पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कट्ट्यावर मीनाक्षी शेषाद्री बोलत होत्या. याप्रसंगी संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सुकृत मोकाशी आदी उपस्थित होते. मीनाक्षी शेषाद्री यांनी अमेरिकेला जाण्यापासून ते आतापर्यंतचा प्रवास यावेळी उलगडला.
मीनाक्षी शेषाद्री म्हणाल्या,‘मी लग्नानंतर चित्रपटसृष्टीला निरोप दिला आणि अमेरिकेत गेले. तिथे मला काय काम करायला मिळेल, याची माहिती नव्हती. नृत्य हे माझे पहिले प्रेम आहे. त्यामुळे तिकडे नृत्याची शिक्षिका झाले. मुलांना शिकविण्यात मला खूप आनंद मिळाला. माझ्या कुटुंबाला वेळ दिला. आता पुन्हा मला सेकंड इनिंग करायची आहे. त्यासाठी मी भारतात परत आले आहे, असे सांगून आता येथेच राहणार आहे. मी नृत्य आणि अभिनय केला. परंतु, मी गायनदेखील करते. त्यामुळे रसिकांसमोर गायिका म्हणून येणार आहे. हे त्यांच्यासाठी नवीन असणार आहे. लवकर माझ्या गायनाबाबतचे प्रकल्प तुमच्यासमोर येतील, असेही शेषाद्री म्हणाल्या.
‘मी माझ्या करीअरच्या एकदम सर्वोच्च स्थानावर असताना लग्न करून अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला. एक तर लोक सर्वोच्च स्थानावर असल्यावर किंवा एकदम डाऊन झाल्यावर माघार घेतात. परंतु, मी करीअरच्या अतिशय उच्च स्थानावर असताना चित्रपटसृष्टीतून बाहेर पडले, तो माझ्यासाठी अभिमानाचा निर्णय होता. त्या निर्णयावर मला कधीच खंत वाटली नाही. आता मी भारतात परत आले असून, पुन्हा नृत्य आणि अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी सज्ज झाले आहे,’ असे अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांनी सांगितले.
मराठीमध्ये काम करायला उत्सूक !
मराठीमध्ये काम करणार का ? यावर त्या म्हणाल्या, जर मराठीमध्ये चांगली फिल्म असेल आणि दिग्दर्शक उत्तम असेल तर मी नक्की काम करेन. मराठीमधील अनेक अभिनेत्री दक्षिणेत जाऊन काम करत आहेत. भाषेचा त्यामध्ये अडसर येत नाही. परंतु, मराठी भाषा मला माहिती असून, समजते. त्यामुळे मराठी चित्रपटासाठी रट्टामार काम करावे लागेल. मी नियमित नृत्य, योगा, मेडिटेशन करते. त्यामुळे माझी तब्येत अजूनही फिट आहे. आता पुढील महिन्यात मी साठीमध्ये पर्दापण करणार आहे. त्यामुळे वयाच्या साजेशा भूमिका मला मिळाल्या तर मी नक्कीच करील, असेही त्या म्हणाल्या.