
इंदौर: भारत आणि ऑस्ट्रेलिया(india vs australia) यांच्यात रविवारी २४ सप्टेंबरला तीन सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रंगत आहे. हा सामना इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार दुपारी दीड वाजता सुरू होईल. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले होते. यासोबतच भारताने या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
टीम इंडियाची नजर इंदोरमधील दुसरी वनडे जिंकत मालिका जिंकण्यावर असणार आहे. मात्र भारतीय संघ इंदौरमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवू शकेल का? तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघही सामना जिंकत मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न करेल.
काय म्हणतात आकडे
आतापर्यंत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १४७ वनडे सामने खेळवण्यात आले. ऑस्ट्रेलियाने भारताला ८२ वेळा हरवले. तर भारतीय संघाला केवळ ५५ सामन्यांमध्ये विजय मिळवता आला. याशिवाय १० सामन्यांमध्ये कोणताही निर्णय होऊ शकलेला नाही. भारताच्या भूमीवर ऑस्ट्रेलियाचा संघ नेहमीच अव्वल ठरला आहे. भारतात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात ६८ सामने खेळवण्यात आले. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ३१ वेळा हरवले आहे तर ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला ३२ सामन्यात हरवले.
भारताने मोहालीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले
भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला ५ विकेटनी हरवले. भारतासमोर विजयासाठी २७७ धावांचे आव्हान होते. भारतीय संघाने ४८.४ षटकांत ५ विकेट गमावत २८१ धावा केल्या. भारतासाठी शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि के एल राहुल यांनी अर्धशतकी खेळी केली.