात जेवण करू नये, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. पण, दिवसभर उपाशी राहणे काही लोकांना शक्य नसल्यास पचायला हलके पदार्थ, डाळ खिचडी, शाबूदाण्याची खीर असा हलका आहार घ्यावा.
डोळ्यांना जपा
सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. ग्रहणातून हानिकारक किरणांमुळे डोळ्याच्या रेटिनासाठी योग्य नसते. या हानिकारक किरणांमुळे डोळ्यांची दृष्टी कमी होते. त्यामुळे सूर्यग्रहण नेहमी गडद काळ्या चष्म्यानेच पाहावे.
गर्भवती स्त्रीयांनी काळजी घ्यावी
सूर्यग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना काही वेळा काळजी घेण्यास सांगितले जाते. यामुळे पोटातील गर्भावर वाईट परिणाम होऊ शकतो. परंतू या गोष्टीत काही तथ्य नसल्याचे विज्ञान सांगते.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या माहितीच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. दैनिक प्रहार या गोष्टींना तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. याबाबत अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)