कथा: रमेश तांबे
नेहमीप्रमाणे शाळा भरली. मॅडम वर्गात आल्या. हातातली पुस्तके टेबलावर ठेवून त्यांंनी भरभर फळा पुसला अन् मोठ्या अक्षरात लिहिले निबंध! मग मागे वळून त्या म्हणाल्या, “मुलांनो निबंधाच्या वह्या काढा. आज आपल्याला आईचा निबंध लिहायचा आहे!” सर्व मुलांनी वह्या काढल्या आणि लिहायला सुरुवात केली. त्याच वर्गात शाळेत नव्यानेच आलेली सावळ्या रंगाची मीनलदेखील होती. तिनेही आपली वही काढली आणि निबंध लिहायला सुरुवात केली.
सगळीच मुले लिहीत होती. पण मीनल मात्र अधिकच मन लावून लिहीत होती. आजूबाजूला काय चाललंय याकडे तिचं अजिबात लक्ष नव्हतं. दहा-पंधरा मिनिटांतच काही मुलांचा निबंध लिहून झाला होता. काहींनी एक पान, तर काहीनी दोन पाने निबंध लिहिला होता. पण मीनल मात्र लिहायची थांबतच नव्हती. तास संपण्याची बेल वाजली. मॅडमने निबंधाच्या वह्या परत करायला सांगितल्या तरी मीनल लिहीतच होती. देेशमुुख मॅडम लांबूनच म्हणाल्या, “अगं मीनल वेळ संपली, किती लिहिणार आहेस. थांब आता!” मीनलने एकदाचे लिहिणे थांबवले. मान वर करून इकडे तिकडे पाहिले तेव्हा डोळ्यांत जमा झालेल्या पाण्यामुळे वर्गातली मुले मुली तिला अस्पष्ट दिसत होती. दूरवर उभ्या असलेल्या देशमुख मॅॅडमच्या मात्र ही गोष्ट लगेच लक्षात आली.
दुसरा दिवस उजाडला मॅडमनी काही निवडक निबंध निवडले होते. त्याचे वाचन मुलं वर्गात करणार होती. पहिल्या चार मुलांनी आईचे खूप छान वर्णन आपले निबंधातून केलं होते. त्यांची आई किती प्रेमळ आहे, ती अभ्यास घेते, किती काळजी करते. शिवाय काही घडलेले प्रसंग मुलांनी निबंधात लिहिले होते आणि अशीच आई प्रत्येक जन्मात भेटू दे अशी देवाजवळ प्रत्येकाने प्रार्थना केली होती. प्रत्येकाचा निबंध कसा आईच्या प्रेमात भिजूून गेला होता. त्यानंतर मॅॅडमने मीनलला हाक मारली “मीनल इकडे ये आणि तुझा निबंध वाच!” मीनल जागेवरून उठली. उदास चेहऱ्याने मॅॅडम जवळ गेली आणि तिचा निबंध वाचू लागली. “माझी आई मला खूप मारते. मला नीट जेवायला देत नाही. नवीन कपडे घेत नाही. माझा अभ्यास घेत नाही. शिवाय मला कुठेही बाहेर फिरायला नेत नाही. घरातली सगळी कामे सांगते, अशी आई कोणालाच कधीही न भेटो.” असं म्हणून ती हमसून हमसून रडू लागली. मुलांना कळेना आई अशी कशी असू शकते? आपल्या मुलांवर जीवापाड प्रेम करणारी, त्यांना जरा काही दुखलं, लागलं तर जीवाचा आकांंत करणारी आई! पण मीनलची आई अशी का नाही? सगळ्याच मुलांच्या मनात प्रश्न पडला. आई अशी कशी असू शकते. नक्कीच ती मीनलची सावत्र आई असावी. देशमुख मॅॅडमनेही असेच वाटले की, ती मीनलची सख्खी आई नाही.
दुसऱ्या दिवशी मुख्याध्यापकांनी मीनलच्या वडिलांना शाळेत बोलावणे पाठवले. कारण आदल्या दिवशीच देशमुख मॅडमने मीनलचा निबंध मुख्याध्यापकांना वाचायला दिला होता. त्यावरून मीनलसारख्या लहान वयातल्या मुलींना होणारा सावत्र आईचा छळ याला कोणीतरी वाचा फोडायलाच हवी म्हणून वडिलांना शाळेत बोलावले होते. निदान वडिलांनी तरी मुलीकडे लक्ष द्यायला हवे, असे मुख्याध्यापकांना वाटत होते. बरोबर सकाळी अकरा वाजता एक गाडी शाळेच्या आवारात शिरली. त्यातून एक पुरुष आणि स्त्री खाली उतरले. शिपाई काकांशी बोलून ते थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये शिरले आणि नमस्कार करून मुख्याध्यापकांना म्हणाले, “मी विश्वास नारायण शेट्ये. आपल्या शाळेतील मीनल शेट्येे माझीच मुलगी. आणि ही मीनलची आई वसुधा विश्वास शेटे!”
“तुम्ही आम्हाला भेटीसाठी का बोलावले आहे.” असे म्हणताच मुख्याध्यापकांनी मीनलचा “आईचा निबंध” त्यांच्या पुढे केला. बाबांनी आणि आईने दोघांनीही तो निबंध भरभर वाचला आणि निबंध वाचताना त्यांच्या चेहऱ्यावर राग, दुःख, आश्चर्याऐवजी हसूच उमटल्याचे मुख्याध्यापकांना दिसले आणि हसत हसतच मीनलचे बाबा मुख्याध्यापकांना म्हणाले, “क्षमा असावी सर. माझी मुलगी या शाळेत नवीनच आहे, त्यामुळे तिच्याबद्दल तुम्हाला जास्त काही माहीत नाही; परंतु मीनलला नेहमीच असं वाटतं की, “आहे तसंच लिहिण्यात काय मजा! आपला खरा कस तर कल्पनेने लिहिण्यातच असतो!” जे नाही त्याची कल्पना करावी आणि आपल्या कल्पनेच्या जोरावर त्यात अनोखे रंग भरावेत आणि एखादी गोष्ट, एखादा निबंध रंगून लिहावा. हा तिचा मुळातच आवडता छंद आहे. मला तर वाटतं की तिच्यात एखाद्या उत्तम लेखिकेची, अभिनेत्रीची बीजे पेरली गेली आहेत.” तितक्यात मीनलसुद्धा सरांच्या केबिनमध्ये आली आणि आईच्या गळ्यात पडून म्हणू लागली आई-बाबा तुम्ही इथे कसे? कुणी बोलावले तुम्हाला? आता मात्र मुख्याध्यापक आणि देशमुख मॅडमना हा या प्रसंगाला सामोरं जाणं नकोसं वाटू लागलं. मीनलला ओळखण्यात आपली जरा चूकच झाली, असे देशमुख मॅडमना वाटू लागले. वर्गात आल्यानंतर कितीतरी वेळ त्या मीनलकडे एकटक बघत होत्या आणि मीनल मात्र जणू काही घडलेच नाही, अशा थाटात मैत्रिणींशी गप्पा मारत होती!
मुंबई : बॉलीवूडचा किंग खान म्हणून शाहरुख खानची ओळख आहे. अनेकदा तो आणि त्याचे कुटुंब…
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या शोमधून स्वत:ची ओळख निर्माण करणारा 'फिल्टरपाड्याचा बच्चन' म्हणजेच गौरव मोरे…
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांना विमान कंपनीच्या गैरव्यवस्थापनाचा चांगलाच फटका बसला. अब्दुल्ला…
छत्तीसगड : छत्तीसगडमधील कोरबा जिल्ह्यात आईस्क्रीम कारखान्यात एक धक्कादायक घटना घडली. कारखान्याच्या मालकाने चोरीच्या संशयावरुन…
मुंबई : आपण अनेक चित्रपटांची गाणी ऐकली आणि बघितली असतील. भारतीय चित्रपटात गाणी नसतील तर…
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.…