
मुंबई : पूर्वजांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी किबहुना त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्ष पंधरवड्यात तिथीनुसार श्राद्धविधी केले जातात. पूर्वजांच्या तिथींची माहिती नसणारे सर्वपित्री अमावस्येला विधी करतात. मात्र यंदा सर्वपित्री अमावस्येला वर्षातील दुसरे सूर्यग्रहण (solar eclipse 2023) आहे. त्यामुळे श्राद्ध विधी १४ ऑक्टोबर रोजी (sarvapitri amavasya) कशा कराव्या, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो. मात्र यंदा अधिक मास आल्यामुळे पितृपक्ष पंधरा दिवस उशीराने आला आहे. या पंधरवड्यातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो. त्यामध्ये नवमी श्राद्ध, भरणी श्राद्ध आणि सर्वपित्री अमावस्या या तिथींना अधिक महत्त्व दिले जाते. यंदा वर्षातले दुसरे सूर्यग्रहण सर्वपित्री अमावस्येला आल्यामुळे श्राद्धविधी करता येतील की नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे.

मात्र हे ग्रहण भारतात दिसणार नसून याचा कुठलाही परिणाम श्राद्धविधीवर होणार नसल्याचे मत खगोलशास्त्र अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.
शास्त्रानुसार ग्रहणकाळ पूजा, पाठ, यासाठी अशुभ मानला जातो. म्हणून पितरांच्या आशीर्वाद प्राप्तीसाठी श्राद्धविधी करावा की नाही याबाबत संभ्रम दिसून येत आहे. पण सर्वपित्री अमावस्येला जरी ग्रहण आले असले तरीही पूर्वजांच्या श्राद्धविधींवर याचा कोणताही परिणाम होणार नाही. उलट पूर्वगृह, दुराग्रह हे सर्व बाजूला ठेवून एकमेकांचा आदर करून केलेल्या श्राद्धविधी या पुर्वजांच्या मनाला शांती देणाऱ्या ठरतील, असेही सोमण यांनी सांगितले. त्यामुळे कोणतीही शंका मनात न ठेवता आपल्या पूर्वजांच्या श्राद्ध विधी तुम्ही करण्यास हरकत नाही, असे सोमण यांनी स्पष्ट केले आहे.