
पुणे : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची आणि कुस्तीचा कुंभमेळा असणाऱ्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) किताबाच्या आणि वरिष्ठ अजिंक्यपद माती-गादी कुस्ती स्पर्धेचा थरार नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात रंगणार आहे.
यंदा या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी सोमेश्वर प्रतिष्ठानला मिळाली असून पुणे जिल्ह्यातील लोणीकंद-फुलगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिक स्कूलच्या मैदानावर ही भव्य स्पर्धा होणार आहे.
यासंबंधी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष खासदार रामदास तडस आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे मुख्य संयोजक सोमेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.