
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून कल्याण लोकसभेच्या (Kalyan Loksabha) जागेसाठी शिवसेना व भाजप यांच्यात संघर्ष सुरु असल्याची चर्चा होत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) कल्याणमधून खासदार आहेत. तरीदेखील भाजप या जागेवर दावा करत असल्याची परिस्थिती होती. परंतु यामुळे दोन्ही पक्षांत वाद निर्माण होतील अशी चिन्हे दिसत होती. त्यामुळेच युतीवर याचा काहीही परिणाम होऊ नये याकरता चर्चा करुन हा प्रश्न सोडवण्यात आला आहे. यानुसार आता कल्याण लोकसभा मतदारसंघाची ही जागा शिवसेनाच लढवणार यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाले आहे.
याआधीही कल्याणच्या जागेवर व्यवस्थित चर्चा करुन तो प्रश्न सोडवण्यात येईल, असं भाजप व शिवसेनेच्या नेत्यांकडून वारंवार सांगण्यात येत होतं. तसेच यामुळे दोन्ही पक्षांमध्ये कोणताही संघर्ष नसल्याचंही सांगितलं गेलं होतं. मात्र माध्यमांनी दोन्ही पक्षांमध्ये वाद असल्याचे सांगितले. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. यावर आता तोडगा निघाल्याने अशा चर्चांना विराम मिळाला आहे.
कल्याणच्या जागेवर दोन्ही पक्षांकडून करण्यात येत असलेला दावा युतीसाठी हानिकारक असल्याचे वेळीच लक्षात आल्याने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, आता कल्याण लोकसभा मतदारसंघाची लोकसभेची जागा शिवसेनेने लढवावी आणि ठाणे भाजपला द्यावी, असा प्रस्ताव मान्य होण्याची शक्यता आहे.