Tuesday, June 24, 2025

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोठा 'प्लान'!

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी जरांगे यांचा मोठा 'प्लान'!

अंतरवाली सराटी : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळण्याकरीता शासनाला ३० दिवसाची मुदत दिली आहे. ही मुदत १४ आक्टोबर रोजी संपत आहे या दिवशी शासनाच्या आदेशाची वाट पाहाणे व पुढील नियोजन करणे यासाठी राजस्तरीय सभेचे नियोजन करण्यात येत असल्याचे अंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी मनोज जरांगे यांनी शनिवारी सांगितले. या ठिकाणी गोदाकाठावरील १४२ गावातील मराठा समाज बांधवांचा मेळावा जरांगे यांच्या उपस्थितीत घेण्यात आला. या नियोजन मेळाव्याला मोठ्या प्रमाणात नागरीकांची उपस्थिती होती.


यावेळी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, मराठा आरक्षणाकरीता (Maratha Reservation) अंतरवाली सराटी येथे आमरण व साखळी उपोषण होत आहे. शासनाने तीस दिवसांची मुदत मागितली होती. ती मुदत दिली व आमरण उपोषण थांबवले. आता साखळी उपोषण करण्यात येत आहे. शासनाला जी मुदत दिली होती ती १४ आक्टोबर रोजी संपत आहे. यामुळे अंतरवाली सराटी येथे या भव्य दिव्य सभेचे नियोजन करण्यात येणार आहे. याकरीता सभेच्या जागेची पाहणी करण्यात येत आहे. या ठिकाणी याच दिवशी राज्यभरातील मराठा बांधवांना बोलावून नियोजन सभा घेण्यात येणार आहे. या सभेत ३० दिवसांनंतर शासनाने काय निर्णय घेतले, कोणते जी.आर. आले, शासनाची पुढील दिशा काय असणार व पुढे काय निर्णय घ्यायचा आहे. याबाबत संपूर्ण माहिती नागरीकांना देण्यात येणार आहे.


शासनाला दिलेल्या ३० दिवसांच्या मुदतीनंतर शासनाकडून मध्यस्थी करण्यासाठी जे कोणी येतील त्यांना बंदी घालण्यात येणार आहे. कोणालाही (लोकप्रतिनिधी/शासकीय अधिकारी) यांना अंतरवाली येथे सभास्थानी येता येणार नाही.


राज्यात अनेक ठिकाणी उपोषण व आंदोलने सुरु आहेत. तसेच ज्या ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी मनोज जरांगे व सहकारी मंडळी आता भेट देणार आहेत. त्या गावाची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे व त्यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे मनोज जरांगे यांनी अंतरवाली सराटी येथे सांगितले. शनिवारी अंतरवाली सराटी येथे साखळी उपोषण स्थळी रेणापुरी व नालेवाडी या गावातील नागरिकांनी जागर केला.

Comments
Add Comment