कोकणी बाणा: सतीश पाटणकर
कुडाळनजीक मुंबई-गोवा महामार्गादरम्यान मच्छिंद्रनाथ तपोभूमी देवाच्या डोंगराकडे जाणारा मार्ग म्हणून एक फलक लक्ष वेधतो. हाच मार्ग थेट नागमोडी वळणे घेत देवाच्या डोंगरावर पोहोचतो. भर दुपारीही तेथे पोहोचणाऱ्या प्रत्येकाला शांतीची प्रचिती येते. थंड वातावरण, साथीला निसर्गरम्य वातावरण पाहताना आश्चर्यचकित व्हायला होते. आंबडपाल हे गाव शंकराचार्यांना इनाम म्हणून देण्यात आले आहे. अगदी कालपर्यंत शंकराचार्यांच्या आश्रमाकडून शेतसारा या गावातून नेला जायचा. आजही गावात शंकराचार्यांच्या लवाजम्यात दाखल असलेली माणसे आहेत. हत्ती, घोडे, शंकराचार्यांची दिमाखदार पालखी, त्यांचा गावात असणारा वावर, पंचक्रोशीचे होणारे न्यायनिवाडे याच्या आठवणी सांगणारी जुनी जाणती माणसे भेटतात. या गावातील जमिनी येथील रहिवासी कसतात; परंतु मालकी मात्र संस्थानाची आहे.
मच्छिंद्रनाथांनी याच भूमीवर कालिका मातेशी युद्ध केले. आजही युद्धाच्या पाऊलखुणा श्री नवनाथ कथासारामध्ये जपल्या गेल्या आहेत. या प्राचीन ग्रंथात जशा नोंदी आहेत तशाच मुद्रा हजारो वर्षांनंतरही येथे पाहायला मिळतात. भारत आणि भारताबाहेरही पोहोचलेला संप्रदाय म्हणून नाथ संप्रदायाला ओळखले जाते. हा खूपच जुना संप्रदाय म्हणून ओळखला जातो. कोकणात या संप्रदायाच्या पाऊलखुणा अनेक दंतकथांतून दिसून येतात. कोकणात या संप्रदायाचा प्रसार झाल्याचे दिसते. आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ अशी या संप्रदायाची शिष्य-परंपरा सांगितली जाते. कोकणातील अनेक डोंगरांना सिद्धाचा डोंगर असे संबोधले जाते. काही कड्यावर सिद्धपुरुष तपश्चर्या करत होता, अशा काही कड्यांना सिद्धनाथाचा डोंगर असेही संबोधले जाते. यातूनच कोकणात नाथ संप्रदायाच्या अस्तित्वाच्या खुणा दिसून येतात. नाथ संप्रदायातील आदिनाथ म्हणजेच भगवान शंकर असे मानले जाते. कोकणात शिव आराधना ही प्राचीन काळापासून अस्तित्वात असल्याचे दिसते. त्यातूनच येथे नाथ संप्रदाय रुजत गेला असावा, अशी शक्यता अभ्यासकांना वाटते.
मालू कवीने आपल्या ‘नवनाथ कथासार’ या ग्रंथात कुडाळ प्रांताचा उल्लेख केला आहे. यातील एका अध्यायात कुडाळ प्रांतात अडूळ गावाजवळ मच्छिंद्रनाथ आणि कालिकादेवी यांच्यातील युद्ध वर्णन केले आहे. भगवान शंकराच्या हातामध्ये कालिका अस्त्र होते. या कालिका अस्त्रास आज्ञा करून भगवान शंकराने अनेक दैत्यांचा वध केला होता. त्यामुळे भगवान शंकरांनी कालिका अस्त्रास हवा तो वर मागण्यास सांगितले. हे अस्त्र म्हणजे कालिका देवीच होती. तेव्हा कष्टलेल्या या कालिका देवीने भगवान शंकरांना विनंती केली की, मला आता काही काळ विश्रांती द्यावी. देवाने ही विनंती मान्य केली. मला कुणीही सुप्तावस्थेतून उठवू नये, अशा जागी ठेवण्याचा वर तिने शंकराकडून घेतला होता. तेव्हा देवी अडूळ (सध्याचे आंबडपाल) गावाबाहेरील दुर्गा मंदिराच्या परिसरातील कणकाच्या बेटात विश्रांती घेत होती.
भगवान शंकराचे पुत्र कार्तिकेयांचे स्थान कोकणात आहे. त्या स्थानाला भेट देण्यासाठी मच्छिंद्रनाथ या परिसरात आले. भगवान शंकराच्या हातात असणाऱ्या कालिकास्त्रास आव्हान करावे आणि भक्तीने कालिकादेवीस प्रसन्न करून घ्यावे म्हणून मच्छिंद्रनाथांनी तिची आराधना सुरू केली. विश्रांती घेत असणाऱ्या देवीस हे खटकले. ती संतापली आणि तिने मच्छिंद्रनाथास युद्धाचे आव्हान दिले. मच्छिंद्रनाथांनी तिची विनवणी करण्याचा प्रयत्न केला; पण संतापलेल्या देवीने मच्छिंद्रनाथांवर विविध अस्त्रांचा प्रयोग केला. देवीने सोडलेल्या साऱ्या अस्त्रांचा मच्छिंद्रनाथांनी उत्तम प्रतिकार केला. शेवटी देवी मूर्च्छीत पडली, त्या वेळी भगवान शंकर प्रकट झाले. त्यांनी देवीला शुद्धीवर आणले. मच्छिंद्रनाथांना प्रसन्न होऊन शंकराने देवीस मच्छिंद्रनाथांना त्यांच्या जनउद्धाराच्या कार्यात सहभागी होण्यास सांगितले. देवीने ते मान्य केले. हा युद्ध झालेला डोंगर आजही देवाचा डोंगर म्हणून ओळखला जातो. तेथे मच्छिंद्रनाथ आणि कालिका देवीची आजही पूजा केली जाते.
कोकण रेल्वे मार्ग बनवत असताना या डोंगरातून हा मार्ग काढला गेला होता. देवाच्या डोंगरावर काम करत असताना मार्गात सदैव अडथळे येऊ लागले. नाथांची ही तपोभूमी असल्यामुळेच इथे असे अडथळे येत राहतील. इथे काही मोडतोड केल्यास अनर्थ होत राहील. त्यामुळे इथे कोणतेही काम होऊ नये, अशी येथील लोकांकडून अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यामुळे या मार्गात थोडासा बदल केला. त्या वेळी मार्ग सुरळीतपणे बनला, असे येथील लोकांकडून सांगितले जाते. त्यामुळे मच्छिंद्रनाथाच्या तपोभूमीशी येथील लोकसंस्कृतीचे भक्तिभावनेचे, श्रद्धेचे नाते आजही टिकून असल्याचे दिसते. देवाच्या डोंगरावर जंगली झाडांची कमी नाही. कनकेची बेटे जशी घनदाट आहेत तशा माडाच्या बागाही. या शिवलिंग परिसरात तीन ठिकाणी झाडे डवरलेली आहेत. ही तीन स्वयंभू शिवलिंग आहेत असा ग्रामस्थांचा समज आहे. कोकणच्या प्रांतात कोणकोण आले होते आणि कोण पोहोचले याचा इतिहास अपूर्ण आहे. गौरी शंकराचा पुत्र कार्तिकेयाचे स्थान म्हणून कोकण पुराणात प्रसिद्ध आहे. मच्छिंद्रनाथ कार्तिकेयाचे स्थान पाहूनच कोकणात दाखल झाले असे नवनाथ कथासारातून समजते.
पंचक्रोशीतील सर्व मंदिरांचे मुख्य स्थान हा देवाचा डोंगर आहे. कुडाळचा कुडाळेश्वर हा पूर्वेकडे, आंबडपालची कालिका ही उत्तरेकडे, घावनळेची पावणाई पश्चिमेला आणि पावशीची सातेरी दक्षिणेकडे तोंड करून उभी आहे ती याचसाठी. मंदिराची रचना पारंपरिक पूर्व-पश्चिम आहे; परंतु देवतांची नजर मात्र देवाच्या डोंगराकडे आहे. देवाच्या डोंगरापासून काही अंतरावर बिटक्याच्या वाडीवर गोरक्षनाथ येऊन गेले होते. यांच्या पाऊलखुणा येथेच जपल्या जात आहेत. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…