मायभाषा: डॉ. वीणा सानेकर
मराठी साहित्यविश्वातील नाट्यछटा हा महत्त्वाचा साहित्यप्रकार रुजवण्याचे श्रेय शंकर काशिनाथ गर्गे अर्थात दिवाकर यांना जाते. एक व्यक्ती इतर व्यक्तींशी बोलते आहे, असे भासवत संपूर्ण प्रसंग नाट्यपूर्ण रीतीने या साहित्यप्रकारात रचला जातो. दिवाकरांनी प्रथमत: १९११ साली पहिली नाट्यछटा लिहिली. लघू आकारातील हा साहित्यप्रकार सादरीकरणाच्या अंगाने महत्त्वाचा ठरतो. शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीजगतात आजही दिवाकरांच्या नाट्यछटांना महत्त्वाचे स्थान आहे.
विरोध, क्रौर्य, कारुण्य, विसंगती, दंभ अशा अनेक पैलू व भाव-भावनांभोवती दिवाकर आपल्या नाट्यछटा विणत गेले, तर एखादी ‘किती वर्णनात्मक देखावा हा, पण इकडे…’ यासारखी नाट्यछटा त्यांनी ललित निबंधाप्रमाणे रचली आहे. मानवी स्वभावातील विरोध ही त्यांची खास विसंगती आहे. मुलांना व्यवहारज्ञान नाही अशी तक्रार करणारा बाप ‘कार्ट्या अजून कसे तुला जगातले ज्ञान नाही’ या नाट्यछटेत दिसतो. पाहुण्या आलेल्या मित्राच्या खिशातली पडलेली नोट तो लपवतो. त्याचा निरागस मुलगा “मी काकांच्या खिशातून पडलेला कागद बाबांकडे दिला” असे सांगून टाकतो, यावरून त्याला जग समजत नाही, असे म्हणत हे महाशय गीतेवरील प्रवचन ऐकायला जातात. यातला विरोध वाचकाच्या लक्षात येतो, तेव्हा दिवाकरांच्या शैलीचे कौतुक वाटते.
‘हे फारच बोवा’, ‘म्हातारा न इतुका’, ‘हलवाई’ या मानवी स्वभावातील विरोध दाखवणाऱ्या नाट्यछटा आहेत. घरात विधवा मुलगी असताना उतारवयात स्वत:चे दुसरे लग्न करायला निघालेला बाप ‘अशा शुभदिनी रडून कसे चालेल’ या नाट्यछटेत दिसतो, तर ‘कोण मेले म्हणजे रडू येत नाही’ या नाट्यछटेत आनंदी नावाच्या विधवा स्त्रीचा मृत्यू हा विषय आहे. दिवाकर यांना स्त्रियांवरील अन्यायांची व त्यांच्या व्यथांची स्पष्ट जाणीव होती, हे या नाट्यछटांमधून जाणवते.
माणसांबरोबरच दिवाकरांनी मुक्या प्राण्यांच्या वेदना पकडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘शेवटची किंकाळी’ या नाट्यछटेतून एका कुत्र्याचा आक्रोश मुखर होतो. दिवाकर यांनी काही नाट्यछटांमध्ये काव्यमय शैली योजली आहे, तर काही ठिकाणी रूपकात्मक रचना केली आहे.
‘पंत मेले, राव चढले…’ ही नाट्यछटा म्हणजे एका कुशल नाटककाराच्या शैलीचा आविष्कार आहे. ‘असे केल्याशिवाय जगात भागत नाही’ या नाट्यछटेत मिश्किल अंगाने स्तुतीपाठक व खुशामतखोर यांचे व्यक्तिचित्रच उभे केले आहे.m १९११ सालच्या अखेरीस दिवाकरांना स्पष्टपणे दिसेनासे झाले. आपल्याला अंधत्व आले, तर हा विचार त्यांच्या मनात वारंवार येत असावा. स्वतःचा हा दुखद अनुभव ‘सगळे जग मला दुष्ट नाही का म्हणणार’ या नाट्यछटेतून साकारला आहे. स्वतःला पडलेल्या स्वप्नांंवर त्यांनी लिहिले तसेच आपल्या वेदनेलाही त्यांनी नाट्यछटारूप दिले. जीवनाचे व माणसाचे अनेकविध रंग दिवाकरांनी छोट्याशा साहित्यप्रकारातून रेखाटले. जीवनरंगाच्या नानाविध छटा म्हणजेच दिवाकरांच्या नाट्यछटा!