मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज (२५ सप्टेंबर) विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीनंतर आता पुढील सुनावणी १३ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
या सुनावणीमध्ये वेळापत्रक निश्चित होणार असले, तरी ही प्रक्रिया यावर्षी पूर्ण होण्याची शक्यता धुसर आहे. या संभाव्य वेळापत्रक पत्रकात कागदपत्र तपासणी, त्याचबरोबर साक्ष नोंदवणे, उलट तपासणी मुद्द्यांचा समावेश असल्याने या प्रक्रियेत तीन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे. डिसेंबरमध्ये विधानसभेचे हिवाळी अधिवेशन असल्याने त्या दरम्यानच्या कालावधीत सुनावणी होण्याची शक्यता धुसर आहे. त्यामुळे आमदार अपात्रता प्रकरणी यावर्षी निकाल लागणे कठीण असून जानेवारी २०२४ मध्ये निर्णय येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आजच्या सुनावणीला ठाकरे गटाकडून अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू, मुंबईतील आमदार उपस्थित होते. विधानसभा अध्यक्षांसमोर एकूण ३४ याचिका आहेत. या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित होणार आहे. आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांकडून दिरंगाई होत असल्याने ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यशैलीवर अत्यंत कडक शब्दात सुनावले होते. त्यानंतर सुनावणीसाठी वेग आला आहे. मागील सुनावणीत शिंदे गटाकडून कागदपत्रे मिळाली नसल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे त्यांना कागदपत्रे सादर करण्यासाठी दहा दिवसांचा कालावधी देण्यात आला होता. आजच्या सुनावणीनंतर सर्व दाखल याचिकांवर वेळापत्रक निश्चित होण्याची शक्यता आहे. सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी घेण्याची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं? याचा लेखाजोखा मांडायचा आहे. मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला होता. दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेप्रकरणी पुढील सुनावणी ३ ऑक्टोबर रोजी पुन्हा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कम्प्युटर जनरेटेड तारखा असल्यामुळे यामध्ये बदल होण्याची देखील शक्यता आहे.