बुलढाणा : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway) कार उलटून भीषण अपघात झाल्याची घटना होऊन दोन दिवस उलटत नाही तोच या महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात (Road Accident) झाला आहे. भरधाव वेगातील स्वीफ्ट डिझायर कारचा समोरील टायर फुटला. त्यामुळे कार अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर कारमधील अन्य प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
जखमी प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही भीषण दुर्घटना शुक्रवारी रात्री बुलढाण्याजवळ घडली.
याबाबत अधिक माहिती अशी, भरधाव वेगात असलेली स्वीफ्ट कार छत्रपती संभाजीनगरहून मेहकरकडे निघाली होती. कार समृद्धी महामार्गावर आली. कारचा वेग जास्त होता. समृद्धी महामार्गावरील खळेगाव चॅनल नंबर ३०३ परिसरात आल्यानंतर अचानक टायर फुटला. त्यामुळे कार चालकाच्या नियंत्रणाबाहेर गेली आणि काही कळण्याच्या आतच रस्त्यावरील दुभाजकाला धडकली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर बाकीचे प्रवासी गंभीर जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
समृद्धी महामार्गावर मागील आठ महिन्यांच्या काळात तब्बल ७२९ अपघात झाले आहेत. यातील ४७ अपघातांत १०१ जणांचा मृत्यू झाला आहे तसेच ९९ अपघातांत २६२ जण जखमी झाले आहेत.
समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग भरधाव असतो. त्यामुळे वाहन नियंत्रित करणे सहजासहजी शक्य होत नाही. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अपघातातही असेच घडले होते. गौरी गणपतीच्या सणासाठी कुटुंब पुण्याहून अमरावतीकडे निघाले होते. समृद्धी महामार्गावर असताना अचानक वन्यप्राणी आडवा आला. या प्राण्याचा जीव वाचविण्याच्या प्रयत्नात कार तीन वेळा पलटी झाली. या अपघातात कुटुंबातील महिला ठार झाली. तर अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.
या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्यामुळे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी सातत्याने केली जात आहे.