Friday, March 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजमोदी नावाची दंतकथा भासणारी सत्यकथा!

मोदी नावाची दंतकथा भासणारी सत्यकथा!

विशेष: रवींद्र मुळे

साधारण संघात व्यक्तीबद्दल बोलणे, जाहीर स्तुती करणे, कौतुक करणे, यशाचे श्रेय देणे किंवा अपयश आल्यास कुणावर खापर फोडणे हेही अपेक्षित नसते. असे असले तरी आज भक्त वगैरे दूषणे सहन करूनही देशाचे आज असलेले पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल कौतुक करणे, त्यांच्यावर स्तुतिसुमने वाहणे आणि त्यांच्यावर टोकाचा विश्वास टाकण्याचा कल सर्वत्र स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचा दिसतो आहे. एका अर्थाने ‘larger than life’ अशी प्रतिमा नरेंद्रजी मोदी यांची झाली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

अशा प्रकारचे प्रेम, विश्वास, आदर कार्यकर्त्यांनी एकेकाळी दिला होता तो अटलबिहारी वाजपेयी यांना! त्यांना कधी तरी पंतप्रधानपदी बघण्याचे स्वप्न बघण्यात स्वयंसेवकांची एक पिढी खपली. अटलजी यांच्या सरकारवर विश्वासदर्शक ठराव पास झाल्यावर देशभरात कार्यकर्त्यांनी आपल्या आनंदा अश्रूंना वाट करून दिली होती आणि तीच ओथंबून आलेली भावना २०१४ साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण बहुमताने सरकार आल्यावर सर्व कार्यकर्त्यांची झाली होती. या भावनांच्या मागे ५२ सालापासून भोगावा लागलेला उपहास, जाच, अनेक कार्यकर्त्यांचे उद्ध्वस्त झालेले जीवन, अनेक कार्यकर्त्यांचे अगदी श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळजींसारख्या नेत्यांपासून छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांचे बलिदान ही पार्श्वभूमी होती. जगाच्या इतिहासात आपल्याच देशात इतका टोकाचा विरोध सहन करून स्वतःचे अस्तित्व कायम ठेवून, तत्त्वाशी तडजोड न करता आपले ध्येय स्वप्न पूर्णत्वास नेणारा पक्ष म्हणून किंवा विचारसरणी म्हणून एकमेव उदाहरण भारतीय जनता पक्ष असू शकेल.

नरेंद्रजी मोदी यांचा संघाशी संबंध येणे, वकील साहेब यांनी त्यांना प्रचारकी जीवन जगण्यास प्रवृत्त करणे आणि पुढे ज्यांनी त्यांना राजकीय क्षेत्रात काम करण्यास पाठवले त्या सर्वांकडून जणू नियतीने भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी हे घडवून आणले असे आज मागे वळून बघितल्यावर वाटायला लागते. जसे एके काळी निरंकुश काँग्रेसी सत्तेवर अंकुश निर्माण करण्यासाठी अटलजींसारखे नेतृत्व निर्माण झाले, राम मंदिर निर्माण करण्यासाठी निर्णायक राजकीय भूमिका घेण्यासाठी अडवाणी यांचे नेतृत्व उभे राहिले त्याच परंपरेतील, हिंदुत्वाला निर्णायक राजकीय सत्तेच्या माध्यमातून वैश्विक स्तरावर सुप्रतिष्ठित करण्यासाठी जणू नरेंद्रजी मोदी यांचे नेतृत्व साकारले गेले असावे असे गेल्या १० वर्षांतील त्यांच्या कारकिर्दीकडे बघितल्यावर प्रकर्षाने जाणवते.

सहसा पूर्ण वेळ कार्यकर्ता संघटनात्मक बाबी बघत असताना सत्तेच्या आणि तेही प्रशासनाच्या प्रमुखपदी क्वचितच पोहोचतो, ही मोदी ज्या संघटनेच्या, पक्षाच्या विचारधारेत काम करतात त्या संघटनेत असणारी पद्धत. पण एका विशिष्ट परिस्थितीत त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद चालून आले. संघातून राजकीय क्षेत्रात प्रवेश करताना त्यांनी कधी स्वप्नही बघितले नसेल किंवा त्यांना त्या क्षेत्रात पाठवणाऱ्यांची पण ही कल्पना नसेल; परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच स्वप्न आकार घेत असावे.

मुख्यमंत्रीपदी आल्यावर झपाट्याने घटनाक्रम घडत गेले. गोध्रा प्रकरण त्यापाठोपाठ दंगली, अटलजींनी जाहीरपणे दिलेला राजधर्म पाळण्याचा सल्ला! यामुळे मोदीजी सर्व बाजूने टीकेचे धनी बनले. विरोधी पक्ष तर होताच, पण स्वपक्षातील काहीजण अस्वस्थ होते. पण मोदीजी खंबीर आणि स्थिर होते. हिंदुत्व आणि विकास या दोन्ही गोष्टी हातात हात घालून पुढे नेण्याची त्यांची एक ब्ल्यू प्रिंट त्यांच्या मनात स्पष्ट होती. त्यामुळे त्यांना कधी मागे वळून बघावे लागले नाही. त्यांनी केलेल्या कामाचा परिणाम एवढा आज ही आहे की, गुजरातमधून काँग्रेस मुळापासून उद्ध्वस्त झाली आहे. गेल्या २८ वर्षांपासून सत्तेपासून दूर असलेली काँग्रेस पुढील २५ वर्षे सत्तेत येण्याची शक्यता नाही, अशी स्थिती आहे. मोदीजींना संघर्ष आवडतो. कारण त्यांच्या जीवनाची आणि नेतृत्वाची जडण-घडण संघर्षातून झाली. केंद्रात UPA सरकार आले आणि खऱ्या अर्थाने त्यांच्या नेतृत्वाची परीक्षा सुरू झाली. पण सर्व कासोट्यांच्या वर ते यशस्वी झाले. विकासाच्या योजनांची अडवणूक, खोट्या आरोपांमुळे केंद्रीय तपास यंत्रणेकडून छळ, माध्यमांकडून खलनायक अशी रंगवली गेलेली प्रतिमा या सगळ्या गोष्टीला ते पुरून उरले. शंकरसिंग वाघेलासारख्या आप्त स्वकियांशी पण त्यांना संघर्ष करावा लागला. पण जितका त्यांच्याबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला, तितकी त्यांच्याबद्दल उत्सुकता वाटायला लागली आणि त्यातून त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

हिंदू आतंकवाद, भगवा दहशतवाद असे Narative चालवणारे स्वतःच्या भ्रष्टाचाराच्या गर्तेत पूर्णपणे अडकले गेले, त्यावेळी एक स्वच्छ प्रतिमा असलेला आणि हिंदुत्वाच्या संकल्पनेबद्दल कुठलाही न्यूनगंड नसलेले नेतृत्व म्हणून २०१४ साली मोदीजी यांचे नाव पंतप्रधान म्हणून पुढे आले. सुरुवातीला काँग्रेस आणि त्यांच्या लुटियंसने त्यांना खूप हलक्यात घेतले. पण जसा त्यांचा झंझावात सुरू झाला, सभांना गर्दी होऊ लागली, सर्वत्र ‘मोदी आने वाला हैं!’चा जयघोष सुरू झाला आणि काँग्रेसला पायाखालची वाळू सरकली याची जाणीव झाली आणि मग मोदी नावाच्या वादळात काँग्रेस, डावे, हिंदुत्वविरोधी पालापाचोळ्यासारखे उडून गेले. एके काळी केंद्रात अस्थिर सरकार आणून त्याला आपल्या अल्प; परंतु निर्णायक शक्तीवर नाचवणारे डावे, लालूसारखे लबाड राजकारणी हे अस्तित्वहीन झाले.

मोदीजी यांचा गुजरात झपाटा त्यांनी दिल्लीत कायम ठेवला. अनेकांना असे वाटत होते की, दिल्लीत सक्षमपणे काम करणे, प्रशासन ताब्यात ठेवणे हे मोदी यांच्यासारख्याला जो प्रथमच दिल्लीच्या सत्ताकारणात येत आहे त्याला अवघड जाईल. पण मोदी यांनी सर्व अंदाज खोटे ठरवत दिल्लीतील प्रशासकीय, राजकीयसंस्कृती आपल्या व्यक्तिमत्त्वाने आणि कार्यपद्धतीने बदलून टाकली. परराष्ट्र धोरण कशाशी खातात हे मोदींना काय माहीत? आणि आपण त्यांची पुरेशी बदनामी भारताबाहेर केलेली आहे या भ्रमात काँग्रेसी विचारवंत, चाटूकार पत्रकार होते. पण बघता बघता मोदीजी कधी विश्वमान्य नेते बनले हे या मंडळींना कळलेच नाही. (ही गोष्ट सिद्ध करण्यासाठी नुकतेच G-20 निमित्ताने झालेले संमेलन हे पुरेसे आहे.) या सगळ्याचा परिणाम म्हणजे २०१९ ला जनतेने त्यांना पुन्हा आधीपेक्षा प्रचंड बहुमताने निवडून दिले. त्यानंतर जगभर आलेल्या कोरोनामुळे एक नवीन आव्हान निर्माण झाले होते. पण मोदीजी यांच्यासारख्या नेतृत्वाला संकट हे आव्हान आणि संधी वाटत असते. प्रतिबंधक लस ते आर्थिक नियोजन आणि लॉकडाऊन ते सर्वांना धान्य, अन्नपुरवठा यामध्ये मोदी सरकारने बजावलेली भूमिका याने सारे जग विस्मयचकित होऊन गेले. परिणामस्वरूप कोरोनानंतर जगात आज भारत एक आर्थिक शक्ती म्हणून पाचव्या स्थानावर जाऊन पोहोचला आहे.

मोदींना आर्थिक आघाडीवरील काही कळत नाही असे म्हणणारे अनेक अर्थतज्ज्ञ आहेत. पण नोटाबंदी, जीएसटी, जनधन खाती ते डिजिटल अर्थव्यवस्था यातून मोदी यांनी स्वतःचे व्यवहारिक अर्थशास्त्र हे पुस्तकी अर्थशास्त्रापेक्षा यशस्वी ठरल्याचे सिद्ध करून दाखवले आहे. भ्रष्टाचाराच्या गर्तेत अडकलेल्या शासकीय योजना थेट लाभार्थींच्या खात्यात परावर्तीत करताना त्यांनी क्रांतिकारक बदल घडवला आहे. मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरतेचा मंत्र इतका परिणामकारक ठरला आहे की, चीनच्या आर्थिक नाड्या न बोलता हळूहळू आवळल्या जात आहेत. शस्त्रांच्या बाबतीत दुसऱ्यांवर अवलंबून असलेली संरक्षण सिद्धता स्वयंपूर्ण होण्यामागे मोदीजी यांची दूरदृष्टी आहे. जवळजवळ ७० देशांत आज आम्ही क्षेपणास्त्रे, शस्त्रे निर्यात करत आहोत. नाशिकचा मिग विमानाचा प्रकल्प नवी भरारी घेत आहे. सेमी कंडक्टर पॉलिसी गेमचेंजर ठरत आहे. इलेक्ट्रॉनिक्स व्यापारात निर्यातीचे प्रमाण वाढणे हे देशाच्या उज्ज्वल भविष्याचे लक्षण आहे.

कृषी क्षेत्रात वास्तविक अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. पण दुर्दैवाने त्याचा योग्य प्रचार झाला नाही. युरिया धोरण हे शेतकऱ्याला ब्लॅक मार्केटिंगमुळे होणाऱ्या त्रासातून मुक्त करणारे ठरले. आतापर्यंतचा ऐतिहासिक उंचीवर खरेदीचे दर गेले. शेतकऱ्यांचे उत्पन्न तिप्पट करण्याच्या आकांक्षेने मोदीजी निर्णय घेत होते, पण दुर्दैवाने शेतकरी नेतेच त्याच्याआड आले आणि शेतीविषयक कायदे मागे घ्यावे लागले. विज्ञानातील प्रगती, तर चांद्रयान अभियान आणि आदित्य अभियान ते समुद्रयान प्रकल्प याने सिद्धच झाली आहे. पण त्याबरोबरीने पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी त्यांनी दिलेले प्रोत्साहन देशाचे चित्र बदलत आहे. रेल्वे आणि रस्ते यात विलक्षण बदल होत आहेत. विमानतळ आणि विमान प्रवास नवीन सुविधेसहित सुसज्ज झालेले बघून भारताची चौफेर प्रगती जाणवत आहे.

देशाची मानसिक गुलामगिरीतून मुक्तता करण्यासाठी मोदीजी यांनी अनेक निर्णय घेतले आहेत. राजपथ कर्तव्यपथ बनले आहे. अमर जवान ज्योत राष्ट्रीय युद्ध संग्रहालयात आणून तेथे सुभाषबाबू यांचा पुतळा उभा राहिला आहे. नाविक दलाच्या चिन्हावर शिवाजी महाराज यांची मुद्रा अवतरली. Beating retreat परेडमध्ये ‘ए मेरे वतन के लोगो’ हे गीत abaydan with Mee या परकीय गीताच्या जागी आले आहे. नवीन संसद भवनात सेंगोल प्रतिष्ठित झाले आहे. सुरक्षा कर्मचारी यांच्या वेषभूषेपासून ते भित्ती चित्रापर्यंत सर्वत्र देशाची हजारो वर्षांची संस्कृती पुनर्प्रकाशित होत आहे. देशाच्या चिंतनातून वसाहतवादी पगडा हळूहळू दूर होत आहे या मागे येणाऱ्या काळातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे आणि यासाठी मोदीजी यांनी घेतलेला पुढाकार निर्णायक असणार आहे. गुलामगिरीची द्योतक असलेले अनेक कायदे रद्द करण्याचा सपाटा मोदीजी यांनी लावला आहे. अजित डोवल, जयशंकर, आश्विनी वैष्णव, नितीन गडकरी, अमित शहा, राजनाथ सिंग आणि पीयूष गोयल, निर्मलाजी असे आणि अनेक भक्कम सहकारी यांची टीम उभी करताना ‘leading from the front’ ही उक्ती त्यांनी खरी केली आहे.

मोदीजी यांनी हिंदुत्वाच्या चळवळीत काम करताना कार्यकर्त्यांनी आणि स्वयंसेवकांनी अनेक वर्षे उराशी बाळगलेली अनेक स्वप्न प्रत्यक्षात आणली आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ३७० कलम रद्द होणे होय. त्याबरोबर अनेक वर्षांचा राम मंदिर प्रश्न सोडवताना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होताच प्रशासकीय गती देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. वाराणसी, उज्जैन आणि अनेक हिंदू श्रद्धास्थानांचे कॉरिडॉर भव्य करण्यात त्यांनी पुढाकार घेतला आहे. सैन्याचे मनोबल वाढवताना अंतर्गत सुरक्षा आणि सीमा सुरक्षा यात कमालीचे स्थैर्य मोदीजी यांनी आपल्या कार्यकाळात आणले आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात पाकिस्तान आणि चीन यांना एकटे पाडताना जागतिक पटलावर दहशतवादी मानसिकता कट्टर वादातून निर्माण होते हे सांगण्याचे धारिष्ट्य त्यांनी दाखवले. त्यामुळे भारतीयांना त्यांचा अधिक अभिमान वाटायला लागलाच आहे तर फ्रान्ससहित अनेक युरोपीय देश हा आमच्या मनातले बोलतो आहे असे सांगत मोदीजींना आपले समजू लागला आहे. मी प्रतिनिधित्व करत असलेली १४० कोटी जनता ही माझी शक्ती आहे याचे भान ठेवताना त्या शक्तीचा दबाव आणि प्रभाव निर्माण करण्यात मोदीजी यशस्वी झाले आहेत.

सनातन, भारत, इंडिया, धर्मनिरपेक्षता या सगळ्या शब्दांवर राष्ट्रीय चर्चा होऊन त्यातून अमृत सिंचन होण्याची वेळ आली आहे. त्यासाठी योग्य राजकीय वातावरण निर्माण करण्यात मोदीजी यशस्वी झाले आहेत. मोदीजींना मिळत असलेले हे यश एका रात्रीतून मिळालेले यश नाही. कुठलीही कौटुंबिक पार्श्वभूमी नसताना एक प्रचंड यशस्वी राजकीय नेता, एक कुशल प्रशासक, एक वैश्विक नेतृत्व हे सर्व साध्य होण्यामागे प्रचंड मोठी तपश्चर्या आहे. मनाचा मोठा निग्रह आहे. अत्यंत ध्येयासक्ती बाळगत असताना त्यासाठी कठोर जीवन जगण्याची तयारी आहे. त्यातून मग मोदी नावाची दंतकथा तयार होत आहे.मोदीजी परदेशात प्रवास करतात, तेव्हा विमानतळावरच स्नान करतात. पहाटे तीन वाजता उठून पुढे १८ तास काम करतात. नवरात्रात फक्त लिंबू पाणी पिऊन उपवास करतात. स्वतःचा डबा विमान प्रवासात बरोबर ठेवतात. संपूर्ण दीर्घ काळ प्रशासकीय आणि राजकीय कामं करताना त्यांनी एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. स्वतःचा सर्व खर्च पगारातून करताना कुठेही त्यांचा बँक balance वाढत नाही. कुठे त्यांची स्थावर मालमत्ता वाढत नाही. पंतप्रधान निवासात खूप खोल्या असून ते काही ठरावीक खोल्याच वापरतात. त्यांच्या आसपास सरकारी पाहुणचार किंवा कुठलाही लाभ घेण्यासाठी कोणतेही भाऊ-बहीण, नातेवाईक फिरकतही नाहीत. दिवाळी साजरी करताना ते आपल्या सीमेवरील सैनिकांच्या बरोबर असतात.

वाढदिवस असतो तेव्हा इतके दिवस ते काही तास आईकडे जायचे, पण आता श्रीमती हिराबेन या जगात नाहीत त्यामुळे तेही आता होणार नाही. राजयोग साधताना एक विश्वस्त म्हणून कसे जीवन असावे, याचे उत्तम उदाहरण त्यांनी सर्वांच्या समोर ठेवले आहे आणि त्यामुळे ते एक दंतकथा वाटावी, असे बनले आहेत. संघ प्रचारक एक जीवन पद्धत आहे. ज्यात सर्वसामान्यपणे व्यवहारिक जीवन जगताना सन्यस्त मनोवृत्ती ठेवणे, अकृत्रिम स्नेहपूर्ण व्यवहार सर्वांशी करणे, मर्यादित गरजा ठेवणे आणि तत्त्वाबद्दल आग्रही राहताना व्यक्तिगत संबंध त्यावरती ठेवणे या सगळ्या गोष्टींचा वैश्विक आविष्कार म्हणजे मोदीजी यांचे जीवन आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -