Thursday, March 27, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यसंस्कार सेवाभावी संस्था, ठाणे

संस्कार सेवाभावी संस्था, ठाणे

सेवाव्रती: शिबानी जोशी

ठाणे शहर झपाट्याने वाढत आहे. तसेच ठाणे जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांत अनेक समस्या निर्माण होत  आहेत, त्या लक्षात घेऊन ‘संस्कार’ ही बहुविध क्षेत्रात काम करणारी सेवाभावी संस्था स्थापन झाली. तिची स्थापना ९ जुलै २००४ रोजी झाली. आमदार संजय केळकर व समविचारी तरुणांनी एकत्र येऊन या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. सुरुवातीच्या काळात गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वह्यांचे वाटप, शाळांमधील लहान मुलांना प्रथमोपचाराचे धडे, जे विद्यार्थी हुशार आहेत, पण घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेता येत नाही अशा गरजूंना आर्थिक मदत अशा उपक्रमांतून संस्थेच्या कामाला प्रारंभ झाला. गेल्या १८ वर्षांत संस्थेच्या कामाचा व्याप व आवाका वाढला असून अपघातग्रस्तांना वा मृतांच्या नातेवाइकांना मदत या  अभिनव उपक्रमांमुळे संस्थेची कीर्ती सर्वदूर पोहोचली आहे. संतोष साळुंखे, बाळाराम खोपकर, संतोष मिश्रा, महेश विनेरकर, विष्णू रानडे, तेजल, पातकर आदी जुन्या कार्यकर्त्यांसमवेतच कित्येक नवे कार्यकर्ते संस्थेला जोडले गेल्यामुळे ती सर्वसमावेशक झाली आहे. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटप उपक्रमाला आता १३ वर्षे उलटून गेली असून त्याला भव्य स्वरूप प्राप्त झाले आहे. शहरातील निरनिराळ्या शाळांमधून हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जातो. दरवर्षी साधारणपणे १५ हजार वह्यांचे वाटप होते. आजवर दीड लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा लाभ झालाय. संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक, संस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात.

विशेषत: शेतकऱ्यांकरिता व  नागरिकांच्या सोयीकरता राबवले जाणारे खास उपक्रम हे  वैशिष्ट्य म्हणता येईल. हल्ली आपण जागोजागी आठवडी बाजार “थेट शेतातून घरात” हा कन्सेप्ट पाहत आहोत; परंतु महाराष्ट्रातील पहिला शेतकरी आठवडा बाजार “संस्कार”च्या माध्यमातून ठाण्यात सुरू झालाय. ठाण्यातील विविध १० भागांत आठवडा बाजार भरतो. शेतकरी व ग्राहक यांच्या थेट भेटीमुळे दलालांची लुडबुड थांबली तसेच शेतकऱ्याची भाजी आपल्या दारी या उपक्रमातून ठाण्यातील २५ हजार गृहसंकुलात शेतकरी आणि ग्राहक यांची थेट भेट घडू शकली आहे.भाजी उत्पादक शेतकऱ्यांना बाजार उपलब्ध करून देण्याबरोबरच कोकणातील शेतकऱ्यांकरिता आंबा महोत्सवाचे आयोजन गेली १५ वर्षं संस्कारतर्फे केलं जात. आज-काल कृत्रिमरीत्या पिकवलेले आंबे बाजारात मिळतात. हे आंबे प्रकृतीसाठी अपायकारक आहेत. त्यामुळे आंबा महोत्सव सुरू करण्यात आला. महोत्सवाच्या माध्यमातून आंबा उत्पादकांना तसेच ग्राहकांनाही दर्जेदार आणि किफायतशीर आंबा मिळू शकत आहे. कोकणातील थेट हापूस आंबा, पायरी आंबा तसेच कोकणातील विविध उत्पादने खास ठाणेकरांसाठी उपलब्ध करून दिली जातात.

संस्कार संस्थेच्या माध्यमातून कोव्हिड काळात विविध रुग्णालयांच्या सहकार्याने ठाण्यातील हजारो गृहसंकुलात कोव्हिड लसीकरणाचे कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या शिबिराचे आयोजन करून हजारो ठाणेकरांना लसीकरण करून देण्यात आलेय. वरिष्ठ नागरिकांना आधार कार्ड काढणे की एक कसरतच असते ती लक्षात घेऊन “आधारकार्ड आपल्या दारी” या उपक्रमांतर्गत ठाण्यातील हजारो गृहसंकुलात आधारकार्ड शिबिरांचे आयोजन आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. आतापर्यंत ३० हजारांच्या वर नागरिकांना यांचा लाभ घेता आलाय.

लोकशाहीत मतदानाला महत्त्व असते आणि मतदान करून आपण एक चांगला लोकप्रतिनिधी निवडून देऊ त्यासाठी मतदान करणे गरजेचे आहे हे पटवून देण्यासाठी तरुण मतदारांनी मतदानासाठी पुढे यावे यासाठी आधी त्यांचे नाव मतदार यादीत असणे गरजेचं असतं. त्यामुळे तरुणांना मतदार नोंदणी करण्यासाठी उद्युक्त करणे आणि नोंदणी करण्याची सुविधा  देण्याचे काम संस्कार करत असते. याशिवाय अनेक मतदारांना आपल्या मतदान कार्डात दुरुस्ती करायची असते त्यांच्यासाठीही शिबिरांचे आयोजन केले जाते. सुनील काब्रा, दत्ता घाडगे, संजय कदम, वर्षा सुर्वे, स्वप्नाली साळवी, परिक्षित घुमे, किरण धत्तुरे
आदी अनेक जण यासाठी तसंच आठवडा बाजारासाठी
झटत आहेत.

“आरोग्यम” सेवा संस्थेने सुरू केली आहे. अल्पावधीतच ‘आरोग्यम’ सेवेचे १५ हजार कार्ड होल्डर झाले आहेत. ब्लडप्रेशर, डायबेटीस, गुडघेदुखी, हृदयविकार, मूळव्याध,  आदी अनेक आजारांवर औषधे घेणाऱ्या लोकांना खर्च सध्या वाढता आहे. घरातली महिला जेवणाची वेळ झाली की, ‘जेवायला चला’ असे म्हणत  आता त्यावेळी ‘गोळी घ्या’ असे म्हणते. यावरून औषधाच्या खर्चाची कल्पना यावी. कॅन्सर, लिव्हर, किडनी फेल्युअर व इतर मोठ्या आजारावर मेडिकल उपकरणांवर  सवलत या कार्डधारकांना मिळत आहे. ज्यांच्या घरी अडचण असेल त्यांना एका फोनवर आरोग्यसेवक औषधे घरी पोहोचविण्यासाठी व्यवस्था करतात. विक्रमादित्य आंब्रे, कुलदीप आंब्रे, सुधीर रानडे, पंढरीनाथ पवार, कैलास म्हात्रे यांसारख्या अनेक आरोग्यसेवक त्यात मोलाचा वाटा आहे. मेडिकल चेकअपसाठी शिबिरे देखील भरवली  जातात. वाहतूक पोलिसांना दिवसभर उन्हातानात उभे राहावं लागतं. ते लक्षात घेऊन त्यांच्यासाठी आयोजित केलेले एक महिन्याचे मोफत आरोग्य शिबीरही खूपच गाजले होते.

सध्या नव्या पिढीचा ट्रेंड मॉल व बिग बझारमधून भाजी खरेदी करण्याचा आहे. पण तिथल्या भाज्या शिळ्या तसेच बऱ्याच वेळा कमी दर्जाच्याही दिसून आल्या आहेत. ठाणे शहराची व्याप्ती खूप वाढल्यामुळे लोक खूप लांब लांब राहायला गेली आहेत, अशा वेळेला लांबून रोजची भाजी त्रासाची ठरते हे लक्षात घेऊन आठवडी बाजार ही संकल्पना संस्कारने आणली. संस्थेचा ‘आठवडे बाजारा’चा अभिनव उपक्रम सर्वसामान्य लोकांस अत्यंत उपयुक्त ठरला आहे. थेट शेतातल्या २७ प्रकारच्या भाज्या  आठवडे बाजारात बाजारभावापेक्षा स्वस्त किमतीत लोकांना उपलब्ध आहेत. गावदेवी मैदान, राबोडी, खेवरा सर्कल, उन्नती गार्डन, उमा नीलकंठ व्यायाम शाळा, एव्हरेस्ट वर्ल्ड आदी आठ ठिकाणी हा ‘आठवडे बाजार भरत असून त्यामुळे लोकांची चांगली सोय झाली आहे. लोकांना स्वस्त भाजी व फळे उपलब्ध होण्याबरोबरच शेतकऱ्यांना दलालाच्या बेड्यातून सुटका करण्याचा हेतूही साधला गेला आहे. गेले १५१ आठवडे हा आठवडे बाजार ठाण्यात भरत असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला थेट मार्केट उपलब्ध होत आहे. यातील  एक वैशिष्ट्यपूर्ण आठवडे बाजार म्हणजे उमा नीळकंठ व्यायाम शाळेच्या प्रांगणात भरणाऱ्या आठवडे बाजार. यात महिला शेतकरी आपला माल विकतात हे विशेष म्हणावे लागेल. थेट शेतातून कोथिंबीर, मिरची, घेवडा, भेंडी, गवार, फरसबी, टोमॅटो, भोपळा येतो.

संस्थेचे आंबा महोत्सव आणि एकांकिका स्पर्धा हे उपक्रम गेली १७ वर्षे वाढत्या उत्साहाने सुरू असून या दोन्ही उपक्रमांची ठाणेकर वाट पाहत असतात. कोकणच्या शेतकऱ्यांचा आंबा थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश आंबा महोत्सवाने साध्य केला आहे. राजेंद्र तावडे, महेश विनेरकर, पातकर बंधू, अॅड सुभाष काळे, परशुराम जाधव, विष्णू बने आदी  जण यासाठी पुढाकार घेतात. संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेला ‘धान्य महोत्सव’ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी समाधान देणारा ठरला. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांच्या शेतकऱ्यांना बळ मिळण्यासाठीच्या प्रयत्नांना सहकार्य म्हणून संस्थेचे पाऊल योग्य दिशेने पडल्याची भावन ठाणेकरांमध्ये आहे. संस्थेच्या एकांकिका स्पर्धेतून अनेक तरुण कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध झाले. ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड व मुंबई आदी ठिकाणांहून दरवर्षी त्यासाठी २५/३० प्रवेशिका येत असतात. प्रा. प्रदीप ढवळ, हर्षला लिखिते, मंदार टिल्लू, अशोक समेळ, विक्रांत महाडिक आदी अनेकांचा यशस्वी आयोजनात सहभाग असतो. प्रामाणिकपणे, झोकून देऊन काम करणारे कार्यकर्ते हे संस्थेचे खरे बळ आहे. गेल्या २० वर्षांत चांगल्या कामासाठी ‘समाज’ संस्थेला काही कमी पडू देत नाही. युवावर्गानी ही तरुणपणापासूनच समाजकार्यासाठी पुढे यावे अशी अपेक्षा आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली  आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -