पुणे : पुण्यातील अंबिलओढा कॉलनी परिसरातील साने गुरुजी तरुण मंडळाच्या गणेश देखाव्याच्या कळसाला आग अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते आरती सुरु असताना हा प्रकार घडला. पुढील अनर्थ टाळण्यासाठी नड्डा यांना आरती अर्धवट सोडून मंडपातून बाहेर पडावे लागले.
साने गुरुजी तरुण मंडळ हे पुण्यातील भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचे मंडळ आहे. यंदा या मंडळाने उज्जैन येथील महाकाल मंदिराचा भव्य देखावा उभारला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते इथल्या गणेशाच्या आरतीचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार आरती सुरु असतानाच अचानक मंगळवारी संध्याकाळी हा आगीचा प्रकार घडला