गुलदस्ता: मृणालिनी कुलकर्णी
आज जग ग्लोबल व्हिलेज झाल्याने एकाच क्लिकवर आपण सारे जग पाहतो, वाचतो. दळणवळणही सोपे झाल्याने पडद्यावरचे जग पाहण्यापेक्षा आपण या जगात मुशाफिरी का करू नये. आपले कुटुंब, आपले घर हे आपल्या स्वत:चे जग. या घरातल्या जगाशी जोडलेली नाळ कायम ठेवून विकासासाठी बाहेर जातात ते देशाटन. देशाटन म्हणजे जगाच्या विविध भागांत जाऊन आंतरराष्ट्रीय पातळींवर वैचारिक देवाण-घेवाण करून ज्ञानाने, अनुभवाने समृद्ध होऊन आपल्या क्षेत्राची व्याप्ती वाढविणे. ज्यांनी क्षितिजापलीकडे बघितले, त्यांना यश आले. त्यांनीच तंत्रज्ञान, अन्न, आरोग्य, मनोरंजन, शिक्षण, खेळ ही क्षेत्र विकसित केली. त्या व्यक्ती विचाराने आधीच काळाच्या पुढे पन्नास वर्ष होत्या. आपल्या व्यवसायाच्या शाखा, कार्यालय जगाच्या पाठीवर सर्वत्र काढली. जगात काहीतरी बदल घडवून आणायचे हेच यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी देशाटन केले होते. आजही जाती, धर्म, श्रद्धेच्या, वादाचे गुऱ्हाळ उगाळण्यातच दिवस चाललेत. देशाटनासाठी आपण कुठे आहोत हे महत्त्वाचे नसून आपल्याला कुठे जायचे आहे, हे महत्त्वाचे असते. माझ्या लहानपणी कोकणातून, गावाहून शिक्षणासाठी, नोकरीसाठी आलेले मुंबईतच स्थिरावले. त्यांना मार्ग गवसला.
आजचे युवक शिक्षण, नोकरी, स्वतःच्या प्रगतीसाठी देशाबाहेर जात आहेत.आमच्या परदेश दौऱ्यात हॉटेल, मॉल सुट्टीच्या दिवशी पर्यटकांसोबत काम करणाऱ्या युवकांशी आम्ही संवाद साधत असतो.
१. लग्नानंतर पतीच्या सहकार्यामुळे शिक्षणासाठी मीनल एकटीच परदेशी जाऊन सुरुवातीला पगाराशिवाय अनुभव घेतला. नंतर शिष्यवृत्तीवर वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले.
२. डार्मस्टाड शहरांतील एक युवक म्हणाला, “येथील प्रगत तंत्रज्ञान आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आम्हाला चांगले मिळते. सुरुवातीला भाषेचा (जर्मन) अडसर जाणवला. विविध देशांतील आम्ही युवक अभ्यासासाठी एकत्र आल्याने तडजोड, देवाण-घेवाणमधून खूप शिकतच मैत्री झाली. कष्टाची, पैशाची जाणीव होते.”
३. सिडनीतील सागर मोठ्या भावामुळे शालेय जीवनातच ऑस्टेलियाला आल्याने लवकर सेट होत, स्वावलंबी, स्वतंत्र आयुष्य जगू लागला. चांगल्या गोष्टीची निवड करायची सवय लागली. तो म्हणतो, “भारतात आपल्या जगण्यावर अनेकांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या संदर्भात ग्लोबल सिटिझन असलेल्या कलेक्टर लक्ष्मी प्रतुरी म्हणतात, आपल्या मुलांत क्षमता असूनही पालक जुन्या जगाचे नियम लावीत या तरुणांना सीरियसली घेतच नाहीत, नवीन गोष्टी करायला संधीच देत नाहीत म्हणून ही मुले मागे राहतात.”
४. मेडिकलच्या डॉ. स्वाती कुलकर्णी यांनी केवळ एक आव्हान म्हणून यूपीएससी देत देशादेशांत मुसद्देगिरी करण्याची जबाबदारी असलेले पराष्ट्रसेवेतील पद करिअर म्हणून निवडले.
आपल्याकडील बुद्धिमान, बहुश्रुत कलाकार, खेळाडू यांचे कौशल्य त्यांच्या गावापुरते सीमित न राहता ते जगासमोर कसे येईल? हा खरा प्रश्न आहे. आदिवासी पाड्यांतील मुलींनी आपल्या पायातील ताकद ॲथलेटिकमध्ये आंतरदेशीय पातळीवर नेली ना! जगाच्या आर्थिक घडामोडीवर भाष्य करणारे, सतत जगात सर्वत्र फिरणारे संदीप वासलेकर म्हणतात, “मी जो काही घडलो, त्यात प्रवासाचा वाटा खूप मोठा आहे. एक तिकीट काढायचे, थोडे पैसे खिशात ठेवायचे आणि स्वतःला प्रवाहात झोकून द्यायचे. रोज नवा विचार, नव्या मित्र-मैत्रिणी, नव्या कल्पना मिळतील. फक्त व्यावहारिक फायद्याची अपेक्षा करू नका.”
वीस ते तीस वयोगटातील तरुणांना कळकळीचा सल्ला दिलाय, “दोन वर्षे काम करा, तिकिटासाठी आणि वर खर्चासाठी पैसे जमवा आणि तीन-चार महिने जगात फिरा, लोकांशी सवांद साधा, तुम्हाला तुमचा मार्ग सापडेल. फक्त कुठलेही कर्ज काढून अगदी नामांकित विद्यापीठातही एक वर्षाचा कोर्स करू नका. स्वप्नरंजनात, भूलभुलैया वातावरणात अडकू नका. प्रत्येकाला स्वतःच्या क्षेत्राचा, क्षमतेचा अंदाज हवा. यांत स्वतःवर विश्वास असेल, तरच स्वतःमध्ये बदल घडवून आणाल.”
पैशाआभावी भारताबाहेरील जगात शक्य नसेल, तर ईशान्य भारतात जा. लोकांचे आदरातिथ्य स्वीकारा. तुमच्या आयुष्याची पुस्तकाची पाने उघडली जातील. क्वीन चित्रपटांत सुरुवातीची भित्री, बुजरी नायिका कंगना देशाटनातून येताना आंतरबाह्य बदलून तिच्या अंगी आलेला आत्मविश्वास तिला जगायला शिकवितो. “शोध हा जगण्याचा प्रवास आहे.” वयाचे बंधन नसलेला, प्रत्येकाच्या आयुष्यातील अविभाज्य भाग ‘प्रवास’. एका व्यक्तीने किंवा समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजन, अभ्यास, कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन!
आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटन वाढावे या उद्देशाने, संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची २७ सप्टेंबर १९७० ला स्थापना झाली आणि २७ सप्टेंबर १९८० पासून ‘जागतिक पर्यटन दिन’ साजरा केला जातो. आज सर्वात मोठ्या वेगाने वाढणारा ‘जगातिक पर्यटन व्यवसाय’ सर्व देशांना परकीय चलन मिळवून देत आहे. मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर नव्या वर्षातील निसर्गसौंदर्य आणि आर्थिक बळकटीसाठी २५ जानेवारी १९४८ हा दिवस भारतात पर्यटन दिन म्हणून साजरा करतो. आज जग जवळ आल्याने सर्व वयोगट देशाटनासाठी बाहेर पडतो हे सुखद दृश्य अनुभवतो. परदेशाचे गुणगान गातो. पण तिथली शिस्त स्वच्छता शिकत नाही. स्वामी विवेकानंद आणि समर्थ रामदास यांना त्या काळात वाटायचे, आपल्या भारतीय तरुणांनी स्वतंत्र प्रवास करावा.
उघड्या डोळ्यांनी जग पाहावे. जगातील लोकांनी स्वतःची प्रगती कशी केली, त्याचा अभ्यास करावा. खोलवर रुजलेल्या भोळसट कल्पनांनी आपण मुलांना भित्रे बनवितो. असे का? हे न विचारता कारकुनासाठी आटापिटा करतो. देवाण-घेवाण, आदान-प्रदान हा प्रकृतीचा, निसर्गाचा एक नियम आहे. वैश्विक मानसिकता विकसित करण्यासाठी ग्लोबल ॲप्रोच हवा. जगाची विचारसंस्कृती, लोकजीवन, राहणीमान कार्यपद्धती विज्ञान, कला प्रांत जाणून घ्या. परदेशी भाषा शिका. संवाद साधा. इनोव्हेशन हा आजच्या काळातील महत्त्वाचा घटक! आज भारताचे नाव जगात गाजत आहे. तुम्ही व्यक्तिगत, सामूहिक किंवा संस्थेमार्फत देशाच्या पातळीवरून जगासमोर या!
mbk1801@gmail.com
मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…
मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…
ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…
मुंबई: इमरान हाश्मीचा नवा चित्रपट 'ग्राउंड झिरो' सध्या चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा प्रीमियर झाला.…
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…