
नवी दिल्ली : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारत एकट्याने या भव्य स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही स्पर्धा भारतामध्ये ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर या दरम्यान, होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आयसीसीने विजेते, उपविजेते, उपांत्य फेरीतील आणि गट टप्प्यातील सर्व संघांसाठी बक्षिसांची रक्कम जाहीर केली. यात आयसीसीकडून अंदाजे ८३ कोटी रुपये बक्षिसांसाठी रक्कम वितरीत करेल.
यापैकी, विजेत्याला रु. ३३ कोटी तर उपविजेत्याला १७ कोटी मिळतील. याचा अर्थ विजेत्या संघासोबत अतिम फेरीत हरणा-या संघाला देखील मोठे बक्षीस मिळणार आहे.
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघाला सुमारे ६ कोटी रुपये आणि गट फेरीतून बाहेर पडलेल्या संघाला सुमारे ८२ लाख रुपये मिळतील. यावेळी जाहीर करण्यात आलेली बक्षीस रक्कम गेल्या हंगामाप्रमाणेच आहे.
परिषदेने पूर्वीच्या सुमारे ८३ कोटी रुपयांच्या बक्षीस रकमेत कोणताही बदल केलेला नाही. गेल्या मोसमातील चॅम्पियन इंग्लंडला सुमारे ३३ कोटी रुपये मानधन मिळाले होते.
टी-२० विश्वचषक विजेत्याला १३ कोटी रुपये
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-२० विश्वचषक जिंकणा-या इंग्लंड संघाला १३ कोटी ५ लाख ३५ हजार रुपये मिळाले होते. तर उपविजेत्या पाकिस्तान संघाला ६ कोटी ५२ लाख ६४ हजार रुपये मिळाले होते.
एकदिवसीय विश्वचषक भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४६ दिवस चालेल, ज्यामध्ये ४८ सामने खेळले जातील. पहिला सामना हा ५ ऑक्टोबरला अहमदाबाद येथे होणार आहे. हा सामना मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
१४ तारखेला भारत-पाकिस्तान सामना
टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना १४ ऑक्टोबर रोजी होणार आहे.